नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

सोमवार, ७ जून, २०१०

आपला लाडका गॅरी

ऑफिसातनं घरी येऊन मी पेपर चाळत बसलो. तेव्हा खूप वर्षांनी एक ओळखीचा चेहरा दिसला, म्हणून खूप उत्साहात बातमी वाचायला घेतली पण सारा उत्साहच मावळला. गॅरी कोलमनचं 26 मे च्या बुधवारी घरात पडण्याचं निमित्त होऊन निधन झाल्याची ती बातमी होती. हा गॅरी कोलमन आणि माझं नातं तसं जूनं. लहानपणी त्याची 'डिफरण्ट स्ट्रोक्स' नावाची मालिका मी न चुकता पहायचो. त्यातला ठेंगणासा, गोबर्‍या गालांचा, कुतूहलमिश्रित डोळे घेऊन वावरणारा व्दाड आणि उत्साही अर्नाल्ड नावाचा चिमुकला मला टिव्हीसमोर खिळवून ठेवायचा. हा अर्नाल्ड म्हणजेच गॅरी कोलमन. त्याच्या उत्स्फूर्त अभिनयाने आम्हा सार्‍यांना ताजतवानं करायचा. मी पाहिलेलं 'डिफरण्ट स्ट्रोक्स' ही हिंदीमध्ये भाषांतरीत केलेली मालिका होती. मूळ मालिका माझ्या जन्माच्याही अगोदर अमेरिकेत प्रदर्शित झालेली. तरी ही मालिका बघताना काही वेगळं बघतोय असं जाणवायचं नाही. हे विदेशातलं 'जाम भारी' वगैरे आहे असं वाटायचं नाही. गॅरी कोलमन आमच्यापैकीच वाटायचा, अगदी आमच्या शाळेतल्या वर्गातल्या बाकाबाकावर बसणार्‍या मूलांइतका आपल्यातला. अमेरिकेतल्या तुफान लोकप्रिय असलेल्या मालिकेचा तो स्टार आहे हे फार मागाहून कळलं.



निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही त्या विधात्याची कलाकृतीच, गॅरी कोलमन ही कलाकृती रेखाटताना विधात्याने जणू निराळे स्ट्रोक्सच कॅनवासवर रेखाटले. विनोदी अभिनेत्यांचा व्यक्तीगत आयुष्याला असलेली दु:खाची किनार याच्याही आयुष्याला होती. मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्याची वाढ खुंटली, ज्यामुळे त्याची उंची चार फूट आठ इंचाच्यावर गेलीच नाही, पैशाच्या गैरव्यवहाराबद्दल त्याने त्याचे आईवडिल, वकील आणि कायदेविषयक सल्लागार यांना कोर्टात खेचलं होतं. 2007 मध्ये तो शॅनॉन प्राइसही विवाहबद्ध झाला.
या नात्यातही घटस्फोट होता होता राहिला. हे आणि असे त्याच्या जीवनाचे अनेक पैलू बातमी वाचता वाचता समोर आले.

माझ्या मावसभावाला घड्याळ कळायचं नाही, एकदा त्याला मी विचारलं मग शाळेत किती वाजता जातोस, त्याने उत्तर दिलं "ती काळ्या मूलाची सिरियल संपली की म मी तयारी करतो" इतका हा पठ्ठ्या आमच्यासारख्या बच्चेकंपनीच्या दिनचर्येचा भाग झालेला.

बातमीबरोबरचा जवळपास पासपोर्ट साईजचा तो फोटो, आणि त्या चेहर्‍याचे भाव मला त्या अवस्थेतही ताजतवानं करून गेले. मित्रा जिकडे असशील तिकडे नक्कीच आनंदात असशील. हास्याची कारंजी उडवत असशील. तुला विसरणं शक्य नाही.


फोटो जालावरून साभार.

६ टिप्पण्या:

  1. अरे रे... वाईट वाटलं वाचुन... ही मालिका सोनी टिव्ही नव्याने सुरु झाला त्यावेळी येत असायची.. माझ्या आवडत्या मालिकेपैकी एक...

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार आनंदजी,

    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
    आले देवाजीच्या मना ... असं म्हणायचं आणि पुन्हा गुंतून जायचं आपल्याच कोषात

    उत्तर द्याहटवा
  3. Different strokes मी पण पहायची आवर्जून, खरंच वाईट वाटलं ही बातमी बघून . पण खरंच तू तंतोतंत वर्णन केलंयस त्या अरनॉल्डचं.

    उत्तर द्याहटवा
  4. ब्लोगर्स ट्रेकला येणार नाहीस???

    उत्तर द्याहटवा
  5. नमस्कार आशाताई,
    आज खूप दिवसांनी? पावसात चुरापाव चाखायची लहर येणारच :)
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  6. नमस्कार रोहनजी,
    काही कौटुंबिक कारणांमुळे मला नाही जमणार यायला,
    खरं तर मीच हट्ट धरला आणि मीच येत नाहीए खूप वाईट वाटतय,
    पण माझं सध्या इथे असणं खूप गरजेचं आहे,
    माफी करा खाबूराजे,
    जपून प्रवास करा, तब्येतीची काळजी घ्या,
    अतिउत्साही, अतिसाहसी आणि नवख्या ट्रेकर्सकडे विशेष लक्ष असू द्या,
    हॅपी जर्नी :)

    उत्तर द्याहटवा