नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९

माथेरान 4

वो जभ भी देता है छप्पर फाडके देता है, जास्तीचे कपडे होतेच आमच्याकडे. मोबाईल, पाकीट, कॅमेरा सांभाळून बॅगेत ठेवलं ते ठेवतानाही कमालीची धांदल, पाऊस गेला तर अशी भिती वाटत होती. माथेरानचा पहिला पाऊस आम्हाला भेटल्याशिवाय थोडीच जाणार होता. रुममधून बाहेर पडलो आणि मी पावसाचा झालो, स्वतःला त्याच्याकडेच सोपवलं. पावसाचा अखंड नाद वातावरणात भरून राहिलेला. शांत पाऊस ऐकत रहावं, चिंब व्हावं असं वाटत होतं. पण नंतर थोडा नाच, चिक्कार दंगा छप्परतोड पावसाला साजेसं काहीतरी झाला पाहिजे असंही वाटलं, आणि आमची पावलं मुलींच्या रुमकडे वळली. काहीजणी पावसात आधीपासून भिजत होत्या त्यांनी हात उंचावून लांबूनच हाय केलं, मात्र काही काकू भिजायला काकू करत होत्या, त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढत पावसात आणलं आणि जबरदस्तीने जबरदस्त भिजवलं. अशी जबरदस्ती करण्याचा आम्हाला हक्क आहे. (असं आम्ही गृहीत धरतो.) टॉवर तर थंडीने कुडकुडत होती, पांढरी फट्टक दिसत होती हिमयुगात वगैरे असल्यासारखी तिचे ओठही थंडीने काळे पडले होते, पण थोड्यावेळाने तीदेखील बर्‍यापैकी रुळली. आम्ही एकमेकांवर पाणी उडवत राहिलो, साचलेल्या पाण्यात फच्याक फच्याक पाय मारत लहान मुलांसारखे नाचलोही. हॉटेलच्या पायर्‍यांवरून धबधब्यासारखं पाणी वेगात खाली येत होतं, आम्ही त्या पायर्‍यांवर बसून, लोळून, पाणी अंगावर घेत, दुसर्‍यांवर उडवत, टपल्या मारत जाम दंगा केला. पावसाचा जोर कमी झाला तसे आम्ही झोपाळ्यावर बसलो. रिमझिम पावसात झोके घ्यायला मस्त वाटतं. झोपाळा बर्‍यापैकी मोठा होता, आठ-नऊ जण सहज मावतील एवढा मोठा. आम्ही सगळ्यांनी मिळून गाणी म्हटली, गप्पा केल्या, अभ्यास आणि नोकरी हे विषय कटाक्षाने टाळले. पावसाला पुन्हा हुकी आली त्याने पुन्हा जोर धरला. सिनेमातला खलनायक चार-पाच गोळ्या खाऊन गलितगात्र होतो, आणि मेला मेला असं वाटतानाच पुन्हा कोणाची तरी पडिक बेवारस बंदूक उचलून गोळ्या झाडतो असं काहीसं वाटत होतं. पण फरक इतकाच की इथे पाऊस नायक होता, आणि त्याच्या थेंबांचा शिडकावा, त्याची प्रत्येक सर झेलायला मिळणं हेच आमचं परमभाग्यच होतं. पावसाने पुन्हा जोर धरला. पायर्‍यांवरचं पाणी तर आता अधिकच शुभ्र दिसत होतं, आम्हाला खुणावत होतं, आम्ही पायर्‍यांवर पुन्हा बस्तान मांडलं. हॉटेलचं नाव प्रिती होतं, त्यामुळे 'प्रीतीचं झुळझुळ पाणी' असं त्या पाण्याला मी नाव दिलं. झाडं, घरं, दुकानं सारं धूसर दिसत होतं. पातळ सरींच्या पडद्याआडचं जग बघताना वाटत होतं हा पाऊस संपूच नये. 'पर्दे मे रेहने दो पर्दा ना उठाओ' पर काश ऐसा होता, पर्दा उठ गया और भेद भी खुलकर सामने आया, की बाबांनो आपण शहरी माणसं वाफ घ्यायला लागायच्या आधी अंगं कोरडं करून घेऊयात आणि गरमागरम चहा पिउयात, नाहीतर शिंकायला सुरवात झालीच आहे. आम्ही रुमवर परतलो हातपाय धुवून, कपडे बदलून चहासाठी बाहेर पडलो.


चहा पिऊन होतो न होतो तोच पत्त्यांचे कॅटस चुळबुळू लागले. काय खेळायचं ते ठरत नव्हतं. मुंगूस, चॅलेंज, मेंढीकोट, डॉंकीमंकी, अशी बरीच चर्चा चालली. प्रत्येकाची मनं राखून आम्ही सार्‍या फर्माईशी पुर्‍या करत गेलो. पावसाच्या सरी आत येतील म्हणून मी नुसतं लोटलेलं दार नीट बंद करायला उठलो. दार बंद करता करता जरा बाहेर नजर टाकली आणि दार बंद करायचं सोडून ते सताड उघडं टाकून मी बाहेर आलो. बाहेर वेगळच जग होतं, सारं स्वप्नवत, ही पृथ्वी नव्हतीच जणू आम्ही कुठेतरी ढगांच्या, पर्‍यांच्या राज्यात वावरत होतो. आमच्या आजूबाजूला सर्वत्र धुकं होतं, सांजेचं दाट धुकं. इतकं जवळनं धुकं मी फार कमी वेळा पहिलंय, हे धुकं तर अगदी जवळ थेट डोळ्यात डोळे घालून पाहत होतं. झाडाच्या पानापानातन पावसाचे राहिलेले थेंब निथळत होते, नुकत्याच स्नान केलेल्या युवतीच्या केसांतून निथळणार्‍या थेंबांसारखे. पावसाचे काही थेंब खरच भाग्यवान असतात, कुणाच्या बटांमधून निथळणारे, लहान मुलांच्या कोवळ्या हातावर विसावणारे, पानांच्या शिरातून हळूवार प्रवास करणारे, पागोळ्या होणारे किंवा खिडकीतून वार्‍याने एकलकोंड्या आजीच्या चेहर्‍यावर विसावणारे काही चुकार थेंब. पत्त्यांचा डाव केव्हाच फिस्कटला विंडशीटर काढलं आणि पुन्हा पायपीट करत मार्केट गाठलं.





धुक्याने माझ्या थेट डोळ्यात पाहिले ... आणि जे जे होते ते सारे मग धुकेच जाहले




क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा