कसं कळत असेल ना,
एक कंद घेतला काय,
रुजत घातला काय,
पाणी दिलं काय,
कौतुकं संपली काय,
सारं विसरलो काय,
पण तिच्या मात्र लक्षात होतं,
कसं कळत असेल ना.
मग कधीतरी कोंब फुटला,
मग तरारून वर यावसं वाटलं तिला,
मग मध्ये आभाळ कोंदट झालं,
मग मातीत ओलावा भिनला,
मग सरींची लड उलगडली,
तोच नेमका धागा पकडून तर वर आली नसेल,
कसं कळत असेल ना.
बरंय सालं कसलं प्लॅनिंग नाय,
करीयरचे चोचले नाय,
जबाबदाऱ्या नाय,
स्ट्रेस नाय,
घुसमट नाय,
गोळ्या नाय,
जमिनीची ढेकळं फोडत बिनधास्त स्वत:साठी वर यायचं,
कसं कळत असेल ना.
बरं आली तर आली खुशाल उमलते,
बरं आली मातीत जाणार मातीत तरी उमलते,
बरं सुकण्याची चिंता नाही,
बरं कसलं गांभीर्य नाही,
बरं कोणासाठी उमलते,
बरं हा दरवळ अस्तित्वाचा की मोक्षाचा,
बरं उमलणं उमगायला हवं दरवेळी?
एका बेभान क्षणाला आयुष्य म्हणणं,
कसं कळत असेल ना.
-प्रसाद साळुंखे
Badhiya
उत्तर द्याहटवाप्रतिक्रियेसाठी धन्यवाद
हटवास्वतःशीच मारलेलेल्या गप्पांची छान कविता झालीय!!
उत्तर द्याहटवाप्रतिक्रियेसाठी धन्यवाद अनिताजी
हटवा