नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

सोमवार, १३ जुलै, २०२०

शितू - गो. नी. दांडेकर

शितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला विसू हा अप्पा खोतांचा महाव्रात्य मुलगा आणि त्यांच्या गावातलीच विसूची समवयस्क पण समजदार, जबाबदार, सगळ्यांची काळजी घेणारी पण दोन नवरे गिळल्याचा ठपका असलेली निरागस मैत्रिण शितू. या दोघांमध्ये हळूवार खुलणारी ही प्रेमकहाणी.  हे निर्मळ प्रेम नितीमूल्यांवर जोखता न येणारं, समाजमान्य नसणारं असं. विसू व्रात्य असला तरी प्रेमळ आहे, हे तो शितूला मार खाण्यापासून वाचवतो या प्रसंगापासून कळतं. मग हळूहळू खोडसाळ विसूमध्ये कोणीही न अपेक्षिलेले घडत जाणारे बदल अनुभवायला मस्त वाटतं. एक गावावरून ओवाळून टाकलेला विसू ते जीव ओवाळून टाकावा असं वाटायला लावणारा विसू हा प्रवास हेच शितूच्या प्रेमाचं यश. या प्रवासाला साथ द्यायला आहे नयनरम्य कोकण. मग ती कोकणी वाड्यांची, खाड्यांची केलेली वर्णनं केवळ अफलातून. हा कोकणी साज या कथेला वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवतो. प्रस्तावनेत म्हटलंय तसं शुद्ध प्रेम फलस्वरुप आहे, जशी चंदनाची झाडे. फळे न येताही जीवन कृतार्थ झालेली. नक्की वाचावी अशी ही प्रेमकहाणी. 


- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा