नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

माथेरान 7

"ए ऊठ ना रे जायचय नं पॉईंटस बघायला?" असं अस्पष्ट काहीसं सकाळी ऐकायला आलं. मग लक्षात आलं अरे सहलीला आलोय नाही का? ऍन्ड्रू एकटी उठली होती आणि आम्हाला उठवण्याचे केविलवाणे प्रयत्न करत होती. एरव्ही तीर्थरुपांच्या एका आहेत आम्ही ऊठतोही पण या लिंबूटिंबूंना कोण दाद देतय. डोळे मिटून पुन्हा झोपलो ऍन्ड्रूनेही थोडा वेळ उठवायचा नाद सोडला. थोड्या वेळाने "उठा ना रे जायचं नाहीए का फिरायला?" अशी पिरपीर चालू झाली. माझा मोबाईलही उशीखाली गाढ झोपला होता, त्याला शोधला आणि बघितलं तर 7.15 च झाले होते. "पिकनिकला आलोय ना झोपू दे ना निवांत जरा" असं कसंबसं म्हटलं. ती कधीची उठलेली असल्यापैकी बर्‍यापैकी फ्रेश होती. म्हणून तिने कोणाची पांघरूणच खेच, कोणाला गुदगुल्याच कर असे उद्योग चालू केले. मी लाथा झाडून प्रतिकार केला नंतर कंटाळून ती एकदाची झोपली. सगळे सकाळी आठ वाजता सगळे उठले. काहींनी आंघोळी उरकल्या, काही गरम पाण्याच्या प्रतिक्षेत होते, गरम पाणी मिळायला जाम जिगजिक होती. "आधी सांगायचं होतं, आता हे शेवटचं देतोय" असं पुटपुटत का होईना पोरं प्रत्येक खोलीत पाणी पुरवत होती. माथेरानमध्ये पाणी अपुरं असलं तरी हॉटेलवाल्यांना ते मुबलक मिळतं असं बाजारात फिरताना दुकानदारांच्या गप्पात मी ऐकलं होतं. या गरम पाण्याच्या फंदात न पडता मी थंड पाण्याने यथेच्छ आंघोळ केली. मी थंडीचा जास्त बाऊ कधीच करत नाही. मला आठवतं महाबळेश्वरला आमच्या शाळेची सहल गेली होती भर हिवाळ्यात जानेवारीच्या सुमारास, तिथे स्ट्रॉबेरीचं शेत आम्हाला दाखवलं होतं, तिकडेच ते लोक स्टॉबेरीजचं ताजं आईस्क्रीम विकत होते, तेव्हा अख्ख्या ग्रुपमधल्या एकट्या मीच ते कोनवालं आईस्क्रीम खाल्लं होतं. मी डोक्यात हॅटही घातली होती, माझ्या आईस्क्रीम खाण्याकडे जो तो आश्चर्याने बघत होता. आमचे सर तर मला म्हणाले "हा तर गोरा साहेबच आहे, याला थंडीबिंडी काही नाही."

मी कपडे बदलेले, भांग पाडला आणि चहासाठी तयार झालो. काही मुलींची आंघोळ अद्याप बाकी होती त्या जेमतेम ब्रश करून चहाला आल्या. मी कॅमेरा गळ्यात अडकवूनच चहासाठी बाहेर पडलो. नाश्त्याला उपमा, चहा, ब्रेड-बटर असा बेत होता. उपम्यावर बेदाणे, टोमॅटो, कोथिंबीर मस्त उठून दिसत होती, आणि ब्रेड-बटरही मस्त ताटात मांडले होते, मला कशाचा फोटो काढायची लहर येईल काही सांगता येत नाही, मी कॅमेर्‍याने नाश्त्याचे फोटो काढले. हॉटेलमधले इतर लोकही चहासाठी बाहेर पडले होते. त्यात काही प्रेक्षणीय स्थळं होती. पेंगुळलेल्या डोळ्यांच्या मुलीही cute वाटतात हे मी पहिल्यांदाच अनुभवलं होतं. त्यातल्या काही तर इतक्या क्यूट की त्यांना बघून चहा ताजातवाना होत असेल. मला चहा पिण्याआधीच फ्रेश वाटत होतं. नाश्ता करता करता फोनमधला अलार्म आणि उठण्याची वेळ यांच्या तफावती बद्दल चर्चा चालू होती. मी 6.30 चा अलार्म लावून प्रत्यक्षात 8.00 ला उठलो होतो. अलार्म मित्राने कंटाळून बंद केला होता. मला म्हणावसं वाटत होतं की दीड तासाने उठायचं आहे हे समजायला मी दीड तास आधीचा अलार्म लावला होता. विशेष म्हणजे ऍन्ड्रू पहिली उठली होती आणि तिचीच आंघोळ अद्याप बाकी होती. सगळ्यांचं आटोपेपर्यंत 9.30 झालेच. मग आम्ही बाहेर पडलो, कालच कणीसवाला सकाळी कणसाबरोबर गोळेही विकत होता. सगळ्यांनी गोळ्यावर ताव मारला, ओठांचा चंबू करून जो तो गोळ्यातला रस शोषत होता. प्रत्येकाचे ओठ मजेशीर दिसत होते. मी तर गोळ्यावर गरमागरम कणीसही खाल्लं. मग आम्ही echo point च्या दिशेने निघालो. लाल पायवाटेने चालायला मस्त वाटत होतं क्वचित काही ठिकाणी ढगांना, झाडांना न जुमानता उन्ह पायवाटेवर सांडे, त्याच एक वेगळच texture तयार होई, पानांच्या सावल्या आणि उन्हाचे कवडसे पाय बांधून ठेवत होते. मी, मन्या आणि टॉवर हे सारं न्याहाळत सगळ्यात पुढे चालत होतो. तेवढ्यात आमच्या समोरून green vine snake (सर्पटोळ) सरपटत गेला. त्याची सरपटण्याची लकब फारच सुंदर होती, त्याचा पोपटी रंग लाल मातीवर उठून दिसत होता. मी फक्त "ए तो ब साप" एवढंच म्हटलं तर मला टॉवर आणि मन्याने ओढत जबरदस्ती पाठी आणलं, अगदी कॉलेजच्या भांडणात पारा चढलेल्या मुलाला पाठी खेचतात तसं, पण हे थोडंसं वेगळं होतं, इथे त्यांच्या लेखी तो ऍनाकोंडा होता जो आम्हाला गिळंकृत करून त्याचा ब्रेकफास्ट पूर्ण करणार होता. मी त्यांचं ओरडणं आधी थांबवलं, एल्फिस्टन आणि मी त्याचे फोटो काढू लागलो. तो तर अफलातून दिसत होता, हा थोडासा बुजल्यासारखा वाटला, तो पानात लपू पाहत होता. असे प्राणि बघितले की माझ्या अंगात मॅन वर्सेस वाईल्ड मधला ब्रिल संचारतो. त्याने एका episold मध्ये याच आकाराचा साप डोकं मोडून खाल्ल्याचं आठवलं. याचा रंग बघून याची चव रानूस फरसबीसारखी लागेल असे अंदाज मी बांधू लागलो. पण आधीच हेव्ही नाश्ता झाला होता, त्यावर गोळा आणि कणसंही पडली होती, आता त्यात पुन्हा फरसबीची भर नको म्हणून मी त्या सापाला म्हटलं "जा जीवाचं माथेरान कर" माझा गावचा काका सांगतो की हा पठ्ठ्या झाडावरून खाली असलेल्या माणसाच्या डोक्यात दंश करतो, आता हे कितपत खरं ते माहित नाही {इंटरनेटवर हा slightly poisonus असल्याचं म्हटलंय, त्यातही Asian green vine सापांना harmless म्हटलय) येणारे जाणारे काही घोडेवाले, घोड्यांवरचे पर्यटक थांबून सापाला बघत होते, चला बघता बघता आम्ही सापाला सेलिब्रिटी केला तर. त्याला त्रास न देता आम्ही वाटेला लागलो. राधा-कृष्ण मंदिर हा बोर्ड पाहिला, आणि मंदिर पहावसं वाटलं, खरं तर कालच्या धार्मिक गोष्टींचा विचार डोक्यात होता म्हणून राधा-कृष्ण मंदिर आम्हाला खुणावत होतं. कुठल्याही मंदिरात कृष्णाचं नाव आधी नसतं कृष्ण-राधा म्हणत नाहीत, ऐकायलाही वेगळं वाटत, राधा-कृष्ण असच नाव दिसतं राधेचं नावच पहिलं असतं. आम्हाला चर्चेत नेहाने सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी आठवत होत्या. राधा-कृष्णाचं दर्शन घ्यायला आम्ही अधीर झालो होतो. पायर्‍या उतरून मंदिरात पोहोचलो तर मंदिर बंद. म्हणजे नुसती कडीच होती. दार उघडावं की नाही यावर आमचं एकमत होत नव्हतं. आमचं मन खट्टू झालं, आम्ही नाईलाजाने निघायचा निर्णय घेतच होतो. इतक्यात शेजारच्या घरातल्या काकूंनी "दार उघडा दर्शन घ्या" असं सांगितलं. आम्ही दार उघडून आत गेलो, आणि राधा-कृष्णाच्या दर्शनाने आमचे डोळे दिपून गेले. राधा-कृष्णाच्या पांढर्‍याशुभ्र मूर्त्या होत्या, त्यांची वस्त्रही पांढरीशुभ्र होती, वस्त्रांना सोनेरी जरीचा काठ होता, आणि मध्येमध्ये सोनेरी चंदेरी टिकल्या होत्या. राधा-कृष्णाचे भावही प्रसन्न वाटत होते, त्यांनी सारं देवपण मोठेपण बाजूला ठेवलं होतं, ते आमच्यासारखे वाटत होते, म्हणजे कोणी ओळखीच भेटावं आणि सहज स्मितहास्य करावं तसे. सोनेरी बासरी पांढर्‍या हातात उठून दिसत होती, आणि दोघांच्याही हनुवटीवर छोटे चमचमते खडे लावले होते, आणि सोनेरी मुकूट तर त्यांची शोभा द्विगुणीत करत होता. इतकं सुंदर, तेजस्वी रुप असल्यावर सोळा सहस्त्र बायका असणं यात मला तरी काही नवल नाही वाटत, असं मी एरव्ही म्हटलंही असतं. पण काल नेहाने सांगितलेली कथा आठवली. पांडवांचा राजसूय यज्ञ चालू असतो. त्याचसुमारास एक ब्राम्हण मरण पावतो. त्याच्या पत्नीला तू राजसूय यज्ञात जा तिथले ऋषी तुझ्या पतीचे प्राण वाचवू शकतात असं सांगण्यात येतं. राजसूय यज्ञात खो घालण्यासाठी कौरवांकरवी केलेला तो एक प्रयत्न असतो. सांगितल्याप्रमाणे ब्राम्हण स्त्री पतीचं शव घेऊन राजसूय यज्ञाठिकाणी येते आणि घडला प्रकार सांगते. कुणालाच काही सुचत नाही की काय करावं, सारे चिंतातूर की हा आता अपशकून कसा टाळावा. अशात श्रीकृष्ण उठतो आणि "मी जर ब्रम्हचारी असेन तर हा ब्राम्हण उठून उभा राहिल" असं म्हणतो आणि ओंजळीतून पाणी सोडतो आणि आश्चर्य म्हणजे ब्राम्हण खरोखरीच उठून उभा राहतो. सगळे आ वासून बघत राहतात. अशा तर्‍हेने मुरलीधर ब्राम्हण स्त्रीला पतिचे प्राण मिळवून देतो आणि राजसूय यज्ञातला संभाव्य अडथळा दूर सारतो. मंदिरात मला नेहमीच प्रसन्न वाटत आलेलं आहे पण माधवाच्या सहवासात मला नेहमीपेक्षा जास्त प्रसन्न वाटत होतं. याला आणखीही कारणं होती जसं सकाळीच सकाळी साप दिसावा हा शकुन का अपशकुन असे बायकी प्रश्न मला पडले होते. पण नंदलालाला हात जोडून "तूच कर्ता आणि करविता" असं म्हणून मी निर्धास्त झालो. सगळे अडथळे दूर झाल्यासारखं वाटलं.

हं करा सुरुवात




पावाची रांगोळी




गोळ्याचं शिर्सासन




गोळ्याचं शोषण




एका हळुवार फुंकरीने गोळाही गार झाला




गोळा बासरीसारखाही धरता येतो तर




स्स्स्स्स्




पुन्हा मुरलीधर




एक मिनिट गोळा खातेय




मम्मीला कळलं तर वाली टूथपेस्टची जाहिरात आठवतेय



हल्ली फोटोग्राफीत मी भलताच रस घेतोय




ऑ कोंबतेय नुसता ऑ




आंबटचिंबट कालाखट्टा



आपणही ओझीच वाहतो की भावनांची, अपेक्षांची, अपेक्षाभंगांची, चुकांची, अपराधांची, दुःखाची, नितीची, देवाधर्माची, अपमानाची, थोडक्यात जगण्याची.




Green Vine Snake





सर्पटोळ




राधे-कृष्णा




लंगडा बाळकृष्ण




राधा ही बावरी




केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा




देव सर्वा भूतांठायी
क्रमश:

४ टिप्पण्या:

  1. खूप वर्ष गोळा खाल्ला नाही त्याची आठवण झाली. बाकी पोस्ट छान...

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार अपर्णा,

    बाकी गोळ्याला आईस्क्रीम, कुल्फी असलं काहीही replace करु शकत नाही हेच खरं, प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. :)

    उत्तर द्याहटवा
  3. अरे ... कुल्फी, आइसक्रीम असे सर्व-सर्व 'गोळा' केले ना तरी गोळ्याची सर नाही कशालाच... मस्त मज्जा येते आहे माथेरानच्या आठवणी वाचायला. पुढे वाचतो... आणि reply मध्ये रोहन बोल चायला. :P

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद रोहनजी,

    रोहनजी माफ करा तुम्हाला रोहनजी म्हटलेलं नाही आवडत हे मला माहित नव्हतं रोहनजी नाहीतर मी तुम्हाला कधी रोहनजी म्हटलं नसतं रोहनजी, 'जी' लावून आदर व्यक्त करतोय रोहनजी.

    उत्तर द्याहटवा