लाल चिखल तुडवत मार्केटात आलो, समोरच गाडीवर लोक कणसं खाताना दिसत होती, पावसात खरपूस पोळलेली लाल तिखट लिंबू चोळलेली कणसं पाहून भूक चाळवली नाही तर नवलच. कणसं भाजेपर्यंत आम्ही त्या कणीसवाल्या काकांशी बोलत होतो, बोलता बोलता कळलं की त्यांची सून-सासरे अशी जोडगोळी होती. सासरे कणसं चांगली बघून निवडीत, नंतर सून ती निखार्यावर खरपूस भाजे, मग सासरे भाजलेल्या कणसांना लागलेली राख कणसाच्याच बाहेरच्या सालांनी पुसून काढत, सून त्या स्वच्छ केलेल्या कणसांना तिखटमीठ, लिंबू लावे, आणि सासरे ती रेडी टू सर्व्ह गरमागरम खमंग कणसं त्याच्या जाडसर आवरणात धरून गिर्हाईकांना देत. हे सगळं इतक्या विलक्षण चपळाईने घडे की त्यांची कणीस हाताळण्याची सफाई, एका लयीतला वेग बघता बघता ते "घ्या हे घ्या" असं म्हणत कणीस हातावर टेकवत, दोन मिनटं ते काय चाललय ते कळत नसे की कणीस खायचं ही भान नसे. आयतं कणीस हातात आल्यावरही मी सालांची उगाच जागा बदलत, कणसावर ग्रीप धरत, फुंकर मारावी का? मला नेमकं बिनदांड्याचं छोटं कणीस तर दिलं नाहीए ना? असा विचार करत मी थोडा वेळ तरी बावळटासारखा उभा राहतो, पहिला चावा घेईपर्यंत सगळ्या शंकाकुशंकांना वाव असतो, एकदा खायला सुरवात झाली की डायरेक्ट फडशा पाडतो, ते डिस्कवरी दाखवतात ना तसं कुठल्याश्या राक्षसी मुंग्या काही मिनिटात एखाद्या प्राण्याचा फन्ना उडवून नुसता हाडांचा सापळा शिल्लक राहतो तसं काहीसं. खाण्याच्या बाबतीत हा निर्लज्जपणा, बेशिस्तपणा, वखवखलेपणा मी कुठून आणला? हे मला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे, खाण्याची चव लागू लागली, जिभेला जरा चटक लागली की कुठल्याही हॉटेलात हॉटेलच्या ए सि ला, चकाकत्या काचांना, तिथल्या सुशिक्षित व सुसंस्कृत (समजणार्या) खवय्यांना, गणवेशातल्या वाढप्यांना, काटे चमच्यांना, फ्री सलाड आणि चटण्यांना, नॅपकीन, टेबलक्लॉथ, टिशू पेपरला या सगळ्याला (मला सोडून) लाजवेल अशा रितीने मी टेबल मॅनर्स ची आयमाय काढून यथेच्छ जेवतो. इथे तर कणसाच्या पोटात मी दाणा शिल्लक ठेवला नव्हता. कणसं फस्त करायला माझी भूक जबाबदार होतीच शिवाय माकडांची ब्यादही मागे लागली होती. तरी कणीसं वाले माकडांना बेचकीने पिटाळत होते पण माकडंच ती आपलेच बापजादे थोडं दूर झाल्यासारखं करत आणि पुन्हा जैसे थे. काही माणसं माकडांना खालेल्ली कणसं फेकत माकडंही ती कणसं अचूक झेलत (भारतीय खेळांडूपेक्षा काकणभर चांगलं क्षेत्ररक्षण) आणि त्यातले उरलेसुरले कण खात. माकडांच्या चेहर्यावर भुकेपेक्षा कणसातले कण वेचण्याचा एक खेळ मिळाला याचा आनंद दिसे. मला ती सून- सासर्याची जोडी आवडली, दोघेही हसतमुख होते, गाडीही टापटीप होती, कणसं व्यवस्थित रचलेली, सोबत तोतापुरी आंबेही होते, आणि गोळ्याचं सामान म्हणजे सरबताच्या रंगीबेरंगी बाटल्या, बर्फ किसायचं यंत्र वगैरे सगळं व्यवस्थित मांडलेलं होतं. सासर्याचे हात पोळत असतीलही कणसं हाताळताना पण म्हातारपणात असले सुखद चटके सहन करणारे कमीच, एकीकडे वृद्धाश्रमात घरातली अडगळ समजलेले वृद्ध बापुडवाणे जीव, त्यांना पोसणारे आधाराचे चेक्स आणि दुसरीकडे या सुनेचं सासर्यांकडे गल्ल्यात पैसे ठेवायला देणं अशी चमत्कारिक तुलना मी केली.
माथेरानच्या बाजारात आम्ही खूप फिरलो, खिडकी खरेदीही बरीच केली. माथेरानचा बाजार नानाविध आकर्षक वस्तूंनी सजलेला दिसला. ज्यूट बॅग्स, लेदर बॅग्स, लाकडी कलाकुसरीच्या वस्तू, चपला, खेळणी, टोप्या, कापडचोपड, उशांचे अभ्रे, वॉलहॅंगिंस, शोभेच्या वस्तू, पितळी बिगूल, कुकरी, नाईफस, पाईप, सिगारकेस, हुक्के, ब्रॉन्झचे अडकित्ते, तांब्या पितळेच्या तुतार्या, पेपरवेटस, शोभेचे दगड, नाना चवीची सरबतं, जेलीबेलीज, चिक्क्या, जॅम्स खरेदीला चिक्कार वाव होता. सगळ्याच वस्तू पाहून घ्याव्याशा वाटत. पण मग या डोळ्यात भरणार्या वस्तू, त्यांच्या डोळे दिपावणार्या किंमती आणि खिशातल्या पाकीटाचं वजन या सगळ्यांची सांगड घालता घालता "मिळतं सगळं मुंबईत" अशी वाक्य सहज तोंडी येत. तरी खरेदीचा मोह आवरणं मला कठीणच गेलं मग मी एक काळी हॅट, आणि एक ज्यूट बॅग खरेदी केली, अजून निघायला अवकाश आहे तेव्हा बाकीची खरेदी उद्या करू असं म्हटलं. अंधार जाणवू लागला तसे आम्ही हॉटेलवर परतलो. चालताना वाटेचा अंदाज येत नव्हता. खबरदारी म्हणून टॉर्च हातात बाळगून होतो पण पाऊस पडल्यामुळे साप जीवाणूंची भिती वाटत होती म्हणून सावध, हळू चाललो होतो. रुमवर पोहोचलो रुमवर आमची वाट बघणार्या मैत्रिणींना खरेदी दाखवली, थोडावेळ टाईमपास केला आणि पुन्हा जेवायला बाहेर पडलो.
लोकांना सोलून सोलून नेमकी आतली गोष्ट तिखटमीठ लावून चघळायचा सोसच जास्त
आधी मक्याला चटके, तवा मिळते पोटभर
फडशा
आयुष्याच्या गोळ्याला रंग देत असतो तो, पण कधी हा नको तो नको करत बसतो आपण, रंगाच्या बाटल्या तिथेच असतात मात्र गोळा वितळून गेलेला असतो ...
क्रमश:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा