या नद्या काही माझी पाठ सोडत नाहीत आणि ' गोदावरी ' तर नाहीच नाही. हा सिलसिला सुरू झाला गावी नदीत पाय मुरगळण्यापासून, तेव्हा नदीला लाखोल्या वाहिल्या नसल्या तरी थोडासा खट्टू मात्र झालो होतोच. त्यानंतर काही दिवसांनी ' गोदावरी ' नावाचा नदीवर बेतलेला नितांत सुंदर सिनेमा पाहिला. त्यानंतर नर्मदामाईचा उल्लेख असलेलं थोडं वेगळ्या धाटणीचं ' तत्वमसी ' वाचलं. आणि आता तर हे पुस्तक खंगाळून सारे रुसवेफुगवे विस्मरून पुरता ' नदीष्ट ' झालोय.
बरेच दिवसांपासून खरं तर मनोज बोरगावकरांचं हे प्रसिद्ध पुस्तक वाचायचं मनात होतं. पण योग येत नव्हता. पुस्तक फारच अप्रतिम आहे. मूळात हा विषयच वेगळा आहे. निसर्गाशी एकरूप झालेला माणूसच हे भावबंधांचं नाजूक शिवधनुष्य अलवार पेलू शकतो. नदीचा हा घाट पायरी पायरीने उतरतांनाही वाटेत पडलेला आस्थांचा, संवेदनांचा प्राजक्तसडा पायदळी येऊ नये याचं भान लेखकाने मनोभावे जपलं आहे.
लेखकाला नदीवर पोहायचा नाद असते. जवळपास दहा वर्षे लेखक गोदावरीच्या तीरावर नित्यनेमाने पोहत असतो. नदीत पोहत असताना त्याला आईसोबत असल्यासारखं वाटतं. नदीत निवांतपण शोधणाऱ्याला भावनेच्या ओलाव्याची जाण निश्चितच असणार. याच जाणिवेने ओतप्रोत भरलेलं हे लिखाण आहे.
पुस्तकाची मांडणीही सुरेख आहे. प्रवाही लिखाण आहे, त्याला विशिष्ट ताल आहे वेग आहे, त्यामुळे पुस्तक खाली ठेववत नाही. भावनेचा हा काठ धरून गोदातीरी मानवी नातेसंबंधांची जी दिंडी निघालीय तिचं रूप केवळ अवर्णनीय. पुस्तक वाचतांना जसजशी दिंडी पाऊल दर पाऊल पुढे सरकत जाते तसतसं दिंडीत पुढे कोण सामील होईल ही उत्सुकता बळावते, आणि त्याचवेळी दिंडीत मागे काय उरणार हे गूढही आपल्याला अस्वस्थ करतं.
लेखक नदीतले आणि तिच्या आसपासचे बदल फार प्रभावीपणे मांडतो. नदी वाहती असल्यामुळे नव्या पाण्याची नित्यनवी नवलाई घेऊन नदी रोज नव्याने लेखकाला भेटते, त्याचप्रमाणे लेखकही त्या नव्या पाण्याचा, अनुभवांचा मुलामा लेवून एक नवी जाण, एक नवं भान, नवी समज घेऊन नदीवरून परततो.
नदीशी जोडली नाळ जपता जपता नदीकाठी असणाऱ्या माणसांशीही लेखक बंध निर्माण करतो. पुस्तकात एके ठिकाणी लेखक नदीच्या निर्जन तळावरची वाळू काढायचा प्रयत्न करतो, अशा या अवलियाने दुखावलेल्या मानवी मनाचा तळ न गाठला तर नवलच. विशेष म्हणजे हे नदीकाठी निरनिराळ्या कारणाने जमणारे लोकही लेखकासमोर आपलं अतर्मन मोकळं करतात. या गोतावळ्यात गुराखी, पट्टीचे पोहणारे वयस्क मित्र, देवळाचा पुजारी,मसणजोगे, मच्छीमार, सर्पमित्र, भिकारी, तृतीयपंथी या शिवाय माकडं, हरणं, रानमांजर, म्हशी, मोर, वरडोळी मासे असे बरेच जण सामील असतात.
नदीची वाळू उपसणाऱ्यांबद्दल बोलताना नदीच्या गर्भाला ते इजा करत आहेत असं लेखक म्हणतो तेव्हा आपण आतून ढवळून निघतो. या वाळूमुळे ठराविक अंतर वाहिल्यानंतर नदी आपसूक शुद्ध होते, कदाचित म्हणूनच समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले लोक त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या विचारांची जळमटं, नि दुनियादारीचा पाचोळा घेऊन नदीकाठी निवांतपणा शोधण्यासाठी येत असतील का?
लेखक अक्षरशः नदी जगलाय. नदीपासून त्याला वेगळा काढणं शक्य नाही एवढा समरसून जगलाय. नदीची विविध रूपं लेखकाने अनुभवली आहेत. नदीसोबतच नदीचा सभोवतालही पाहिलाय. काठावरच्या प्राण्यांच्या गमती कधी विक्षिप्त वागणं त्याने अनुभवलं आहे. काठावर भरल्या नदीसारखी भावनांनी काठोकाठ भरलेली माणसं त्यानी पाहिलीत. त्यांचं हिंदकळणंही लेखकाने तितक्याच हळवेपणाने टिपून घेतलं आहे.
हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या नदीवरच्या अनुभवाचा संवेदनशील घोटीव अर्कच म्हणावा लागेल. इतरांप्रमाणे नदीत वरचेवर भक्तिभावाने लेखक बंदा रुपया टाकत नसेलही, पण ही जितीजागती ओलीहळवी नदी आपल्या स्वाधीन करून आपलं अस्सल नाणं मात्र लेखकाने खणखणीत वाजवलं आहे.
खरोखरीच लेखक म्हणतो त्याप्रमाणे 'she is living organism', म्हणून तर पुस्तक मिटलं तरी गोदेचं हुंकारत खळाळणं कितीतरी वेळ आपल्याला स्पष्ट ऐकू येतं.