नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

रविवार, ६ डिसेंबर, २००९

सुप्त इच्छांचं कलिंगड








आपल्या मनातल्या काही सुप्त इच्छा फार मजेशीर असतात. वाटतं असं प्रत्यक्षात झालं तर? मज्जा ... एकटं बसून असलो म्हणजे आपण नेहमी एखाद्या चिंतेतच असायला हवं असं काही नाही. एकटं असतांना भूतकाळातले मजेशीर किस्से आठवून हसतोच ना कधीकधी? तसंच आपल्या मनातल्या या सुप्त इच्छा आपल्यापुरत्या खर्‍या करून घेतो, कल्पनेची जादूई कांडी फिरते, काळ वेळ स्थळ सारं बदलतं आपल्याला हव्याहव्याशा रुपात, डोळ्यात वेगळीच उत्साहाची लकाकी येते, चेहरा आपोआप हसरा होतो, मन प्रसन्न होतं, त्याचे चोचले पुरवल्याचं त्याला अप्रूप असेल कदाचित.

हे असं एकटं असताना होणं बरं असतं, पण कधीकधी माणसांमध्ये वावरताना मनाच्या आगाऊ घोड्याचा लगाम सुटतो, कधी ट्रेनमध्ये बसमध्ये अचानक आपण हसतो, आणि मग मख्ख चेहर्‍याने इकडे तिकडे बघत, केसावरून हात फिरवत, जास्तीच हसायला आलं तर घाम टिपण्याचा बहाणा करून हास्यस्फोट दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, असे प्रयत्न करताना शिंक खोकला यांचा सूवर्णमध्य साधल्यासारखे अत्यंत दुर्मिळ असे ध्वनि लोकांना ऐकण्याचं भाग्य लाभतं, काय सालं मनमोकळं हसायची पण चोरी, लगेच वेडाची शंका घेतात लोक, हसणं आवरण्याचा प्रयत्न झाला तर त्यांची खात्रीच पटते. अर्थात मला अशा 'याला तज्ञांची गरज' आहे वाल्या नजरांची सवय आहे. मुळात मी आळशी. मला माझी झोप फार प्रिय. या ध्येयवाद्यांच्या युगात अशी इच्छा मनात निर्माण होणं म्हणजे शापच म्हटला पाहिजे. एखादा ओळखीतल्यापैकी तीशी पस्तिशीतला माणूस विचारतो "तुला कशात इंटरेस्ट आहे?" त्यावर मी " मला ... अं ... मला ना झोपायला आवडतं, ते डिस्कवरीत दाखवतात तसं कुठल्याशा नदी तलावाकाठी आळसावलेल्या अंगाने उन्ह शेकत काहीही न करता नुसतं दिवसभर पडून राहणार्‍या मगरीसुसरीसारखं नशिब हवं, कोणी उठ म्हणणारं नसतं त्यांना ... " असं सगळं एका दमात बोलून मी मोकळा होतो. तुम्ही मस्तपैकी बाहेर जेवायच्या मूडमध्ये असता, हॉटेलात जाता, बरीच चर्चा होते, सगळ्यांचे सुझाव हे जास्त तिखट असतं, हे फार गोड होईल, असं म्हणून निकालात काढले जातात, आणि तुम्ही मनात अगोदर ठरवलेलीच भाजी आणि रोटी ऑर्डर करता, वेटर नेहमीचा वेळखाऊपणा करून तुमचं चार ग्लास पाणी पिऊन झाल्यावर तुम्ही मागावलेला पदार्थ आणून गरमागरम सर्व्ह करतो, तुम्ही मग उसन्या उत्साहात (मी मागावलेलं छानच असतं, काय मागवावं ही एक कला आहे, रोजच्या हॉटेलात जाणार्‍यांना ती आत्मसात असते, या प्रकारचा) पहिला घास तोंडात घालता न घालता तोच तुमचं वेटरच्या तीन दिवस पाणी न लागलेल्या, घामट, मळक्या युनिफॉर्मकडे लक्ष जातं, अशावेळी तुमचा चेहरा जसा होत असेल तसाच काहीसा चेहरा या प्रश्न विचारणार्‍या इसमाचा होतो. आता मी हुशार, शांत, अबोल दिसतो यात माझी काय चूक? 'ते काय विचारताहेत आणि मगरीचं मध्येच काय बोलतोस?' असं माझ्या मनात येतंही पण तोपर्यंत शब्द तोंडातून निघालेले असतात. आता इतकं सगळं झाल्यानंतर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी त्यांच्या समाधानासाठी मला सरकार दरबारी उच्चपदस्थ अधिकारी वगैरे व्हायचय असं म्हटलं तर त्यांना कितपत खरं वाटेल देव जाणो. काही सुचतच नाही अशावेळी, मग "आलोच हं" असं म्हणून मी काढता पाय घेतो. खरं तर स्वप्न, जिद्द, महत्वाकांक्षा, यशाची शिखरं वगैरे माझ्या गावीच नसतं, कशाला फुकाची दमछाक जीवाची, जे पटतं जे वाटतं ते करा. काय फरक पडतो म्हणा थांबला तो संपला, कुठे थांबता आणि कसं संपता यात खरी मजा आहे. आता तर मला वाटतं मी मगरीच्या कातडीचा होतोय हळूहळू.


माझ्या मनात मजेशीर अशा बर्‍याच इच्छा आहेत त्यातलीच एक म्हणजे प्रिती झिंटा ... कस्सल्ली गोड पोरगी ... मला वाटतं मी एकदम छोटं व्हावं (किंवा तिचा गाल झूम करावा) आणि तिच्या गोर्‍यागोबर्‍या गालाच्या उंचवट्यावर उभं राहून तिच्या खोल खळीमध्ये उडी मारून जीव द्यावा. आता तरी कळली का संपण्यातली मजा? असंलं अचाट काही मला आठवलं की खूप हसतो मी. तशा कॉलेजात बर्‍याच प्रति प्रिती झिंटा आसपास वावरल्या पण कुठलीच खळी मी खोलात शिरावं इतकी खोल नव्हती.

अजून एक सुप्त इच्छा मी कधीकाळी बाळगून होतो, ती म्हणजे कॉलेजात रोझ डे ला कोणाला तरी रोझ द्यावा, म्हणजे अगदीच कोणालातरी नाही, त्यातल्या त्यात खोल खळीला. तो एकच दिवस म्हणे सगळ्यांना वाव (wowwww!!!!) असतो रोझ रोज तर देऊ शकत नाही ना कारण रोज रोझ डे नसतो. पण हाय रे मेरी किस्मत, इकडे साधं रोजचं हाय बाय करायचे वांधे तर अख्खं रोझ देऊन काय डोंबल बोलणर मी? annuals च्या नाचाची प्रॅक्टिस चोरट्या नजरेने बघणारे आम्ही, त्यातही नजरानजर झालीच तिची तर "अरे बापरे कळलं की काय? आता लफडा, आता मॅटर" अशा विचारांनी छाती पुरती व्हाइब्रेट व्हायची, डोक्यात सायरन वाजायचे मग बॅक टू कॅंटिन. हे रोझ प्रकरण याच काय पुढच्या कितीतरी जन्मात शक्य नव्हतं. दुरून डोंगर साजरे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशा कितीतरी म्हणी त्या situation ला चपखल बसल्या असत्या. तसं अगदीच सॅंडल वगैरे काढून कुणी मारत नाही, अपमान करायचीही शक्यता कमीच, पण डोळ्यात sympathy वगैरे आणून, कृत्रिम हसून समजूतीच्या स्वरातलं काही बोलल्या की संपलच. मग ती हुरहूर, ते ताटकळत तिच्या दिसण्याची वाट पहाणं, तिच्या हसण्याने सुखावणं, पाहिलेली गोड गोड स्वप्न, डायरीतल्या रात्री गुपचूप केलेल्या पल्लेदार कविता, त्या आपल्याच कविता आपणच पुन्हा चोरून वाचनाचा आनंद या सगळ्याला एक गडद भरीव पूर्णविराम मिळण्याची भिती असायची. इथे कुठे थांबावं यातली मजा कळली. प्रवास करता करता एखाद्या छोटेखानी कौलारू मंदिरात थांबावसं वाटतं, एखाद्या नदीत पाय बुडवावेवेसे वाटतात, एखाद्या ठिकाणची डोंगरांची रांग डोळ्यात भरून घ्यावी असं वाटतं, अवखळ झर्‍याचं थंड पाणी चुंबायचा मोह होतो, एखाद्या अस्ताला जाणार्‍या सूर्यात मनातलं बरच काही उजळवण्याचं तेज अद्याप शाबूत असल्याची प्रचिती येते, मग ही सगळी ठिकाणं आपल्या अंतिम मुक्कामाचीच असतात असं नाही, पण तिकडे थोडावेळ थांबल्याने बरं वाटतं, आणि पुढचा प्रवासही चांगला होतो.


एकदा एक मैत्रिण मला म्हणाली मला ना कलिंगडात बसायचय, सही ना? कल्पना करा एक भल्लमोठ्ठं कलिंगड, त्याच्या काळ्या पाठीवर एक दरवाजा, दरवाजा हलकेच उघडून आत गेलात की थेट कलिंगडाच्या पोटात. लाल लाल गोडगोड वासाच्या रसाळ पाणीदार बर्फसदृश भिंती, पॉलिश केल्यासारखे काळ्या काळ्या बियांचे ठिपक्यांचे वॉलहॅंगिंगस, काळोखं काळोखं थंड कलिंगड आणि अंगाचं मुटकूळ करून बसलेले तुम्ही. तिचं ऐकलं आणि मलाही मग मनापासून वाटलं की कलिंगडात बसणं मस्ट आहे. पुढचा अर्धाअधिक दिवस मी कलिंगडातच होतो.

माझ्या मित्राला कोणी चपट्या (पाठून डोकं सपाट असणारे) दिसल्या की चमाट (चापट, टपली) मारायचा मोह होई, बरेचदा तो सुप्त इच्छा पूर्णही करे. मित्र सगळे असेच आक्रस्ताळी. मैत्रिणी त्यामानाने बर्‍यापैकी सौम्य. एकीला चिनी कम पाहिल्यावर अमिताभच्या पोनीला एकदा तरी हात लावायला मिळाला तर? असं झालं होतं. मित्रांनी बघितला नसावा चिनी कम नाहीतर त्यांना नक्कीच सूरपारंब्या खेळाव्याशा वाटल्या असत्या.

सुप्त इच्छा वेगळ्या आणि करियर वगैरेचे निर्णय वेगळे, असं बरेचदा दिसतं. माझा मित्र लहानपणी मोठेपणी कोण होणार? विचारल्यावर 'रिक्षा ड्रायव्हर होणार' म्हणायचा, का? तर दिवसभर रिक्षातून फिरायला मिळेल म्हणून. नंतर त्याचं मन बदललं त्याला कंडक्टर व्हावसं वाटलं. तिसरीत असताना एका मित्राने 'मी हॉस्पिटल टाकणार' पेपराचा स्टॉल टाकावा इतक्या सहजतेने म्हटलं होतं. आम्हाला त्याच्याबद्दल कोण आदर? आमच्या बॅकबेंचर्समध्ये कोणी मोठी कल्पना जरी केली तरी दाद द्याविशी वाटायची. भविष्यात आजारपणात सवलती मिळाव्यात म्हणून असेल कदाचित पण हेही फिस्कटलंच.

रस्त्याने चालताना नेहमी उजव्या बाजूने चाला, वगैरे नियम असतात ना तसेच नियम सुप्त इच्छांच्या जादूच्या प्रयोगांना असतात. उदाहरणार्थ,

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

हे गाणं ऐकल्यावर केवळ आणि केवळ चॉकलेटचा बंगलाच डोळ्यासमोर यायला हवा. मग चॉकलेटचा बंगला चिकट होईल, वितळेल, चॉकलेटला बुरशी धरेल असं काही मनात येत नाही आणि येऊही नये. पुढे 'बिस्किटांच्य गच्चीवर मोर छानछान' म्हणताना सोबतीला तुम्हाला बिस्किटांच्या पोटातून गेलेली मुंग्यांची रांग दिसली, किंवा ही उघड्यावरची बिस्किटांची गच्ची कालांतराने मऊ होईल का? असे प्रश्न आले की सगळी मजाच गेली. प्लॅटफॉर्मवर उभं असताना ट्रेनला गर्दी असणारच असं घरातूनच जे पक्कं करून निघतात त्यांना ट्रेन कितीही रिकामी मिळाली तरी कमीच वाटते, म्हणजे कसंबसं शिरायला मिळालं तरी त्रास, मोकळंढाकळं उभं रहायला मिळालं तर बसायचं कुठलं नशिबात? म्हणून त्रास, बसायला मिळालं तर आम्हाला नेमकी फोर्थसीटच मिळणार म्हणून त्रास, आणि चांगलं पाठ ठेकून बसायला मिळालं तर विंडोसीट मिळाली असती तर बरं झालं असतं म्हणून त्रास, आणि चुकूनकमाकून विंडोसीट मिळालीच तर रम्य झोपडपट्ट्या, नाले, टोलेजंग बिल्डिंगस, रस्ते दुकानं, झाडं, पक्षी बघायचं सोडून गजांवर कोणीतरी थुंकून ठेवलंय आणि त्या शिंतोड्यांवर सारखं लक्ष जातय म्हणून त्रास, म्हणजे परिस्थिती कशीही असो कपाळावरची आठी स्थितप्रज्ञ. ते अर्थशास्त्रात म्हणतात ना 'other things being equal' तसं कल्पनेच्या विश्वात रमताना काही भोचक शक्यतांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं आपल्याच सोईचं असतं.

पण कित्येकदा आजूबाजूचे तुम्हाला अशी डोळेझाक सहजासहजी करू देत नाहीत. मग एखाद्याच्या रंगाकडे किंवा प्रकृतीकडे बघून "तुला 'ही' पटणार?" असं तिरस्काराने बोलून त्या प्रेमवीराला वास्तवाची जाण करून दिली जाते. पण माझ्यासारखे फटकळ लोक लोकांचे हे मनसुबे तडीस जाऊ देत नाहीत. "रंग, प्रकृती, चेहर्‍याची हातापायाची ठेवण, आवाज हे सारं निसर्गाने दिलेलं मग अमूक एक म्हणजे सौंदर्याची खूण आणि अमूक एक म्हणजे कुरुपतेचं लक्षण हे माणूस का ठरवतो? अर्थात हा प्रश्न माणसांसाठी आहे तेव्हा कृपया तुम्ही विचार करायची तसदी घेऊ नका" असे शालजोडीतले देऊन माझ्या मुद्द्यावर (आणि मुलीवरही) मी ठाम राहतो, असं झालं की माझ्या तोंडावर उघडउघड बोलणं ही बर्‍याच जणांची सुप्त इच्छाच बनून राहते.

काही लोकांच्या काही सुप्त इच्छा ओळखायला फार प्रयत्न करावे लागत नाहीत. सलमानचे फोटो पाहून जिममध्ये तासनतास घाम गाळणारे त्यातलेच. तुम्ही कुठल्याही मैदानात जा (तशी उरलीत कितीशी? हा शोधाचा विषय आहे) आगरकर, हरभजन, झहीर यांच्या शैलीत गोलंदाजी करणारे आढळतात त्यातले मलिंगा, शोएबसारखे chucking करणारे (फेकाडे) बघताना मस्त वाटतं, जीव तोडून धावत येतात आणि बुंध्यात चेंडू मारतात, कमालीचे आक्रमक वाटतात पण वेग बेताचाच असतो. गाण्याच्या रिएलिटी शोजमध्ये सोनू निगम, सुरेश वाडकर, आशाताई, सुनिधी यांचे बरेच झेरॉक्स दिसतात, अर्थात ते कॅनॉन झेरॉक्स की साधे गिचमिडे काळपट झेरॉक्स हा भाग अलाहिदा. ह्या लोकांच्या सुप्त इच्छा लगेच ओळखता येतात, पण काही छुपे रुस्तुम असतात, जसा एखाद्याचा गाता गळा पिकनिकला भेंड्या खेळताना मंत्रमुग्ध करतो, एखाद्या जन्मजात अरसिकाच्या वहीत अचानक एके दिवशी सुंदरशी कविता सापडते, एखादी व्यक्तीचित्राची हुबेहूब काढलेली रांगोळी आपल्यासोबत चार-पाच वर्ष काम करणार्‍या मित्राने काढलीय हे पाहून आपण अचंबित होतो. असं लपवणं वाईट नव्हे खरं तर ते एक प्रकारे आपल्याला अनपेक्षित असा सुखद धक्काच देतात, आणि माणसं बघायला आपण किती चुकतो याचीही ठळक जाणीव करून देतात.

आता हे कोणीतरी वाचेल आणि वाईटबरी टिप्पणी देईल अशी सुप्त इच्छा आहे. नाही जरी दिलीत तरी वाचल्यावर कळलं असेलच की कल्पनेच्या विश्वात सगळंच मिळतं. पण कल्पनेच्या विश्वात जावं तरी कसं कल्पनाच विश्वात नसतांना?, हो ते गजनीत आमीरच्या छातीवर लिहिलय ना 'Kalpana was killed'.

२० टिप्पण्या:

  1. हाहा...चुरापाव( मुद्दाम तुझं नाव लिहीलं नाही )तू मगरीसुसरीसारखा चिखलात माखून लोळत पडलेला... कलिंगडाच्या पोटात घुसलेला...खळीत पार खोल बुडालेला... सही रे...:)
    बाकी ब~याच ठिकाणी अपनी अपनी किस्मत है.... म्हणजे ती खेचून आणता येते बरं का...कशी व किती ते मात्र आपल्या हातात. सही रे. प्रकटन आवडलं.शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  2. मस्त वाढवली आहे कलिंगडाची शेती. मजा आली वाचताना. माथेरान पण विशेष आवडला. येत राहीन, वाचीन. अभिप्राय पण देईन हे नक्की.
    पुन्हा भेटू असेच........

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद भाग्यश्री मॅम
    बाकी आपले शुभाशिर्वाद असल्यावर काय पाहिजे, खेचून आणेनच

    उत्तर द्याहटवा
  4. अनुक्षरेवर तुमचं नाव दिसत नाहीए, चला मी ताई म्हणतो,
    ताई प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद,
    येत रहा, वाचत रहा, चुरापाव चाखत रहा, आनंदी रहा
    नक्की भेटू

    उत्तर द्याहटवा
  5. कलिंगडात बसायचय, सहीच कल्पना ..... अर्धाअधिक दिवस मी कलिंगडातच जाउन बसतो आता. एक सो एक आयडिया .. वा. क्या बात है. मज्जा आला साला. कंसेप्टच्या फ्रेम्स पकडतोय मी एक-एक. धमाल आली वाचताना.

    अरे प्रसाद ... आयला तुझा आत्तापर्यंतचा ब्लॉग १ दिवसात वाचून काढला रे (आजचा मोकळा वेळ चांगलाच सार्थकी लागला. पोरगा भलताच खुश झाले. हो न रे.) पुढचे लिखाण येऊ दे फटाफट. वाट बघतोय.... :)

    उत्तर द्याहटवा
  6. मस्तच लिहिलंय की!!!
    आज मी पहिल्यांदाच इथे आले ... वाचलेली ही पहिलीच पोस्ट जाम आवडलीय,त्यामुळे आता जमतील तश्या सगळ्या जुन्या पोस्ट्स वाचायचा बेत आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. मस्त! धमाल लिहिलंय. प्रीती झिंटा मला पण खूप आवडते.
    ब्लॊगचं शीर्षक पण खास! चुरापाव आवडला.आज सुरुवात केलीय चाखायला. हळूहळू सगळ्या डिशेसची चव घेईन. असंच छान लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा
  8. धन्यवाद रोहनजी

    आता 'जी' म्हटलच पाहिजे, सगळा ब्लॉग एका दिवसात वाचलात, वर प्रतिक्रियांचा पाऊस पाडलात, हो भलताच खूश झालोय आज, देव करो तुम्हाला थंडसं कलिंगड मिळो.

    उत्तर द्याहटवा
  9. धन्यवाद गौरी

    वा चांगला बेत आहे चुरापाव नक्की वाचा (चावा), आशा करतो तुम्हाला चुरापाव आवडेल.

    उत्तर द्याहटवा
  10. धन्यवाद क्रान्ति,

    मग आहेच प्रिती सगळ्यांना आवडण्यासारखी.

    खरं तर आता शीर्षक बदलावसं वाटतंय, कलिंगडात बसायचय म्हणणार्‍या मैत्रिणीने काल ही पोस्ट वाचली आणि म्हणाली, "कलिंगडापेक्षा कडिंगल म्हणायला मजा येते ना?", मी म्हणून पाहिलं तर खरच मस्त वाटलं, आधी सांगते तर 'सुप्त इच्छांचं कडिंगल' केलं असतं मी.

    उत्तर द्याहटवा
  11. प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद हरेकृष्णाजी

    उत्तर द्याहटवा
  12. अरे त्या 'चॉकलेटचा बंगला' वरुन आठवले ... 'फिश'चा बंगला - कंसेप्ट कसा वाटला?

    "बंगल्यासमोर झाडं आणि त्याला लगड़लेल्या कोलंब्या. मधोमध एक कारंजे आणि त्यामध्ये रेडवाईन वाहते आहे. बंगल्याच्या मागच्या बाजूला एक मोठी विहीर बोंबलाच्या कालवणाने भरलेली. बंगल्याला कुंपण कसले तर सुक्या बोंबलाचे. हा.. हा..आता प्रश्न पडला होत की खेकडे आणि झिंगे ठेवायचे कुठे ? एक काम करता येइल. मोठी पाण्याची टाकी लावा घराला आणि त्यात सोडायचे. हवं तेंव्हा टॅप खोलून घ्यायचे. ते थंड-गरम पाण्याचे टॅप असतात ना दोन्हीबाजूला फिरणारे तसे टॅप लावायचे मोठे. एका बाजूला केला की खेकडे आणि दुसऱ्या बाजूला केला की झिंगे. हा.. हा.."

    उत्तर द्याहटवा
  13. सही लवकर बांधून टाका, बंगल्याच्या दाराला तळलेल्या पापलेटांचं तोरण शोभून दिसेल हाहाहा

    उत्तर द्याहटवा
  14. मस्त जमलाय लेख
    सगळ्या कल्पना एकसेएक
    बादवे ती कलिंगडात बसायची कल्पना माझ्या डोक्यात कायमच असते.
    मी लहान असताना आईला विचारलेलं मला शाळेत जायला उशीर होतो कारण मी हळू हळू चालते. मग मी उद्या पासून जरासं पेट्रोल पित जाऊ का?
    त्यानंतर महिनाभर आईला टेंशन आलेलं खरच पिते की काय ही मुलगी पेट्रोल ;)
    मी गाडी जवळ गेले की माझ्यामागे ती पळत पळत यायची.

    उत्तर द्याहटवा
  15. प्रियांका चुरापावच्या गाडीवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

    आता पेट्रोलचे दर वाढताहेत तर थोडं कठीणंच होत असेल नाही हाहाहा :)

    उत्तर द्याहटवा