नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

निर्दयी निसर्ग?



एक तळं होतं 
दोन डोंगरांमध्ये 
नितळ निर्मळ पाणी
कोवळं उन्ह पांघरणारे  चमचम चंदेरी मासे 
संथ विहरणारी  बदकं
ध्यानस्थ करकोचा 
तहान भागवणारी हरणं

नंतर एक माणूस आला
केवळ त्याला ते ठिकाण आवडलं म्हणून 
त्याला आवडलं त्या क्षणापासून ते त्याचं झालं
त्या निसर्गचित्रात त्याने आपलं अजागळ झोपडं घुसडलंच
त्याच्या पुढच्या  कित्येक पिढ्यांनी चित्रकलेच्या तासाला ते चित्र रंगवलं  
तो आता तिथेच राहू लागला 
डोंगर आणि पाण्याला स्वत:चं मत नव्हतं
आणि मासे,  बदकं, करकोचा यांची ऐपत नव्हती तिथे राहायची  
पण सध्या तरी बापुडवाण्यासारखे राहत होते सारे
हरणं येतात त्यामुळे त्यांच्या मागावर असणार्‍या हिस्त्र श्वापदांचा धोका संभवतो 
म्हणून त्याने तळ्याभोवती सापळे रचले 
खुरातना पाय मोडलेली हरणं रात्रभर विव्हळत राहिली 
त्यांची गोठलेली प्रेतं त्याने पहाटे फरफटत घरी आणली 
ती आणताना किती रानफुलं चुरडली याची गणती नाही 
तळ्यावर त्या दिवसापासनं उदासीनतेचा एक दाटसर काळीमा पसरला

काही दिवस सरले 
सुरुंगांचे आवाज वातावरणात घुमू लागले 
डोंगरच्या छातीत सुरुंग फुटत होते 
पल्याडच्या गावाहून एक थेट रस्ता होणार होता
दर सुरुंगागणिक तळ्यावरच्या पाण्याचा थरकाप उडे 
भेदरलेले चंदेरी मासे खडकाच्या कानाकोपर्‍यात जीव मुठीत धरून लपून राहू लागले 
आसपासच्या उरल्यासुरल्या फुलझाडांचा वाढत्या धुळीमुळे श्वास कोंडला 
करकोच्याने महत्प्रयासाने पापण्यांची उघडझाप केली फक्त
झोपडीतला माणूस घरासमोरून रस्ता जाईल म्हणून खुलला होता 

अखेर रस्ता झालाच 
नवनवीन माणसं त्या परिसरात दिसू लागली 
झाडं पेडं तोडून
डोंगर आपल्या सोयीने पोखरून 
इतर माणसं आपली घरं बनवू लागली 
एक घर बांधण्यासाठी झाड तुटलं
झाडाच्या आधाराने वाढणारी वेल तुटली 
झाडाखालचं वारूळ मातीमोल झालं 
सुतारपक्षाची ढोल तुटली
मधमाश्यांचा पोळ पिळलं
एकदोन घरट्यांचा चेंधामेंधा झाला
कित्येक पक्षांची त्या फळझाडावर असलेली  रानमेव्याची खानावळ कायमची उन्मळून पडली
कित्येक सुरवंटांची फुलपाखरं होण्याची स्वप्न चिरडली गेली 
तरी आठ तास कुलूप मिरवणारं घर बांधलंच 
आणि इतक असूनही जुन्या पत्यावर एखादा जीव काहीतरी उरलंसुरलं ओळखीचं शोधत आला 
तर दंडुका उगारून, गलोल घेऊन  हे तयार 
चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने तोंड उचकटून म्हणतात  
इथे जंगलात हा त्रास खूप  
तेरी भी चूप मेरी भी चूप

माणसं वाढत गेली 
तळ्याच्या अवतीभोवती माणसं वावरू लागली 
पाण्यात गळ पडू लागले
पिठाच्या अमिषाला भुललेल्या भुकेल्या चंदेरी माशांच्या घशात गळ अडकू लागले 
काही कळायच्या पाण्याबाहेर ओढत आणलं त्यांना 
आता श्वास फुलू लागले
उरली एक तडफड 
वेदनेपल्याडच्या मुक्कामाला पोहोचेपर्यंतची
बदकांना फिरणं कठीण होऊन बसलं
कधी काठीनेच ढोमस, कुठे  दगडच मार, कुठे पिलूच पळव असे उद्योग सुरु झाले 
बदकाचं शेवटचं कलेवर त्या पाण्यावर तरंगेपर्यंत हे सारं चालू राहिलं
माफक हळहळले काही जण 
पण तातडीन जाब विचारावा  काहीतरी करावं इतकं गंभीर प्रकरण त्यांना वाटलं नाही      
प्रेत सडत राहिलं 
ती घाण  काठीने बाजूला करून 
माणसं त्यातच भांडी घासू लागली, कपडे विसळू लागली
तळ्याचं अवघ्या वर्षभरात डबकं झालं 
करकोचा फक्त उभ्या उभ्याने अगतिकतेचे आवंढे गिळत बसला

काही काळ लोटला
पाणी थोडं आटलं 
एका बाजूने भर टाकत आलं कोणी 
उरलेसुरले चिवट चंदेरी मासे दिवसाढवळ्या बाहेर फिरेनासे झाले
वाचणार नव्हतेच ते 
जे मासे गळाला लागले नाहीत ते गाळात दफन होणार चित्र स्पष्ट होतं 
ध्यानस्थ करकोचा आता कुठे असतो माहित नाही 
कदाचित असेल या मातीच्या ढिगाखाली, निपचित ध्यानस्थ  
भर पडत राहिली पापात 
भर वस्तीत तळ्याला जाणीवपूर्वक त्यात असल्या नसल्या सगळ्यासकट गुदमरवून मारलं
आणि वर विजयोन्मत्ताचा बुलडोझर फिरला मोठ्या दिमाखात 
पैशांचे व्यवहार झाले 
पल्लेदार सह्या झाल्या 
झोपडीतला माणूस गब्बर झाला 
सुटीच्या दिवसात तो परदेश वार्‍या करू लागला 
तिथल्या  तळयाकाठच्या हॉटेलात निसर्गरम्य वातावरणात सहलीला जाऊ लागला 
गुंतवणुकीसाठी आपल्या प्रदेशातली बरीच निसर्गरम्य ठिकाणं त्याने हेरून ठेवली
काही ठिकाणी अजून वीज पोहोचायची  होती
काही ठिकाणी महामार्ग  होणार होता 
काही ठिकाणी थेट ट्रेन जाणार होती 
सध्या मात्र तिथे  निसर्ग नावाचा कचरा होता

हे सगळं पाहताना आभाळाला अचानक भरून आलं
त्याला इथल्या झाडापेडांना घट्ट  मिठीत घ्यावसं  वाटू लागलं
इथे बुझलेल्या तळ्याला, आणि समदुखी नदी नाल्यांना एकाच वेळी गहिरा आतून हेलावून  सोडणारा हुंदका फुटला
आभाळ ढसाढसा रडू लागलं
कित्येक कोरडे झरे आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेने पेटून उठले 
पुनरुज्जीवित  झाले 
डोंगराचे खांदे पडले 
दरडी कोसळल्या
धुमसत राहिले ढग आतल्याआत 
आभाळाला समजावणं कठीण होतं 
कित्येक वर्षांचं दुख होतं ते 
आभाळ सार्‍या सवंगड्यांसकट ओक्साबोक्शी संततधार  रडत राहिलं   
त्याला काही केल्या दु:ख आवरेना
घावच गहिरे होते इतके 
पण रितं कोणीच होत नव्हत
ते दुख भरून राहिलं सार्‍या प्रदेशभर    

आभाळाचं दु:ख आभाळा एवढंच
अश्रूंचा महासागर अवतरला 
कित्येकांचे संसार वाहून गेले 
लोकांचा संपर्क तुटला
खाण्यासाठी दोन घास मिळेनासे झाले 
पिण्याचं पाणी मिळेनासं झालं 
हरणं , बदकं, मासे , करकोचे, सुतारपक्षी, मुंग्या, मधमाश्या, फुलझाडं,  अर्धवट फुललेली  फुलपाखरं या सार्‍या रांगेत खालमानेने माणूसही मिसळला 
पेपर आपटून निसर्गावर 'निर्दयी' असा शेरा मारणार्‍यांना माहित नसेल की सध्या त्यांनी स्वहस्ते जीव घोटलेल्यांचे आत्मेच आभाळाला समजावताहेत 
'बाबा रे झालं गेलं गंगेला मिळालं असा धीर हरून कसं चालेल'
आभाळ शांत होईल 
पण या सर्वात बुद्धिमान प्राण्याला कोण समजावणार ?
कि  त्याला आधीच समज मिळालीय ?


प्रसाद साळुंखे





चेन्नईतील  पुरात मदतीचे कार्य करणार्‍या काही संस्थांच्या  खाली दिलेल्या  नावावर टिचकी देऊन आपण त्यांची माहिती पाहू शकता :   






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा