नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, ९ डिसेंबर, २००९

बंद मूठ







बंद मूठ घेऊन ती त्याच्या जवळ आली
'हे काय नवं?'
'काय असेल नवं? ओळख बघू?'
'कोडी घालत बसू नकोस सांगून मोकळी हो'...
आवाज चढलेला
चेहरा रडवेला
पटकन पकडतात माणसं
सॉरी ... जवळची माणसं

पण तिही मोठ्या हिमतीचीच
समजावण्याची पद्धत जगावेगळी
तिने नाही विचारलं झालंय काय?
भूतकाळ उगाळणं हा नसतो उपाय
मनात काही ठरवून ती हसत सुटली
अशा या वागण्याने स्वारी आणखीच चिडली

निमूट उठला
चालत सुटला
तिचं अस्तिव नाकारून
तिनेही दिले त्याचे सारे राग झुगारून

त्याच्या डोळ्यात थोडी थोडी दिसू लागली आग
पण हिला नव्हता उरला कुठलाच धाक

'रागावलास?
माझ्यावर की माझ्या हसण्यावर???
रागात भलताच दिसतोस गोड'
त्याचं उत्तर 'वाट सोड'

'जाता जाता मूठीत काय आहे ते तर सांग?'
'काय? काय आहे मूठीत?' वाक्यावाक्याला राग
'असं होतं माणूस रागात असेल तर
मूठभर सुखही दिसतं चिमूटभर
मूठीत माझ्या आहे
मुंगीची जिद्द जगण्यासाठी
वासराची धडपड चालण्यासाठी
अल्पायुषी फुलपाखराचं टवटवीत मन
घरट्यात साठवलेला एक एक कण
ही सगळी माणसं नाहीत त्यांना नाहीत दोन हात
म्हणून दु:ख कुरवाळत बसत नाहीत दिसरात
दिसतं का कुणी त्यातलं एकलकोंडं बसलेलं?
सगळ्यांच्यात असूनसुद्धा सगळ्यांच्यात नसलेलं?
त्यांना दु:ख असणारच पण ते सुख शोधत फिरतात
म्हणून थोडे जगले तरी ते पुरेपूर जगतात
आपण मरणाला टेकलो की वाटतं अरे जगायचं राहिलं
खूप वेळ शोक करण्यात गेला हे बघायचं राहिलं
ते पहायचं रहिलं'
त्याला पटलं चेहरा हसला थोडा
राग झाला शांत
ती शिरली त्याच्या मिठीत
पाहत बसले दोघे बूडता सूर्य निवांत

-प्रसाद 

४ टिप्पण्या: