नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

राजा आणि राणी

राजा आणि राणी बसले होते एकांतात
राजा बसला होता एकटक बघत दूर आसमंतात
राणी म्हणाली स्वारी आज गप्प का?
कारभाराचा ताण की युद्धाची भिती?
राजाने गंभीर चेहर्‍याने नकारार्थी मान दर्शवली
राजाचं असलं वागणं पाहून राणीची घालमेल बळावली
महाराज बोला काहीतरी असे गप्प राहू नका
मौन जिव्हारी लागतंय असे माझ्याशी वागू नका
डोळ्याला लागलं पदराचं टोक
सुटलं मौन थरथरले ओठ
मला राजा व्हायचं नव्हतंच पण कुणाला बोललो नाही कधी
वासराहक्काने आली माझ्या नशिबी राज गादी
निर्णय माझे मी कधी घेतलेच नाहीत
मला समजून घेणारे कुणी भेटलेच नाहीत
मला जन्मजात शत्रू होते
माझ्या आजूबाजूला घाम, हत्यारं, लढाया, रक्त, आक्रोश आणि अश्रू होते
मारलं त्यांना का मारलं? लुटालूटीतून काय साधलं?
साम्राज्याच्या विस्तार केला, शाही खजिना भरत नेला
राजधर्म हाच असं जेष्ठांनी सांगितलेलं
कळत्या वयात राजधर्म समजून युद्ध केली
नको वाटत असतानाही कत्तल सुरुच राहिली
मग राजा अधिकच हळवा होत म्हणाला
राजकुमार आहेत आता तुमच्यापोटी
त्यांनाही यातनंच जावं लागेल
माझ्यासारखं समजून उमजून रुक्ष, कोडगं व्हावं लागेल
म्हणून काल बातमी कळली तेव्हा आतल्याआत रडलो होतो
खाल मानेने देवघरातल्या देवाच्या पाया पडलो होतो
राणी राजाला बिलगली
कुणीच काही बोललं नाही
दूरवर आभाळात नजर लावून दोघे काहीतरी शोधत राहिले

-प्रसाद 

४ टिप्पण्या:

  1. Chaan aahe.........
    Rajachya manaat asehi kaahi asel asa wicharch aala navhata dokyat aaj paryant kadhi.....
    Gr8 job........

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार मैथिली,

    प्रतिसादाबद्दल धन्यवाद, :)
    शेवटी राजाही एक माणूसच ना?
    सामान्य माणसांसारखं त्याला त्याचं स्वत:चं असं भावनिक विश्व असतंच ना?
    सामान्य माणसांना निदान मनमोकळं रडण्याचं सुख तरी असतं,
    आणि लोक म्हणतात राजगृही जन्म म्हणजे भाग्याचं लक्षण ...

    उत्तर द्याहटवा
  3. खरे.. शेवटी राजा सुद्धा एक माणूसच. राजधर्माबरोबर त्याला स्वतःची दुख्खे भोगावी लागतातच... त्यासाठी त्याला कोणी सोबत नसते. कविता आवडली रे चुरया... :) कसा आहेस? मी बरेच दिवस गायब होतो... :)

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद रोहनजी,
    मी तब्येतीत,
    मीही गेला आठवडाभर तसा गायबच आहे :)

    उत्तर द्याहटवा