नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, २७ जून, २००९

कसे सांगू पावसाला?

कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
घर असे हे पडके
जणू घर नाही आता आहे ओले हे थडगे
घरी असा एकटा मी
म्हातारा कुचकामी
पुत्रदर्शन दुर्मिळ
सणावारी कधीकाळी तो दारी या धडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके

चार पैसे धाडी मला
ठेवाया नोकरगडी घरा
दोन बोटे पत्र नाही
बाळा संपली का शाई?
असे कसे मन ह्याचे झाले कठोर कोडगे
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके

लोक हसती मला
उगाच उपहास
हा औषधांचा मारा
पथ्य आणि उपवास
वर अंगावर नाही धुपे सुके फडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके

आता येऊ दे पूर
संपू दे किरकिर
कुणी मारेल खांदा
कुणी धरेल मडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके

-प्रसाद 

४ टिप्पण्या:

  1. छान :)
    अहो एवढी त्या बिचार्‍या म्हातार्‍याची व्यथा मांडलीय मी, करूण रसातली कविता आहे आणि आपण चक्क हसता आहात?

    असो मस्करीचा भाग सोडूयात ... फारसं मनावर घेऊ नका
    प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद :) :) :)

    उत्तर द्याहटवा