नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

युगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे

'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण नंतर डॉ. सुमति क्षेत्रमाडे हे नाव वाचलं आणि निश्चिंतपणे पुस्तक वाचायला घेतलं.

ही कथा आहे युगंधरा म्हणजेच 'युगा'ची, तिच्या त्यागाची, तिच्या नितळ निर्व्याज्य प्रेमाची. अत्यंत हुशार असून सतत परिस्थितीशी जुळवून घेत, वेळप्रसंगी नमतं घेत जगणाऱ्या एका स्त्रीची. आपल्या वडिलांसाठी, कुटुंबासाठी ती सारं काही सोसते. या कुंडात पहिली आहुती पडते ती तिच्या प्रेमाची, मग स्वप्न होरपळतात, तिच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा या धगीने काळवंडतात. एवढं सारं होऊनही आयुष्यात काही विशेष साधत नाही, कारण तिचं आयुष्य हे तिच्यासाठी नसतंच मुळी, सतत दुसऱ्याची गैरसोय होणार नाही हे पाहताना, आपल्या सोयीने आयुष्य जगायची मुभा तिला नसते, तरीही बिनतक्रार हसतमुख राहून ती ते जग आपलं मानून समरसून जगते. पण तिचं नेमकं अस्तित्व काय, तिची मायेची माणसं नेमकी कोण हा प्रश्न वाचकांना पडल्याशिवाय राहत नाही.

कादंबरी वाचताना नायिकेचं जास्त सोशिक असणं कधी कधी खटकतं, पण हा काळ १९७० च्या आसपासचा आहे हे लक्षात ठेवावं लागतं.  आपल्या आजूबाजूला अशा अनेक 'युगा' आहेत ज्या स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देतात, प्रसंगी आपली स्वप्नं, महत्वाकांक्षा पणाला लावतात. 

पुस्तक वाचून झाल्यावर अशा माहितीतल्या अनेक 'युगा' आपल्याला आठवतात, पण यावेळी मात्र बदल म्हणून आपण त्यांच्याकडे एका वेगळ्या कौतुकमिश्रीत नजरेने पाहू लागतो, म्हणूनच प्रत्येकाने वाचून, समजून घेतली पाहिजे अशी ही 'युगंधरा'.

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

वासूनाका - भाऊ पाध्ये

गावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पुस्तक पण नावाजलेलं. पहिली आवृत्ती १९६५ ची. पानं १४० च्या आसपास. वाटलं अस्सं उडवू वाचून. पुस्तकावरच्या लेखात आंतरजालावर पाहिलेलं की बोल्ड पुस्तक आहे, म्हणजे १९६५ च्या मापदंडाने बोल्ड असावं असं वाटलं, तेव्हा तर युगूल गीतांच्या वेळी फुलाला फुलं टेकवायचे, आता कुठलाही अवयव टेकवायचा शिल्लक ठेवत नाहीत. असेच माझे आडाखे बांधत पुस्तक वाचायला घेतलं. प्रामाणिकपणे सांगायचं माझं वाचन फार नाही, पण वाचलेलं कळतं असा माझा समज होता. पण अगदी सुरुवातीला मला ही शैली कळली नाही. नंतर कळलं की वासूनाक्याचा एक मेंबर 'पोक्या' हा निवेदक आहे आणि त्याच्या विचारांनी हे पुस्तक लिहिलं आहे. जिथे अत्रेंची गल्लत झाली तिथे माझी काय गत. असो मग मला कळलं हे वासूनाक्यावरचे किस्से आहेत, आणि त्यांना नाक्यावरच्या गप्पांइतकं महत्त्व द्यावं. मग आपसूक अरे हा असं कसं बोलू वागू शकतो, समोरच्याच्या मनाला काय वाटेल, यांचे संस्कार काय, समाज कुठे चालला आहे वगैरे पांढरपेशे प्रश्न मला पडेनासे झाले. तसंही जबरदस्ती नव्हती जणू ते मेंबर डोळ्यात डोळे घालून सांगत होते नाही आवडला तर नको येऊ नाक्यावर, झेपेल ते वाचावं. पाच मिनिटांनी घरी जाऊ, दहा मिनिटांनी घरी जाऊ, शेवटची सिगरेट ओढून जाऊ करत जसे आपण आपल्या कंपूत रेंगाळतो तसा मी एक एक किस्सा वाचत सुटलो. १४० पानांचं पुस्तक म्हणजे व्यक्तिरेखा उभी करायला फार वेळ होता असं नाही, पण तरीही जे व्यक्तिचित्रण केलं आहे भाऊ पाध्येंनी त्याला तोड नाही. पोक्या, मामू, लंगडी घूस, बकुळा, सू, चम्या, सोम्या, फोमण्या परसू, सुर्वे मामा, डाफ्या, अच्चा, केशरवडी, पबी असे बरेच जण डोळ्यासमोर आपल्या ओळखीतले वाटावेत असे पक्के उभे केलेत. ही हटके शैली भन्नाट आहे. प्रत्येकाला भावेल असं नाही. पण फार उहापोह न करता केवळ व्यक्तिरेखेची मानसिकता आणि पुस्तकाची विशिष्ट शैली, नाक्याची स्थित्यंतरं, व्यक्तिरेखांचा अचाट प्रवास मांडण्याची ढब समजून घेतलीत तर समजायला सोपं जाईल, आणि कदाचित शैलीच्या प्रामाणिकतेचं आणि सातत्याचं कौतुक वाटेल. १९६५ चं लिखाण आज २०२१ मध्येही बोल्ड आहे, साचेबद्ध मानसिकतेला बोल्ड करण्याइतकं बोल्ड, मला वाटतं यातच सारं आलं. बघा वाचून झेपतोय का वासूनाका?

- प्रसाद साळुंखे

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

पोहरा - ह. मो. मराठे

हे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग 'बालकाण्ड' आणि दुसरा 'पोहरा'. माझ्याकडे पहिला भाग नव्हता म्हणून जे आहे ते वाचून बघू कळलं, मूड लागला तर पुढे वाचू म्हणत वाचन सुरू केलं. तसंही प्रस्तावनेत म्हटलेलं होतंच की ही स्वतंत्र आत्मकहाणी म्हणून वाचू शकता, आणि 'बालकाण्ड' ची शेवटची काही पानं वाचकांच्या सोयीसाठी प्रस्तावनेखाली छापली होती आणि काय हवं.

मग काय पुस्तकातल्या १३ वर्षांच्या हनूचं इवलंसं बोट धरून माझा प्रवास सुरू झाला. या हनूची दिनचर्या काय, खातो काय, शाळेत जातो का वगैरे प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. शाळेत जाणे, मधल्या सुट्टीत डबा फस्त करणे, घरी येणे कपडे बदलून खाऊ खाऊन पुन्हा खेळायला जाणे इतका साधा सोपा दिनक्रम हनूच्या नशिबी नव्हता. घरी बाईमाणूस नसल्याने रांधणं तेही चूलीवर हनूच्या नशिबी आलं. अगदी चूलीसाठी लाकडं फोडण्यापासून, जमिन सारवेपर्यंत सारं. परिस्थिती बेताची असल्याने भटपणाची कामं शिकणं त्याला भाग होतो. या सोबत कसरत होती मागे पडलेलं शिक्षण घ्यायची. या सगळ्याला साथ होती ती मोठ्या भावाची. ही धडपड हा जिद्दीचा प्रवास अनुभवण्यासाठी ही आत्मकथा जरूर वाचावी. अजून एका गोष्टीसाठी हे पुस्तक वाचवं ते लेखकाचा लेखक म्हणून प्रवास कसा होतो ते पाहण्यासाठी.  शाळेत जाऊ लागल्यावर हनूला अवांतर वाचनाची ओढ लागते, पुढे कधीतरी अरे मलाही हे जमेल की असं वाटतं, मग त्याला कधी कवितेची ओळ स्फुरते कधी नाटकाचे संवाद. आणि हे आपल्याला कसं सुचलं याने हनूही अचंबित होतो. हे असं कष्टाचं बालपण आणि दिवसभराच्या कामाच्या रामरगाड्यात कुठे जोपासली असेल त्याने ही रसिकता, सर्जनशीलता. का जे मुरलं ते झिरपलं या न्यायाने लहानपणापासून मुक्याने सहन केलेले हुंदके, फावल्या वेळातलं अवांतर वाचन आणि भटपणाच्या कामामुळे मंत्रोच्चारामुळे अवचित कानावर घडणारे संस्कार याची सरमिसळ होऊन हनूतला संवेदनशील लेखक उमलत गेला.

पुस्तकाची भाषाही मस्त आहे, जास्त करून मालवणी आणि काही प्रमाणात चितपावनी वाचतांना हनूच्या बालपणाशी, मालवणच्या मातीशी आपण अजून घट्ट जोडले जातो. वाक्यावाक्याला आवशीन खाव, शिरा पडली म्हटलं कीच अस्सल मालवणी संवाद तयार होतो हा अपसमजही दूर होतो. वाचताना पुढे पुढे आपण बऱ्यापैकी गुंतत जातो, हनूला होणाऱ्या त्रासांनी आपण हळवे होतो आणि  हनूच्या एकेका यशागणिक आपली छाती फुलू लागते, ही खरंच या लेखनशैलीची कमाल आहे.

आईने जेव्हा पुस्तकाची स्वस्त किंमत सांगितली त्याच्या दुसऱ्या मिनिटाला मी मनातल्या मनात पुस्तकाचा दर्जा ठरवला होता. माझे अंदाज साफ चुकले याचा मला आनंद आहे. पुस्तक निश्चित दर्जेदार आहे. आता पुस्तकाचा पहिला भाग वाचायची कमाल उत्सुकता आहे. लिहीन कधीतरी त्यावरही पुढेमागे.

- प्रसाद साळुंखे

सोमवार, १३ जुलै, २०२०

शितू - गो. नी. दांडेकर

शितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला विसू हा अप्पा खोतांचा महाव्रात्य मुलगा आणि त्यांच्या गावातलीच विसूची समवयस्क पण समजदार, जबाबदार, सगळ्यांची काळजी घेणारी पण दोन नवरे गिळल्याचा ठपका असलेली निरागस मैत्रिण शितू. या दोघांमध्ये हळूवार खुलणारी ही प्रेमकहाणी.  हे निर्मळ प्रेम नितीमूल्यांवर जोखता न येणारं, समाजमान्य नसणारं असं. विसू व्रात्य असला तरी प्रेमळ आहे, हे तो शितूला मार खाण्यापासून वाचवतो या प्रसंगापासून कळतं. मग हळूहळू खोडसाळ विसूमध्ये कोणीही न अपेक्षिलेले घडत जाणारे बदल अनुभवायला मस्त वाटतं. एक गावावरून ओवाळून टाकलेला विसू ते जीव ओवाळून टाकावा असं वाटायला लावणारा विसू हा प्रवास हेच शितूच्या प्रेमाचं यश. या प्रवासाला साथ द्यायला आहे नयनरम्य कोकण. मग ती कोकणी वाड्यांची, खाड्यांची केलेली वर्णनं केवळ अफलातून. हा कोकणी साज या कथेला वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवतो. प्रस्तावनेत म्हटलंय तसं शुद्ध प्रेम फलस्वरुप आहे, जशी चंदनाची झाडे. फळे न येताही जीवन कृतार्थ झालेली. नक्की वाचावी अशी ही प्रेमकहाणी. 


- प्रसाद साळुंखे

गुरुवार, ९ जुलै, २०२०

तत्पुरूष - कविता महाजन

कधी कधी आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात. ' तत्पुरुष ' या कवितासंग्रहाचा असाच एक किस्सा. वाशीला सेंटर वन मॉलच्या समोर एक पुस्तकांचं दुकान आहे. सहज टाईमपास म्हणून त्या दुकानात मी गेलो होतो. वापरलेली मराठी पुस्तकं तिथल्या एका टेबलावर विक्रीसाठी मांडलेली दिसली. त्या पुस्तकांच्या गर्दीत या पुस्तकावर नेमकी नजर पडली. 'तत्पुरुष' नाव त्याखाली 'कविता महाजन' लिहिलेलं वाचलं मात्र चालू ट्रेन धावत पकडून विंडोसीट लगबगीने बळकवावी तशा लगबगीने ते पुस्तक ताब्यात घेतलं. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील माहिती वाचून कळलं की हा कविता ताईंचा पहिला कवितासंग्रह आहे. त्यांचं 'भिन्न' आणि 'ब्र' वाचलेलं असल्यामुळे हे गुलाबी प्रेमाचं, अत्तर आणि गुलाब पाकळ्या परलेलं पुस्तक नसणार याची खात्री होती. काय असेल नेमकं ही उत्सुकता होती, मग पटपट दोन चार पुस्तकं उचलली, चटचट पैसे देऊन मी घरी आलो. घरी आल्यावर पहिलं पान उघडतोय तोच एक पेनाने लिहिलेला मजकूर दिसला ' प्रिय श्री. पाटकर यांना सप्रेम भेट' आणि त्याखालोखाल कविता महाजन यांची मराठीतली स्वाक्षरी पाहून सुखद धक्का बसला. हे म्हणजे भंगारात खरेदी केलेल्या कपाटाच्या कोनाड्यात सोन्याची बिस्किटं मिळावीत असं झालं. मी ती स्वाक्षरी मेडल मिळाल्यासारखी सगळ्यांना दाखवत सुटलो. पण मनात वाईट वाटत होतं असं प्रेमाने कोणालातरी दिलेलं कवयित्रीच्या स्वाक्षरीचं पुस्तक कोणी का विकलं असेल. ते जे कोणी श्री. पाटकर होते त्यांना बोल लावावे की धन्यवाद द्यावे अशा संभ्रमावस्थेत मी ते पुस्तक वाचायला घेतलं, आणि पहिलीच कविता वाचली ती ही.

'कवितेचं असं अंगभर उधाणून
धुमसत राहणं
नसतं परवडणारं ...

कविता कागदावर उतरली पाहिजे
बोटं छाटली जाण्याच्या आत! '

बापरे पहिलीच कविता वाचून मी गार झालो. ओपनरचं स्वागत खत्रूड जलदगती गोलंदाजाने तुफान वेगाच्या बाऊन्सरने केलं होतं. कानाला फक्त हवेची चपराक जाणवावी तसा सुन्न झालो. काय झालं, काय वाचलं क्षणभर कळलंच नाही. थोडा ब्रेक गरजेचा होता मानसिक तयारीसाठी.

ही फक्त झलक होती त्यांनी पेरलेल्या विस्तवाची. यातल्या काही कविता अनुष्टुभ, आशय, कालनिर्णय, चंद्रकांत, प्रतिष्ठान, मिळून साऱ्याजणी, तरुण भारत, मौज या नियतकालिकांतून पूर्वी प्रकाशित झाल्या होत्या. या कवितांना इंदिरा संत, प्रभा गणोरकर, शंकर - सरोजिनी वैद्य, ना. धो महानोर अशा दिग्गजांची दादही मिळाली होती. हा कवितासंग्रह अनेक अर्थांनी वेगळा आहे या कवितासंग्रहात कविता महाजन मानवी नातेसंबंधांवर भाष्य करतात. मालक, गुलाम, साखळी या रूपकांचा चपखल वापर करत त्या नवरा-बायको नात्यांमधल्या दांभिकतेवर आसूड ओढतात. त्यांच्या कवितेत जाळ आहे, विखार आहे, विद्रोह आहे, बंडखोरी आहे त्याचवेळेला मनाच्या हळव्या कोपऱ्यात एकाकी उसासे घेणारी संवेदशीलताही आहे. मालक - गुलाम हा प्रवास मांडतांना त्यांनी मांडलेले मुद्दे पटतात.  कधी कधी पुस्तक बंद करून आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे की काय, आपण तर असे नाही ना? असा विचार करायला या कविता भाग पाडतात. यातल्या काही कविता कमालीच्या बोल्ड आहेत. 'प्रतिक्षा' सारखी कविता आहे, ज्यात स्त्रीच्या रात्री अर्ध्या कपड्यात बिछान्यावर पडून राहून केल्या जाणाऱ्या लाखो घरातल्या रोजच्या प्रतिक्षेचा उच्चार आहे, या कवितेचा शेवट 'स्वत:शिवाय?' असा त्या करतात, तेव्हा आपण पुन्हा सुन्न होतो. नक्की वाचावी अशी ही प्रतिक्षा. अशीच शृंगार नावाची एक अंगावर येणारी कविता आहे. यात त्या लिहितात

'ठसठशीत कुंकवासाठी एक कुयरी,
निरी उकलण्यापुरती तरी एक चिरी,
काळ्याभोर मण्याचं मंगळसूत्र,
गच्च हातभर काकणं.
कुड्या कानाची पाळी ओघळतील अशा,
नीट बोलूही न देणारी नथ,
सारा शृंगार काटेकोट जमला आहे.
पायांतील साखळ्याच तेवढ्या जरा
हलक्या वाटतात मालक
पहा ना
त्या घालून चालताही येतंय मला ...'


या कविता अंगावर येतात, खडबडून आत कोणीतरी काहीतरी जागं केलंय अशी मनाची अवस्था होते. मालक गुलामांचा हाच प्रवास त्या पुढेपुढे रंगवत जातात. आणि एक एक कविता वाचून आपल्या मनात प्रश्नचिन्हांचा गुंता वाढत जातो. जसं मालक गुलामांचं पुढे काय होतं? गुलामांच्या स्वप्नांना अर्थ राहतो का? मालकांना गुलामांची सवय होते का? गुलाम बंडखोरी करतात का? की मुर्दाड, भावनाशून्य, कोरडे, बथ्थड होत जातात काळानुरूप मालकांसोबत राहून राहून? गुलाम नसलेल्या बायकांचं काय त्या स्वच्छंदी की सार्वजनिक? त्यांना हेवा वाटतो का गुलाम असलेल्या बायकांच्या ज्या शालीनतेचा पदर जाणीवपूर्वक त्यांच्यासमोर ओढून घेतात? की गुलाम असलेल्या बायकांना हेवा वाटतो गुलाम नसलेल्या बायकांच्या ज्या निदान मनासारखी एक ओळ तरी गुणगुणू शकतात स्वच्छंदपणे? अशा अनेक विचारांच्या महाकाय लाटांवर आदळत आपटत आपली नाव निष्फळ किनारा शोधत राहते फक्त. नेमका किनारा काही गवसत नाही. मनाची अस्वस्थता कायम असते, आणि विचारांच्या चक्रागणिक या वादळाचा व्यास फोफावतो.

म्हटलेलं ना गुलाबी नाही. जे काही हिरवं, निळं, जांभळं, लाल, काळं ते निश्चित उष्ण आणि उठावदार, मनावर धीरगंभीर ओरखडा उठवणारं आहे. काही ओरखडे जिवंतपणीच अनुभवायचे असतात. नक्की वाचा.


- प्रसाद साळुंखे

मंगळवार, ७ जुलै, २०२०

'मधुशाला' - हरिवंशराय बच्चन

कविता आवडणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असावं असं हे एक अफलातून पुस्तक. या पुस्तकाद्वारे हरिवंशराय बच्चन यांनी फार मायेने, आणि अत्यंत विश्वासाने त्यांच्या प्रिय मधुशालेला वाचकांच्या हवाली केलं.

वयाच्या २७-२८ व्या वर्षी हरिवंशराय बच्चन यांनी 'मधुशाला' लिहिली. नावाप्रमाणे मधुशाला मदिरा, मदिराक्षी नि मदिरालय या गोष्टींभोवती या कवितेची कडवी फिरतात. अशी जवळपास १४० च्या आसपास कडवी त्यांनी लिहिली. आणि यातल्या प्रत्येक कडव्याचा शेवट मधुशाला ने होतो. १९३३ साली काशी विश्व हिंदू विद्यालयात एका कविता संमेलनात बच्चनजींनी मधुशाला सादर केली. एकतर कवितेचा अंगभूत ठेका आणि तरुणाईला आवडणारा विषय त्यामुळे मधुशाला फार थोड्या दिवसांत लोकप्रिय झाली.  महाविद्यायीन तरुणांना मधुशालाची कडवी तोंडपाठ झाली,  मधुशाला आवडीने कट्ट्यावर गुणगुणू जाऊ लागली. कविता संमेलनासारख्या साहित्य या विषयाला वाहिलेल्या कार्यक्रमात चक्क महाविद्यालयीन तरुण गर्दी करू लागले, आणि बच्चनजींना मधुशाला सादर करण्याच्या फर्माईशी येऊ लागल्या. एकूणच मधुशाला ने आगमनापासून धमाल उडवली होती. बच्चन नावाचं वलय जंजीर पासून सुरु झालं असं आपण आपलं म्हणतो, पण वलयाची खरी सुरुवात १९३३ पासूनचीच.

वर म्हटल्याप्रमाणे मदिरालय हा एकच धागा घेऊन एखादा कलाकार त्यात काय काय विचार गुंफू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधुशाला.  पुष्पमाला म्हणून ती नितांत सुंदर आहेच, पण यातल्या प्रत्येक फुलानेही आपलं वेगळं सौंदर्य आणि मनमोहक गंध उराशी आजही जपला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर काही ठिकाणी बच्चनजी धर्मभेद, जातिभेद यांवर भाष्य करतात, साम्यवादाचा पुरस्कार करतात, जसं ही कडवी पहा

मुसलमान औ' हिन्दू हैं दो,
एक, मगर, उनका प्याला,
एक, मगर, उनका मदिरालय
एक, मगर, उनकी हाला;

दोनों रहते एक न जब तक
मस्जिद - मन्दिर में जाते;
वैर कराते मस्जिद - मन्दिर
मेल कराती मधुशाला !

कभी नहीं सुन पड़ता, 'इसने,
हा, छू दी मेरी हाला',
कभी न कोई कहता, 'उसने
जूठा कर डाला प्याला;

सभी जाति के लोग यहाँ पर
साथ बैठकर पीते है;
सौ सुधारकों का करती हैं;
काम अकेली मधुशाला |

साम्यवादाबद्दल मत मांडताना म्हणतात,

रंक-राव में भेद हुआ है
कभी नहीं मदिरालय में,
साम्यवाद की प्रथम प्रचारक
है यह मेरी मधुशाला |

तर कधी आयुष्याचा शेवट कसा असावा यावर ते विनोदबुद्धीने भाष्य करतात.

मेरे शव पर वह रोए, हो
जिसके आँसू में हाला,
आह भरे वह, जो हो सुरभित
मदिरा पीकर मतवाला

दें मुझकों वे कंधा जिनके
पद मद - डगमग होते हों,
और जलूं, उस ठौर, जहाँ पर
कभी रही हो मधुशाला

तर पुढच्याच कडव्यात श्राद्धाबद्दल लिहितात,

प्राणप्रिये यदी श्राद्ध करो तुम,
मेरा, तो ऐसा करना
पीनेवालों को बुलवाकर,
खुलवा देना मधुशाला

असे नानाविध विषय त्यांनी कल्पकतेने या मधुशालेत मांडलेत. एवढं सगळं लिहिणारा म्हणजे अट्टल दारुडा असणार याची आपल्याला खात्री होते, बच्चनजींना अशा बऱ्याच शंका विचारून विद्यार्थ्यांनी भंडावून सोडलं, पण बच्चनजी दारूला स्पर्श करत नसत. त्यांनी दारूचा पुरस्कारही केला नाही. काहीजण केवळ दारू या विषयी गमतीशीर वाचायला मिळेल म्हणून या प्याल्यावर घोंघवतात, मात्र फक्त मोजके रसिक या प्याल्यातल्या अर्थाच्या अर्कापर्यंत खोल शिरू शकतात. म्हणून बच्चनजी म्हणतात,

जितनी दिल की गहराई हो,
उतना गहरा है प्याला;
जितनी मन की मादकता हो,
उतनी मादक है हाला;

जितनी उर की भावुकता हो
उतना सुन्दर साक़ी है,
जितना ही जो रसिक, उसे है
उतनी रसमय मधुशाला

मधुशाला बद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असण्याचा निश्चित संभव आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी १९३३ साली लिहिलेल्या या मधुशालेची आजच्या वाचकांवरही नशा कायम आहे. म्हणतात ना वाईन जुनी झाली की अधिक चवदार होते तसं काहीसं. आयुष्यात एकदा तरी तोंडी लावावा असा हा अस्सल रसरसता प्याला रसिकांनी जरुर चाखावा.

- प्रसाद साळुंखे

सोमवार, ६ जुलै, २०२०

धुमारे - माधवी देसाई

म्हणतात ना 'don't judge a book by its cover' तसं काहीसं या पुस्तकाबाबत झालं. पुस्तक घेऊन फार दिवस झाले पण वाचायचा योग काही येत नव्हता. एक तर छोटं पुस्तक आहे नंतर वाचून काढू असं करत ते मागे राहिलं. आणि दुसरं म्हणजे त्याचं ओकंबोकं मुखपृष्ठ. ते पाहून उगाच गैरसमज होतो की काहीतरी उदासीभरं आहे हे प्रकरण. त्यात माधवी देसाईंचं 'नाच गं घुमां' आधी वाचलेलं त्याचा ठसा मनावर निश्चित होता, त्या वातावरणात काही पूर्वग्रह किंवा अपेक्षा ठेवून मला हे पुस्तक हाती घ्यायचं नव्हतं. नंतर एकदोन ठिकाणी लोकांना या पुस्तकाबद्दल भरभरून बोलतांना, लिहितांना पाहिलं आणि चूक माझ्या लक्षात आली. मग पुढच्या एक दिवसात हे पुस्तक वाचून काढलं.

'धूमारे' या पुस्तकात गोयच्या भूमीवर लिहिलेले पंधरा लेख आहेत. गोवा म्हणजे फेसाळती बियर, उघडेबागडे फोरेनर्स एवढंच मर्यादित नाहीये याची आपल्याला नव्याने जाणीव हे पुस्तक करून देतं. आपण गोव्याच्या अंतरंगात माधवी ताईंचं बोट धरून शिरतो. त्यांच्या संवेदनशील नजरेने इथला निसर्ग, इथली माणसं आपण पाहतो. हे सरधोपट प्रवासवर्णन असं नाहीये. एखाद्या ठिकाणी आपण बराच काळ राहिलो तर त्या भूमीशी त्या वास्तूंशी आपले बंध तयार होतात, तिथे आपली मूळं आपसूक रुजतात, तिथल्या झाडापेडांशी आपलं हितगूज सुरू होतं. आपुलकीची जी माणसं भेटतात आपण त्यांना आणि ती आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतात, त्या डोळ्यात स्नेह असतो, आपलं एक पान त्या डोळ्यात दडलेलं असतं, नुसतं डोळ्यात पाहून आपण स्वतःला वाचू शकतो. गाईडच्या भूमिकेत एखादी वास्तू, निसर्ग, तारीखवार इतिहास सांगणं वेगळं आणि आपल्या मनातील या साऱ्या सभोवतालाविषयीचे प्रामाणिक भाव व्यक्त करणं वेगळं.

१९९० साली म्हणजे जवळपास तीस वर्षांनी माधवी ताई त्यांच्या बांदोडा या गावी परतल्या. जागा तीच पण वयाच्या १६ व्या वर्षी पाहिलेलं गोवा आणि साठीत समजलेलं गोवा या दोन्ही गोष्टी त्यांनी कुतुहलाने तोलून पहिल्या, आणि मांडल्याही. गोवा म्हणजे विविध संस्कृतीची सरमिसळ. त्याचे समाजावर झालेले बरेवाईट परिणाम या पुस्तकात मांडले आहेत. परकीय राजवट असून आणि आता स्वतंत्र घटक राज्य असून जपलेल्या चालीरीती, समाजात परकीय राजवटीमुळे आलेला एक मोकळेपणा सारं त्यांच्या लेखणीतून झरझर उतरतं.  त्यांचं लिखाण समुद्राच्या पाण्यासारखं नितळ, ओघवत्या शैलीचं, गजाली गप्पांच्या लाटाच जणू. म्हणून पुस्तक एकदा वाचायला घेतलं की खाली ठेववत नाही.

देवचार, कोपेल, पायलट, तळी, पालखी, फुलराणी लेखांच्या नुसत्या नावावर नजर फिरवली तरी काहीतरी वेगळेपणा असणार लेखात हे कळतं. गमतीची बाब म्हणजे सलमान, संजय दत्त, चंकी पांडे, दिव्या भारती विषयी त्याकाळी भाबड्या लोकांना असलेलं आकर्षण, गजालीत सिनेमा, राजकारण, दाऊद इब्राहिम हे आलेले विषय, तिथल्या लोकांची त्यावर गमतीदार टिपण्णी हे सारं वाचायला मस्त वाटतं. डोना पॉला ची प्रतिक्षा त्यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. गोवन स्त्रियांमधला काळानुरूप झालेला बदल काही ठिकाणी त्या अधोरेखित करतात. पूर्वीचं गावपण कसं मागे पडत गेलं हे त्या सांगतात, तरी जे काही शिल्लक आहे ते निराशाजनक निश्चित नाही अन्यथा त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातील विश्वासाने विसवायचं ठिकाण म्हणून त्यांनी हे गाव निवडलं नसतं.

इथल्या भाषेतली मौजेची गोलाई आणि माधुर्य माधवी ताई न टिपतात तर नवल. पुस्तक वाचून झालं तरी काय बरं ते गाणं होतं म्हणून पानं पुन्हा चाळली जातात आणि गुणगुणायचा प्रयत्न होतो.

... आलयली डोलयली पंटी पालयली
सांग गे बाये, तुका कोणे चोरून वेल्यान गो बाये ...
आंव तुजो सदाच मोग करतलो गे बाये
आणि तुका हाव केन्नाच विसरचो ना गे बाये


- प्रसाद साळुंखे