नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, २३ जुलै, २०१०

झिम्माडी जम्मत
झिम्माडी जम्मत
गम्माडी गंमत
ढगांनी काळोखी केली
झिम्माडी जम्मत
गम्माडी गंमत
पानांची आंघोळ झाली

झिम्माड्या नगरीचा
राजा वेडा झाला
वार केले सपासप
झाडे निथळली,
रस्ते तरारले,
सारे खुले आपोआप
वार्‍यात गारात
झिम्माड्या तोर्‍यात
मज्जा या सरींनी केली
झिम्माडी झम्मत
गम्माडी गंमत
ढगांनी काळोखी केली

झिम्माड्या नगरीच्या
काऊचा चिऊचा
झाडाचा निसर्ग झाला
अंकूर फुटले,
सारेच नटले,
कसला हा संसर्ग झाला,
रानात वनात
फुलात पानात
रंगांची उधळण झाली
झिम्माडी जम्मत
गम्माडी गंमत
ढगांनी काळोखी केली

कुठल्याश्या डबक्यात
मोठ्या उत्साहात
दगड बुडूक झाला
तरंग उठले,
हसू ते फुटले,
चिंता त्या गुडूप झाल्या
पावसाचा नाद
रिमझिम अल्हाद
भलती जादू घडोनिया गेली
झिम्माडी जम्मत
गम्माडी गंमत
ढगांनी काळोखी केली

-प्रसाद 

२ टिप्पण्या:

  1. धन्यवाद मैथिली
    कुठे नाही घरातच होतो
    फक्त कंटाळा येतो मला खूप
    आणि दुसरं म्हणजे मला खूप लवकर कंटाळा येतो :)

    प्रत्युत्तर द्याहटवा