
दिवस सरता कधी वाटते दवस्वप्नांनी न्हाऊन जावे
चंद्रफुलांच्या रानामधल्या सरोवराचे तरंग व्हावे
चांदणराती कधी वाटते शुभ्र चांदणे पिऊन घ्यावे
बासाच्या निजल्या पर्णांवरूनी काजवा होऊनी झिरपावे,
शीतल मंद चांदण्यांचे हात हलके हातात घ्यावे,
पायरीपायरीने चंद्र गाठावा अन चंद्रावर झोके घ्यावे,
चंद्रकोर व्हावी होडी ढगांची नाजूक लाट यावी,
निळ्या जांभळ्या क्षितीजाची धीरगंभीर साद यावी,
चंद्र चाखावा, हात माखावा, लखलखते ओघळ थोडे
मुक्त दौडावे स्वप्निल प्रवासाचे शुभ्र अवखळ घोडे
चमचमत्या तिथल्या वाळूवरती मनी रुजलेले गुपित लिहावे,
तारांगणाने त्यावरी ओंजळभर चांदणे शिंपडावे,
चांदणचिंब गुपिताने शहारावे, थरथर गोठता पारा व्हावे,
शब्दांनी नभ भरूनी रहावे अन अर्थाने तारा व्हावे,
उतरणीच्या पायरीवरी बैसोनि निळ्या अवनीला मी निरखावे,
निळ्या अवनीची निळी नवलाई पाहूनी तृप्त निळे शांत निजावे
भल्या पहाटे झोप उठावी अन चंद्राला मी शोधावे,
निळ्या आभाळी पेंगुळलेला चंद्र दिसावा,
निळ्या आभाळी पेंगुळलेला चंद्र दिसावा,
त्याने पुसटसे नीज म्हणावे
-प्रसाद
-प्रसाद
सुंदर मित्रा.. खूप सुंदर..
उत्तर द्याहटवाधन्यवाद दिपक :)
उत्तर द्याहटवा