नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, ११ जून, २००९

नास्तिक

मागे एकदा डोंबिवलीत 'आयुष्यावर बोलू काही' या श्री. संदिप खरे, आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला होता, तेव्हा संदिप खरेंनी सादर केलेली 'नास्तिक' ही कविता मला विशेष भावली. तसं बघायला गेलं तर त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात, पण 'नास्तिक' माझी सगळ्यात आवडती. मला सुचतच नव्हतं काही त्या दिवशी, वाटत होतं ती कविताच ऐकत रहावी, काही केल्या कामात लक्ष लागेना. मग याहू वर चॅट करता करता हे चित्र रेखाटलं, फायदा विशेष झाला नाही, अस्वस्थता कायम राहिली ...

२ टिप्पण्या:

  1. हो रे प्रसाद ... मी सुद्धा ठाण्याच्या 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमात पहिल्यांदा ही कविता ऐकली. शेवट तरं आरपार गेला. तू काढलेलं ते चित्र एकदम समर्पक आहे.

    (मला उगाच वाटले की थोडं अजून मोठ चित्र असतं तर देवळाबाहेर विचार करत उभा राहिलेला एक मनुष्य दाखवता आला असता.)

    उत्तर द्याहटवा
  2. मलाही खूप आवडतात त्यातली संदिप खरेंची गाणी, आणि कविता सादर करण्याची स्टाईल,

    ती सूर्याची किरणंच बघा कशी वाकडी वाकडी आलीएत, आधी आमची चित्रकला म्हणजे उजेड, त्यात माऊस पकडून चित्र काढताना हात जाम थरथरतो (नाचता येईना ..), तेव्हा देवळाबाहेर विचार करत असलेला मनुष्य काढायचा मी स्वप्नातसुद्धा विचार करणार नाही, कारण 25-30 वर्ष सहज लोटतील माझं ते चित्र पूर्ण व्हायला.

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद रोहनजी :)

    उत्तर द्याहटवा