नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

सुख

... मी येतो म्हणत डोळ्यासमोरून सुख गेलं निघून
निरोप देताना सुखाला मन आलं भरून
सुखाला म्हटलं जा सांभाळून जा नीट घरी
हसत रहा सुखात रहा निदान तू तरी
माझ्याबरोबर तू अगदी विसंगत वाटायचास
मी कारणाशिवाय चिंतातूर तू विनाकारण हसायचास
सुख सोबत असलं की आपली दुःख वाटतात मोठी
तरी सुखात आहोत अशी समजूत घालतो खोटी
तुझ्या सोबत असण्याने काही मनात सुख पाझरणार नाही
तुझ्या हसण्याने काही मी माझ्या दुःखाची कारणं विसणार नाही
काल तुला पायर्‍यांवर रडताना पाहिलं
हसणं कानात शिरलं नसेलही पण रडणं मला लागलं
थोडं विक्षिप्त आहे माझं वागणं
पण मला जगू दे माझं जगणं
तू हरलास मला सुखी ठेवायला असं समजू नकोस
खरं तर मीच हरवलेत असे बरेच क्षण माझ्या हातून
तू जा निघून कारण सुखी व्हायचंच नाहीए मला
मी रिचवत राहीन एकटा हा फसफसणारा प्याला
जा निघून नाहीतर उगाच गुंतत जाशील
धड सुखात नाही
धड दुःखात नाही
असा फसफसणारा प्याला बनून राहशील

-प्रसाद 

७ टिप्पण्या:

 1. धन्यवाद अपर्णा,
  झालं काळजीची वाळवी लागली तुझ्या डोक्याला,
  सगळं ठीक आहे,
  गटारी साजरी करतोय समज म्हणून तो 'फसफसणारा प्याला' :)

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यू मैथिली
  हो हो सगळं कवितेइतकं ओके ओके आहे :)

  उत्तर द्याहटवा
 3. खो दिलाय....खालची लिंक पहा...
  http://majhiyamana.blogspot.com/2010/08/blog-post_07.html

  उत्तर द्याहटवा
 4. प्रसाद मस्तच आहे रे कविता... प्रत्येक ओळीचा एक वेगळाच अर्थ लागतोय... मला खूप आवडली... :)

  उत्तर द्याहटवा