नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

मंगळवार, २३ जून, २००९

दोन गुणिले बारा तास उसंत

दोन जांभया दिल्या
दोन तांब्या आंघोळ केली
दोन हात जोडले
दोन बिस्कीटे, चहा, पोहे रिचवले
दोन हाका आल्या
दोन डाव क्रिकेटचे टाकले
दोन रुपये बॉलला कॉन्ट्रीब्युशन

दोन स्टंपात भागले
दोन ओव्हर्स कुटल्या
दोन बॅटस विटल्या
दोन खेळाडू कुचकामी
दोन पडल्या धावा कमी
दोन सिगारेटचे मारले दम
दोन मागवल्या पानी कम
दोन थेंब त्यातलाच शर्टवर सांडला
दोन रुपयांचा सर्फ आणला
दोन चिमट्यांनी शर्ट वाळवला
दोन बसले कावळे शर्टवर
दोन दगड भिरकावले
दोन तुकड्यात काच फुटली
दोन शेजारी धावत आले
दोन सणसणीत हासडल्या
दोन झणझणीत परतवल्या
दोन काचा लावून दिल्या
दोन पदरच्या नोटा गेल्या
दोन कावळे पुन्हा दिसले
दोन उभ्या आठ्या पडल्या
दोन जहाल कटाक्ष टाकले
दोन कावकाव प्रतिसाद आले
दोन बायकोचे मिस्डकॉल्स आले
दोन वस्तू आणायला सांगितल्या
दोन चाकाची बाईक काढली
दोन गाड्यांमध्ये पार्क केली
दोन इसमांनी ती उचलली
दोन जणांना अडवले
दोन कबूल केले
दोन पदरच्या पुन्हा गेल्या
दोन लीटर दूध विसरलो
दोन मिनीटात आणून टाकले
दोन वाजता जेवलो

दोन क्षण पडलो
दोन कार्ट्यांनी उच्छाद मांडला
दोन दिले शिव्याशाप
दोन डोळे उघडले श्या!! नाईल्लाज
दोन हाका बायकोला दिल्या
दोन मिनीटात चहा आला
दोन घोटात तो गिळला
दोन-चार पेपराची पाने चाळली
दोन-एक तास टि.व्ही पाहिला
दोन घास जेवलो
दोन दिवसांची सुट्टी संपल्याचे
दोन अस्पष्ट हुंदके दिले


-प्रसाद 

४ टिप्पण्या:

  1. धन्यवाद सिद्धार्थजी,
    योगायोग म्हणजे तुम्ही प्रतिक्रियाही 'दोन' सप्टेंबरला दिलीत :)

    उत्तर द्याहटवा
  2. 'दोन-दोन'दा पोस्ट वाचली... मस्त कंसेप्ट आहे रे ... आवडला आपल्याला. सिंपल यट 'लई भारी' एकदम...

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद रोहनजी,
    धन्यवाद रोहनजी,
    दोनदा वाचलीत म्हणून दोनदा धन्यवाद केलं ... :)

    उत्तर द्याहटवा