कधी कधी आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात. ' तत्पुरुष ' या कवितासंग्रहाचा असाच एक किस्सा. वाशीला सेंटर वन मॉलच्या समोर एक पुस्तकांचं दुकान आहे. सहज टाईमपास म्हणून त्या दुकानात मी गेलो होतो. वापरलेली मराठी पुस्तकं तिथल्या एका टेबलावर विक्रीसाठी मांडलेली दिसली. त्या पुस्तकांच्या गर्दीत या पुस्तकावर नेमकी नजर पडली. 'तत्पुरुष' नाव त्याखाली 'कविता महाजन' लिहिलेलं वाचलं मात्र चालू ट्रेन धावत पकडून विंडोसीट लगबगीने बळकवावी तशा लगबगीने ते पुस्तक ताब्यात घेतलं. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील माहिती वाचून कळलं की हा कविता ताईंचा पहिला कवितासंग्रह आहे. त्यांचं 'भिन्न' आणि 'ब्र' वाचलेलं असल्यामुळे हे गुलाबी प्रेमाचं, अत्तर आणि गुलाब पाकळ्या परलेलं पुस्तक नसणार याची खात्री होती. काय असेल नेमकं ही उत्सुकता होती, मग पटपट दोन चार पुस्तकं उचलली, चटचट पैसे देऊन मी घरी आलो. घरी आल्यावर पहिलं पान उघडतोय तोच एक पेनाने लिहिलेला मजकूर दिसला ' प्रिय श्री. पाटकर यांना सप्रेम भेट' आणि त्याखालोखाल कविता महाजन यांची मराठीतली स्वाक्षरी पाहून सुखद धक्का बसला. हे म्हणजे भंगारात खरेदी केलेल्या कपाटाच्या कोनाड्यात सोन्याची बिस्किटं मिळावीत असं झालं. मी ती स्वाक्षरी मेडल मिळाल्यासारखी सगळ्यांना दाखवत सुटलो. पण मनात वाईट वाटत होतं असं प्रेमाने कोणालातरी दिलेलं कवयित्रीच्या स्वाक्षरीचं पुस्तक कोणी का विकलं असेल. ते जे कोणी श्री. पाटकर होते त्यांना बोल लावावे की धन्यवाद द्यावे अशा संभ्रमावस्थेत मी ते पुस्तक वाचायला घेतलं, आणि पहिलीच कविता वाचली ती ही.
'कवितेचं असं अंगभर उधाणून
धुमसत राहणं
नसतं परवडणारं ...
कविता कागदावर उतरली पाहिजे
बोटं छाटली जाण्याच्या आत! '
बापरे पहिलीच कविता वाचून मी गार झालो. ओपनरचं स्वागत खत्रूड जलदगती गोलंदाजाने तुफान वेगाच्या बाऊन्सरने केलं होतं. कानाला फक्त हवेची चपराक जाणवावी तसा सुन्न झालो. काय झालं, काय वाचलं क्षणभर कळलंच नाही. थोडा ब्रेक गरजेचा होता मानसिक तयारीसाठी.
ही फक्त झलक होती त्यांनी पेरलेल्या विस्तवाची. यातल्या काही कविता अनुष्टुभ, आशय, कालनिर्णय, चंद्रकांत, प्रतिष्ठान, मिळून साऱ्याजणी, तरुण भारत, मौज या नियतकालिकांतून पूर्वी प्रकाशित झाल्या होत्या. या कवितांना इंदिरा संत, प्रभा गणोरकर, शंकर - सरोजिनी वैद्य, ना. धो महानोर अशा दिग्गजांची दादही मिळाली होती. हा कवितासंग्रह अनेक अर्थांनी वेगळा आहे या कवितासंग्रहात कविता महाजन मानवी नातेसंबंधांवर भाष्य करतात. मालक, गुलाम, साखळी या रूपकांचा चपखल वापर करत त्या नवरा-बायको नात्यांमधल्या दांभिकतेवर आसूड ओढतात. त्यांच्या कवितेत जाळ आहे, विखार आहे, विद्रोह आहे, बंडखोरी आहे त्याचवेळेला मनाच्या हळव्या कोपऱ्यात एकाकी उसासे घेणारी संवेदशीलताही आहे. मालक - गुलाम हा प्रवास मांडतांना त्यांनी मांडलेले मुद्दे पटतात. कधी कधी पुस्तक बंद करून आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे की काय, आपण तर असे नाही ना? असा विचार करायला या कविता भाग पाडतात. यातल्या काही कविता कमालीच्या बोल्ड आहेत. 'प्रतिक्षा' सारखी कविता आहे, ज्यात स्त्रीच्या रात्री अर्ध्या कपड्यात बिछान्यावर पडून राहून केल्या जाणाऱ्या लाखो घरातल्या रोजच्या प्रतिक्षेचा उच्चार आहे, या कवितेचा शेवट 'स्वत:शिवाय?' असा त्या करतात, तेव्हा आपण पुन्हा सुन्न होतो. नक्की वाचावी अशी ही प्रतिक्षा. अशीच शृंगार नावाची एक अंगावर येणारी कविता आहे. यात त्या लिहितात
'ठसठशीत कुंकवासाठी एक कुयरी,
निरी उकलण्यापुरती तरी एक चिरी,
काळ्याभोर मण्याचं मंगळसूत्र,
गच्च हातभर काकणं.
कुड्या कानाची पाळी ओघळतील अशा,
नीट बोलूही न देणारी नथ,
सारा शृंगार काटेकोट जमला आहे.
पायांतील साखळ्याच तेवढ्या जरा
हलक्या वाटतात मालक
पहा ना
त्या घालून चालताही येतंय मला ...'
या कविता अंगावर येतात, खडबडून आत कोणीतरी काहीतरी जागं केलंय अशी मनाची अवस्था होते. मालक गुलामांचा हाच प्रवास त्या पुढेपुढे रंगवत जातात. आणि एक एक कविता वाचून आपल्या मनात प्रश्नचिन्हांचा गुंता वाढत जातो. जसं मालक गुलामांचं पुढे काय होतं? गुलामांच्या स्वप्नांना अर्थ राहतो का? मालकांना गुलामांची सवय होते का? गुलाम बंडखोरी करतात का? की मुर्दाड, भावनाशून्य, कोरडे, बथ्थड होत जातात काळानुरूप मालकांसोबत राहून राहून? गुलाम नसलेल्या बायकांचं काय त्या स्वच्छंदी की सार्वजनिक? त्यांना हेवा वाटतो का गुलाम असलेल्या बायकांच्या ज्या शालीनतेचा पदर जाणीवपूर्वक त्यांच्यासमोर ओढून घेतात? की गुलाम असलेल्या बायकांना हेवा वाटतो गुलाम नसलेल्या बायकांच्या ज्या निदान मनासारखी एक ओळ तरी गुणगुणू शकतात स्वच्छंदपणे? अशा अनेक विचारांच्या महाकाय लाटांवर आदळत आपटत आपली नाव निष्फळ किनारा शोधत राहते फक्त. नेमका किनारा काही गवसत नाही. मनाची अस्वस्थता कायम असते, आणि विचारांच्या चक्रागणिक या वादळाचा व्यास फोफावतो.
म्हटलेलं ना गुलाबी नाही. जे काही हिरवं, निळं, जांभळं, लाल, काळं ते निश्चित उष्ण आणि उठावदार, मनावर धीरगंभीर ओरखडा उठवणारं आहे. काही ओरखडे जिवंतपणीच अनुभवायचे असतात. नक्की वाचा.
- प्रसाद साळुंखे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा