नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

माथेरान 6

जेवायला बाहेर पडलो. रात्रीची वेळ आणि पाऊस त्यामुळे दिव्यांवर बर्‍याच प्रकारचे किडे झेपावत होते. मुलींना किंचाळायला नवं निमित्त मिळालं. तरी बरं किड्यांचा वावर जास्त असलेल्या भागात आम्ही मुलगे बसलो, म्हणजे हौस नव्हती, पण मुलींचा विनंतीपर हुकूम होता. आणि या पिकनिक पुरते तरी आम्ही स्वतःला मॅच्यूअर समजत होतो, मुलींची जबाबदारी आपल्यावर आहे असं वाटयचं, आम्ही मोठे असल्यासारखं वागत असताना मस्त वाटत होतं. इथल्या किंड्याचं एक वैशिष्ट्य मी स्वअनुभवावरून सांगतो, त्यांना तुम्ही बघत राहिलात तर ते कधी अंगावर येत नाहीत, पण एकदा का बोलण्यात गुंतलात की पायावर, मानेवर काहीतरी हुळहुळलच म्हणून समजा, डांबिस लेकाचे. असाच एक किडा एखाद्या तान्ह्या मुलाच्या निरासगतेच्या तोडीची निरासगता घेऊन माझ्या मांडीवर येऊन बसला त्याला बघून, तरी घाबरून मी झटकला, तर माझ्या चेहर्‍यापासून उभा वर उडत गेला, आणि उडता उडता म्हणतो अरे relax just kidding.

जेवणं आटोपली, आम्ही रुमवर परतलो पण दाराबाहेर किड्यांचा हा सडा पडलेला, दारावरच्या दिव्याची सारी करामत होती, मुली दार लोटायला तयार होईनात. मग पहिल्यांदा आम्ही दार लोटून आत गेलो आणि नंतर मागाहून मुली दबकत बिचकत दारापासून अंग चोरत कशाबशा आत आल्या. बाथरूममध्ये पाण्याचा टिपूसही नव्हता, मग सांगितल्यावर हॉटेलच्या पोरांनी थोड्या वेळाने बादल्या भरून आणल्या. त्यांना किड्यांच्या आम्हाला (मुलींना) होत असलेल्या त्रासाची कल्पना आली असावी, पण ते काही करू शकत नव्हते, पहिला पाऊस असल्यामुळे इतके किडे आलेत एवढंच ते म्हणाले आणि निघून गेले. त्या किड्यांना बघून मला गावची आठवण आली. गावची आजी पावसात असे किडे दिव्यांवर झेपावू लागले तर परातीत पाणी घेऊन त्यात घासलेटचा दिवा पेटवून ठेवे. थोड्या वेळाने त्या परातीत किड्यांचा हा खच तरंगताना दिसे. ज्योत आणि पतंगाचं कुठेतरी वाचलेलं प्रेमप्रकरण आठवतं. म्हणजे किड्यांना प्रकाशाचं आकर्षण फार, हे किडे या ज्योतीच्या प्रेमात आकंठ बुडतात. ह्या ज्योतीला दिलेलं आलिंगन हे शेवटचं हे त्यांना माहित असूनदेखील ते तो दाह, त्या वेदना सहन करून आपलं प्रेम व्यक्त करतात, आणि या वेडापाई प्राण गमावतात. विक्षिप्त ना? निदान ते ज्योतीला तरी इजा करत नाहीत, विक्षिप्त ... पण एकतर्फी प्रेमापोटी मुलीच्या चेहर्‍यावर Acid फेकणार्‍या माणसांपेक्षा थोडं कमी विक्षिप्त.

दिवसभराच्या धावपळीत कोणाला दमल्याचं जाणवतं नव्हतं. पण आता रात्री कोणाची मान दुखत होती, कोणाचे हात दुखू लागले होते. हॉटेलच्या पोरांकडून आयोडेक्सची बाटली मागावली. मलम चोपडल्यावर या लोकांना पुन्हा फ्रेश वाटायला लागलं. मघाचचा पत्त्यांचा उधळलेला डाव पुन्हा नव्याने रंगला. गप्पागोष्टी चालल्या होत्या, अचानक गाडीनं धार्मिक स्टेशन पकडलं. नेहाने कुठे कुठे वाचलेल्या, ऐकलेल्या रामायण, महाभारतातल्या कथा सांगायला सुरुवात केली. सहसा आमच्या वाचनात न येणार्‍या म्हणजे पार रामजन्माआधीपासूनच्या. विष्णूचे दशावतार, राधा-कृष्णाचं प्रेम, रावणाची शिवभक्ती, कुब्जाचा जन्म असे बरेच विषय चालू होते. एरव्ही आस्था चॅनलला नाकं मुरडणारे पत्त्यांचा डाव अर्धा टाकून लक्ष देऊन सारं ऐकत होते. राम, हनुमान, कृष्ण, बलराम, राधा, कुब्जा, कर्ण, दशरथ, पंडू, दधिची, मारीच, रावण, कुंभकर्ण सगळे कुठल्या ना कुठल्या कथेतून समोर येत, आणि मग डोक्यातून त्यांचे विचार पुढे बराच काळ जात नसत. बर्‍याच छोट्या-मोठ्या कथा, दंतकथा ती सांगत होती आणि आम्ही तल्लीन होऊन सारं ऐकत होतो, सारं समजून घ्यावं असं वाटे, आम्ही क्वचित शंकाही विचारत होतो. सार्‍या माथेरानमध्ये हे कदाचित असं एकच तरूण मुलामुलींचं टोळकं असेल जे सहलीला रात्री धार्मिक चर्चा करत बसलं असेल, पण प्रसन्न वाटत होतं एवढं मात्र नक्की. थोड्या वेळाने नेहाच्या गोष्टी संपल्या, पत्त्यांचा डाव पुन्हा सुरू झाला, पण खरं सांगू पुस्तक अर्ध्यात वाचून काही कारणास्तव नाईलाजास्तव कोणालातरी परत देण्यासाठी मिटतो तेव्हा जी मनाची अवस्था होते ना, तसच काहीसं माझं झालं होतं. पत्त्यांचा डाव झाला, उशांची मारामारी झाली. तसा रात्रभर आमचा जागण्याचा प्लॅन होता, पण पाऊणपासूनचं सगळे पेंगुळायला लागले. मी झोपलेल्यांच्या पायांना गुदगुदल्या करून उठवत होतो, पण मग हळूहळू माझ्याही पापण्या जड होत गेल्या. त्यात फ्यूजला जागरणामुळे वान्त्या झाल्या, अरबट, चरबट बरच खाणं वर जागरण हे तर होणारच होतं. पिकनकचा बट्याबोळ टाळण्यासाठी आधीचा प्लॅन निकालात काढून निमूट झोपायचा नवा प्लॅन केला. मुलींना आम्ही त्यांच्या रुमवर सोडलं आणि परत येऊन अंथरुणावर पडलो. दिवे मालवले की एक तरी किडा कुणाच्या ना कुणाच्या अंगावर हुळहुळे मग त्याला शोधण्यासाठी पुन्हा दिवे लागत, पुन्हा दिव्यांवर नवे पाहुणे येत, दिवे मालवल्यावर ते पुन्हा अंगावर हजेरी लावत, मग पुन्हा दिवे. असे खेळ करता करता "चिरडा ते किडे आता, चादर डोक्यावरनं घेऊन शांत नीजा" असं एल्फिस्टन ओरडला आणि आम्ही गुडीगुप्प झोपलो.
क्रमश:

२ टिप्पण्या:

  1. असाच एक किडा एखाद्या तान्ह्या मुलाच्या निरासगतेच्या तोडीची निरासगता घेऊन माझ्या मांडीवर येऊन बसला त्याला बघून, तरी घाबरून मी झटकला, तर माझ्या चेहर्‍यापासून उभा वर उडत गेला, आणि उडता उडता म्हणतो अरे relax just kidding.
    .... hahaha किमान ३ मिनिट्स फुटलो...

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद रोहनजी,

    ok ok relax now .. बब्बा ... these Kidas are so kiddish you see ...

    उत्तर द्याहटवा