नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, ११ जुलै, २००९

सशाची वकिली



मला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबरा, कावराबावरा. मला आई गेटपाशी का सोडून जाते? वर्गात का नाही बसत? शिपाईकाका जबरदस्ती बखोटीला धरून वर्गात का बसवतात? असे एक ना एक अनेक प्रश्न. अक्षरओळख, अभ्यास, शाळा सगळीच प्रश्नचिन्ह, करीयर वगैरे तर डोक्याच्याही वरच्या (तसा आताही विशेष फरक नाही करीयर हे प्रश्नचिन्ह कायम आहे.)आई गेटपाशी घुटमळायची मान उंच करून सार्‍या पिल्लावळीत मला शोधायची, " आता निघते मी, नीट रहा" असं काहीसं नुसत्या हातवार्‍याने सांगायची. पण याउपर सहानुभूति मिळायची नाही. तरीही हरायचो नाही हुकूमी एक्का काढायचो, शेवटचं अस्त्र म्हणून भोकांड पसरायचो, शक्य तितक्या व्याकूळतेने अगदी अल्का आठल्येलाही लाजवेल असं भोकांड. मग हळूहळू माझ्या बाजूचा मग त्याच्या बाजूचा असं करत करत सामूहिक भोकांडाचा कार्यक्रम पार पडायचा, पण डाळ काही केल्या शिजायची नाही. मग हळू हळू आम्ही रुळलो, तुपली आपली टीम ना? म्हणत मित्र बनले. पण सगळ्यात पहिला मित्र बनला तो भिंतीवरचा ससुल्या. भोकांड पसरायचो तेव्हाही थोडासा पॉज घेऊन ससूल्याकडे बघायचो. पाहता क्षणीच गट्टी जमावी असा होता माझा ससुल्या.

शाळेत मजा यायची ती चित्रकलेच्या तासाला, तसं सुरुवातीला काही आठवडे सगळे तास चित्रकलेचेच असायचे. मी सश्याचं चित्र काढायचा प्रयत्न करायचो. पाटीवर ते जमेना पुढे वह्या वापरायला लागलो तेव्हाही सशाला कधी पोलिओ झालेला असायचा कधी गालगुंड आलेलं असायचं. निम्म्या पानांवर सशाची चित्र, एवढच काय सर्व वह्यांच्या मागच्या पानांवर ससे काढायचो. पांढर्‍या खडूवर जोर काढून चित्र रंगवायचो. एका पांढर्‍या खडूसाठी बाबांना नविन खडूपेटी हवी असे फर्मान सोडण्यात येई. त्यात रंग जर दप्तरात पसरले असतील तर पांढरा खडू पांढरा राहतच नसे. मग अशावेळी ससा नाल्यातल्या घुशीसारखा दिसे. पण ससा काढायची खुमखुमी मात्र कायम असे.

नंतर नंतर तर इतका रुळलो शाळेला की कंटाळा येऊ लागला. रोजचीच शाळा, अभ्यास, दप्तर उबग वाटू लागला सगळ्याचा. नव्याचे नऊ दिवस संपले होते आणि शिक्षकांचा स्वरही पूर्वीच्या इयत्तांसारखा प्रेमळ नव्हता. गृहपाठ, निबंधवह्या अशी बरीचशी वाढीव काम आम्हाला दिली होती. 'शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय' असं आमचं झालं होतं शनिवारची वाट बघायचो आणि रविवार संपूच नये असं वाटायचं. ससुल्याही बघणं व्हायचं नाही. अशातच एकदा बाईंनी ससा कासवाची गोष्ट सांगितली. बाई तर ससुल्याबद्दल आग ओकत होत्या. ससा गर्विष्ठ होता, शिवाय आळशी होता म्हणून शर्यतीत मागे पडला. कासव नम्र होतं, मेहनती होतं म्हणून शर्यत जिंकलं , असं बाई आम्हाला रंगवून सांगत होत्या. एवढंच नव्हे तर सगळ्यांनी कासवासारखं झालं पाहिजे असंही म्हणाल्या. मला उगाचच पाठीला बाक आल्यासारखं वाटलं. मला कळेना कासवासारखं दगड का व्हायला सांगताहेत बाई? मला खरं तर ही गोष्टच अजिबात म्हणजे अजिबातच पटली नव्हती. माझ्या मित्राची ससुल्याची बाजू मांडली पाहिजे असं राहून राहून वाटायचं, पण बाईंचा आदर, त्याहून त्यांच्या चष्मापाठच्या मोठाल्या डोळ्यांचा आदर, आणि छडीचा तर अतोनात आदर करायचो मी, म्हणून नाही मांडली बाजू. रात्री झोपताना डोक्यावरनं मिकीमाऊसची चादर घेतली, आणि चादरीआड डोळे मिटून दबक्या आवाजात ससुल्याला सॉरी म्हटलं.

शाळेत आलो तेव्हा भित्रा तर मीही होतो सशासारखा. आई-बाबा, शिक्षक आळशी, बिनडोक मलाही म्हणायचे. प्रत्येक गोष्ट उद्यावर कसं होणार या मुलाचं? ही चिंता आईच्या चेहर्‍यावर अगदी आजही दिसते.( अर्थात बाबांना खात्री आहे ह्या नालायकाचं काहीही होऊ शकत नाही.) ससा आणि मी एकाच नावेतून चाललोय असं मला नेहमी वाटतं.

मी खूप विचार करायचो ससुल्याचा. बाईंचा गैरसमज झालेला दिसतोय ससुल्याबद्दल तो नाही असा वागायचा. आता म्हटलं असेल गंमत म्हणून लावतो का शर्यत? पण एवढ्याने काय तो गर्विष्ठ झाला. आपण नाही का म्हणत मित्रांना बेट घेतो का? लागली का चायलेंज?

खरं तर सशाला इतका ग्रे शेड मध्ये दाखवायला नको होता. गंमत म्हणून शर्यत लावली आणि हरला, तर त्याचा केवढा इश्यू. जिंकला असता तर गोष्टच झाली नसती, ससाच तो जिंकणारच असं म्हटलं असतं याच लोकांनी.

काही आठवतय का या ओळी वाचून?
हिरवी हिरवी पाने
नि पाखरांचे गाणे
हे पाहूनिया ससा हरपला
खाई गार चारा
घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडेभोळे
गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
ससा तो ससा की कापूस जसा ...

हे गाणं ससा जवळचा वाटण्याचं आणखी एक कारण बनलं. मला ससा हळूहळू अजून चांगला कळू लागला. ससा होताच मुळात माझ्यासारखा थोडा स्वप्नाळू, थोडा रसिक ... आता हिरवी पानं, निसर्गसौंदर्य, टेकडीच्या पायथ्याची हवा या सगळ्यात सहाजिकच तो हरवून गेला. त्यानं थोडा चारा खाल्ला (राजकारणी नसून) आणि जरा अंग टेकलं, आणि नेमकं हेच यांना खटकलं, जरा कुठे बिचार्‍याने अंग टेकलं तर नव्या सुनेसारखं सशाला आळशी म्हणून मोकळे. अरे ससा आहे तो काय कांगारू नव्हे, दोन उड्यात टेकडीवर जायला. इवलासा जीव त्याला आराम वगैरे नको का? पण नाही सशाला शिव्या घालायच्या आणि कासवाचा उदो उदो करायचा. कासव मुळात दगड, अरसिक, त्याला उटी काय दादर टीटी काय दोन्ही सारखंच. नुसतं मान खाली घालून चालायचं, कसलं कुतूहल नाही की कौतुक नाही, नुसतं यंत्रासारखं चालायचं. मग तिकडे गुलमोहोर का बहरेना, वार्‍याची झुळूक का येईना, झाडांची सावली असो की रणरणतं उन्ह असो रामा शिवा गोविंदा नुसतं चालत रहायचं. workaholic कुठला. मला खात्री आहे सशाची आई त्याला नेहमी म्हणत असणार " ते बरोबरीचं कासव बघ कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही आपण भलं आणि आपलं काम भलं." कासवाला कुणी अध्यात मध्यात घेतलं तर ते जाईल ना? जन्मजात जपमाळ घेऊन जन्माला येणार्‍या खप्पड चेहर्‍याच्या माणसासारखं ते. कोण मैत्री करणार त्याच्याशी. ससुल्याला हरवलं तेवढीच काय ती achievement.

लहानपणी माझी बुध्दी वाजवीपेक्षा जास्त चालत असे. मला वाटायचं की टेकडीवरचं शंकराचं मंदिर ही finishing line असणार शर्यतीची. कासव पहिलं पोहोचलं ना म्हणून ते तेव्हापासून प्रत्येक शंकराच्या मंदिराबाहेर असतं. मी असं आईजवळ बोललोही मग तिने माझं म्हणणं आधी साफ खोडून काढलं, नंतर मला झोडून काढलं. मार खाल्ला खरा पण आतली गोष्ट कळली मला. देओप्पाची आणि कासवाची आधीच गट्टी होती तर. तरी म्हणतो ससुल्या हरेल कसा?

पुढे मला वेगवेगळे प्रश्न मला पडत गेले आणि माझ्या त्या त्या वेळच्या बुध्दीमत्तेनुसार मी उत्तरं देत राहिलो. बाप्पाला पांढर्‍या रंगाची फुलं आवडतात तर माझा शुभ्र ससुल्या का नाही आवडत? का नाही केली त्याला शर्यतीत मदत? लोकं दूषणं देत असताना रडवेल्या ससुल्याच्या पाठीवरून मायेचा हात का नव्हता फिरत? नेमकं काय चुकलं? स्वप्न बघणं ही का चूक? रसिक असणं यांत्रिक नसणं ही का चूक? आणि समजा सशाला जिंकायचीच नसेल शर्यत फक्त अनुभव घ्यायचा असेल शर्यतीचा तर त्यात चूकीचं ते काय? त्यानं जिंकायलाच हवं हा लोकांचा अट्टाहास का? सशाला सशासारखं जगू देत, कासवाला कासवासारखं वागू देत. प्रत्येक ससा कासव नाही बनू शकत, त्याला नसतच बनायचं, मी तर सांगतो बनूच नये, लोकांच्या सांगण्याने तर नाहीच नाही.

सशाबद्दल जीव तुटणं बरेच दिवस चालू होतं, अगदी आजही रात्री मध्येच जाग येते आणि सशाला दबक्या आवाजात सॉरी म्हणून मी झोपायचा प्रयत्न करतो.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असे काय दिवे लावलेत ओ कासवने? पुढे तो डास मारायचं विषच विकत बसला ना, त्याउलट माझा ससा सध्या त्याच्या नावाची डिटर्जंट कंपनी आहे, शिवाय मॉडलिंग तर चालू आहेच, मध्यंतरी एका प्रसिद्ध पापड कंपनीचा brand ambassador झाला होता म्हणे. कौतुक आहे कारण हरला तरीही त्यानं ससाच राहणं पसंत केलं. मानला हार के जितने वाले को बाजीगर .. नही नही ससुल्या कहते है.

१६ टिप्पण्या:

  1. कोण मैत्री करणार त्याच्याशी. ससुल्याला हरवलं तेवढीच काय ती achievement.>> sahi..ekdum..majjaa aali
    अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असे काय दिवे लावलेत ओ कासवने? पुढे तो डास मारायचं विषच विकत बसला ना>> bhannat
    त्याउलट माझा ससा सध्या त्याच्या नावाची डिटर्जंट कंपनी आहे, शिवाय मॉडलिंग तर चालू आहेच, मध्यंतरी एका प्रसिद्ध पापड कंपनीचा brand ambassador झाला होता म्हणे.>> LOL

    उत्तर द्याहटवा
  2. अरे वा केस जिंकली म्हणायची
    दामिनीच्या क्लायमॅक्समधल्या नायिकेसारखा (प्रतिक्षा लोणकर नव्हे, सनी-मिनाक्षीवाला दामिनी) सशाचा चेहरा हसू की रडू असा झालाय
    बाकी सशाला धीर आला तुमची दाद ऐकून

    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. कसला लिहितो आहेस रे ... एक्टर हटके विषय आणि त्यात झटके देणारे विचार... मस्तच. सश्याचे दुख्ख समजते आहे मला ... :)

    तू वाक्यांची सरमीसळ मस्तच करतो आहेस... यमक वगैरे जूळवणे सोलिडच. त्यामुळे वाचायला मज्जा येते आणि फ्लो सहीच लागतो..

    असाच लिहित रहा ... :)

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद रोहनजी,
    लिहितो आपलं जमेल तसं,
    प्रतिक्रियांचा तर सपाटाच लावलात आज तुम्ही, सवय नाहीए ओ मला एवढ्या टिप्पण्या वाचण्याची,
    पण मस्त वाटतय,
    अभिनंदन रे ससुल्या

    उत्तर द्याहटवा
  5. ससुल्या ... पुढचे लिखाण कुठे आहे ???? वाट बघतोय मी...

    उत्तर द्याहटवा
  6. वा अप्रतिम. जामच "आउट ऑफ बॉक्स" थिंकिंग.. मानलं तुला.

    "हे गाणं ससा जवळचा वाटण्याचं आणखी एक कारण बनलं. मला ससा हळूहळू अजून चांगला कळू लागला. ससा होताच मुळात माझ्यासारखा थोडा स्वप्नाळू, थोडा रसिक ... आता हिरवी पानं, निसर्गसौंदर्य, टेकडीच्या पायथ्याची हवा या सगळ्यात सहाजिकच तो हरवून गेला. त्यानं थोडा चारा खाल्ला (राजकारणी नसून) आणि जरा अंग टेकलं, आणि नेमकं हेच यांना खटकलं, जरा कुठे बिचार्‍याने अंग टेकलं तर नव्या सुनेसारखं सशाला आळशी म्हणून मोकळे. अरे ससा आहे तो काय कांगारू नव्हे, दोन उड्यात टेकडीवर जायला. इवलासा जीव त्याला आराम वगैरे नको का? पण नाही सशाला शिव्या घालायच्या आणि कासवाचा उदो उदो करायचा. कासव मुळात दगड, अरसिक, त्याला उटी काय दादर टीटी काय दोन्ही सारखंच. नुसतं मान खाली घालून चालायचं, कसलं कुतूहल नाही की कौतुक नाही, नुसतं यंत्रासारखं चालायचं. मग तिकडे गुलमोहोर का बहरेना, वार्‍याची झुळूक का येईना, झाडांची सावली असो की रणरणतं उन्ह असो रामा शिवा गोविंदा नुसतं चालत रहायचं. workaholic कुठला. मला खात्री आहे सशाची आई त्याला नेहमी म्हणत असणार " ते बरोबरीचं कासव बघ कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही आपण भलं आणि आपलं काम भलं." कासवाला कुणी अध्यात मध्यात घेतलं तर ते जाईल ना? जन्मजात जपमाळ घेऊन जन्माला येणार्‍या खप्पड चेहर्‍याच्या माणसासारखं ते. कोण मैत्री करणार त्याच्याशी. ससुल्याला हरवलं तेवढीच काय ती achievement."

    हा उतारा म्हणजे तर महान हाईट आहे एकदम. जबरदस्त !!

    उत्तर द्याहटवा
  7. नमस्कार रोहजनजी,

    जरा नव्या नोकरीत रुळायचा प्रयत्न करतोय, लिहीन काहीतरी चांगलं सुचलं की

    आवर्जून चौकशी केल्याबद्दल धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  8. मस्तच मित्रा!
    वर हेरंब ने ज्या उतार्‍याचा संदर्भ दिलाय ना तो उतारा खरोखरच सुंदर आहे!
    मजा आली वाचताना!
    सशाला पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  9. नमस्कार दीपक
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, शुभेच्छांबद्दलही
    बघूयात आता लिखाण कधी जमतंय :)

    उत्तर द्याहटवा
  10. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सारिकाजी :)
    येत चला चुरापावच्या गाडीवर

    उत्तर द्याहटवा
  11. Super like...
    last para tar __/\__ :D
    ब्लॉग सजेस्ट केल्याबद्दल रोहनचे विषेश आभार :)
    Out of box thinking आवडली

    उत्तर द्याहटवा
  12. धन्यवाद प्रियांका,

    तुझ्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने माझ्याही डोळ्याखालून जुन्या पोस्टस् गेल्या

    खाबू संस्थानाच्या राजांचेही ब्लॉग सुचवल्याबद्दल आभार :)

    उत्तर द्याहटवा