नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

सोमवार, ६ जुलै, २०२०

धुमारे - माधवी देसाई

म्हणतात ना 'don't judge a book by its cover' तसं काहीसं या पुस्तकाबाबत झालं. पुस्तक घेऊन फार दिवस झाले पण वाचायचा योग काही येत नव्हता. एक तर छोटं पुस्तक आहे नंतर वाचून काढू असं करत ते मागे राहिलं. आणि दुसरं म्हणजे त्याचं ओकंबोकं मुखपृष्ठ. ते पाहून उगाच गैरसमज होतो की काहीतरी उदासीभरं आहे हे प्रकरण. त्यात माधवी देसाईंचं 'नाच गं घुमां' आधी वाचलेलं त्याचा ठसा मनावर निश्चित होता, त्या वातावरणात काही पूर्वग्रह किंवा अपेक्षा ठेवून मला हे पुस्तक हाती घ्यायचं नव्हतं. नंतर एकदोन ठिकाणी लोकांना या पुस्तकाबद्दल भरभरून बोलतांना, लिहितांना पाहिलं आणि चूक माझ्या लक्षात आली. मग पुढच्या एक दिवसात हे पुस्तक वाचून काढलं.

'धूमारे' या पुस्तकात गोयच्या भूमीवर लिहिलेले पंधरा लेख आहेत. गोवा म्हणजे फेसाळती बियर, उघडेबागडे फोरेनर्स एवढंच मर्यादित नाहीये याची आपल्याला नव्याने जाणीव हे पुस्तक करून देतं. आपण गोव्याच्या अंतरंगात माधवी ताईंचं बोट धरून शिरतो. त्यांच्या संवेदनशील नजरेने इथला निसर्ग, इथली माणसं आपण पाहतो. हे सरधोपट प्रवासवर्णन असं नाहीये. एखाद्या ठिकाणी आपण बराच काळ राहिलो तर त्या भूमीशी त्या वास्तूंशी आपले बंध तयार होतात, तिथे आपली मूळं आपसूक रुजतात, तिथल्या झाडापेडांशी आपलं हितगूज सुरू होतं. आपुलकीची जी माणसं भेटतात आपण त्यांना आणि ती आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतात, त्या डोळ्यात स्नेह असतो, आपलं एक पान त्या डोळ्यात दडलेलं असतं, नुसतं डोळ्यात पाहून आपण स्वतःला वाचू शकतो. गाईडच्या भूमिकेत एखादी वास्तू, निसर्ग, तारीखवार इतिहास सांगणं वेगळं आणि आपल्या मनातील या साऱ्या सभोवतालाविषयीचे प्रामाणिक भाव व्यक्त करणं वेगळं.

१९९० साली म्हणजे जवळपास तीस वर्षांनी माधवी ताई त्यांच्या बांदोडा या गावी परतल्या. जागा तीच पण वयाच्या १६ व्या वर्षी पाहिलेलं गोवा आणि साठीत समजलेलं गोवा या दोन्ही गोष्टी त्यांनी कुतुहलाने तोलून पहिल्या, आणि मांडल्याही. गोवा म्हणजे विविध संस्कृतीची सरमिसळ. त्याचे समाजावर झालेले बरेवाईट परिणाम या पुस्तकात मांडले आहेत. परकीय राजवट असून आणि आता स्वतंत्र घटक राज्य असून जपलेल्या चालीरीती, समाजात परकीय राजवटीमुळे आलेला एक मोकळेपणा सारं त्यांच्या लेखणीतून झरझर उतरतं.  त्यांचं लिखाण समुद्राच्या पाण्यासारखं नितळ, ओघवत्या शैलीचं, गजाली गप्पांच्या लाटाच जणू. म्हणून पुस्तक एकदा वाचायला घेतलं की खाली ठेववत नाही.

देवचार, कोपेल, पायलट, तळी, पालखी, फुलराणी लेखांच्या नुसत्या नावावर नजर फिरवली तरी काहीतरी वेगळेपणा असणार लेखात हे कळतं. गमतीची बाब म्हणजे सलमान, संजय दत्त, चंकी पांडे, दिव्या भारती विषयी त्याकाळी भाबड्या लोकांना असलेलं आकर्षण, गजालीत सिनेमा, राजकारण, दाऊद इब्राहिम हे आलेले विषय, तिथल्या लोकांची त्यावर गमतीदार टिपण्णी हे सारं वाचायला मस्त वाटतं. डोना पॉला ची प्रतिक्षा त्यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. गोवन स्त्रियांमधला काळानुरूप झालेला बदल काही ठिकाणी त्या अधोरेखित करतात. पूर्वीचं गावपण कसं मागे पडत गेलं हे त्या सांगतात, तरी जे काही शिल्लक आहे ते निराशाजनक निश्चित नाही अन्यथा त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातील विश्वासाने विसवायचं ठिकाण म्हणून त्यांनी हे गाव निवडलं नसतं.

इथल्या भाषेतली मौजेची गोलाई आणि माधुर्य माधवी ताई न टिपतात तर नवल. पुस्तक वाचून झालं तरी काय बरं ते गाणं होतं म्हणून पानं पुन्हा चाळली जातात आणि गुणगुणायचा प्रयत्न होतो.

... आलयली डोलयली पंटी पालयली
सांग गे बाये, तुका कोणे चोरून वेल्यान गो बाये ...
आंव तुजो सदाच मोग करतलो गे बाये
आणि तुका हाव केन्नाच विसरचो ना गे बाये


- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा