नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

रविवार, ६ सप्टेंबर, २००९

माथेरान 3

मजल दरमजल करत शार्लोट लेकच्या आसपास पोहोचलो, कुठला तरी पॉईट असावा बहुतेक कारण माणसांची गर्दी होती त्या अर्थी तो पॉईंट असणार माझ्या बोलण्यात पॉईंट आहे. तिकडे दोन टेकाडांमधोमध छोटी दरी होती तिथला कातळ पाहून मी खात्रीलायक सांगतो की पावसात त्या दरीतनं पाणी वाहत असणार आणि पुढे पाणी वाहत वाहत खाली खोल दरीत झेपावणारा नयनरम्य धबधबा बनत असणार. तिथल्या दोन टेकाडांवर दोर्‍या बांधल्या होत्या आणि ती दरी adventure sports ची आवड असणारे लोक हिरिरीने पार करत, मलाही वाटलं आपण ट्राय करावं पण दोरी माझं वजन घेईल का याबाबत शंका होती, शिवाय अगदी दोरीच्या मधोमध आलो आणि आपला लटकूराम झाला तर? म्हणजे दहिहंडीतले सगळे थर कोसळावे आणि हंडी फोडणारा गोविंदा एकटाच लटकत वर रहावा, अशातली गत व्हायची, त्यापेक्षा नकोच ते. तरी काहीतरी धाडसी करण्याची खुमखुमी होती मग तिथल्याच एका उंचावरच्या सुळक्यावर बसून आम्ही यथेच्छ फोटो काढले. "दर्‍यांमध्ये वाकून बघू नकोस स्टंटस नकोत" हे आईचे शब्द जमेल तितके पाळायचा मी प्रयत्न करत होतो. माझं सहलीला गेल्यावर कानात वारं शिरल्यासारखं हुंदाडणं आईला काही आजचं नव्हतं. लहानपणी एकदा टिटवाळ्याला आई मोठ्या कौतुकाने मला घेऊन गेली होती. गणपतीचं दर्शन घेतलं, हिंडलोफिरलो. मला तिथली नदी बघायची होती, म्हणजे तशी ती पायवाटेनेही दिसत होती पण मला ती आणखी जवळून बघायची होती, नदीमध्ये पाय डुंबवून यायचं होतं. आईने नन्नाचा पाढा सुरू केल्या. म्हणजे आईच्या म्हणण्यानुसार पोक्त माणसांसारखी नुसती देवळं बघायची, ट्रेनमध्ये बसायचं, घरी यायचं अभ्यास करायचा आणि दुसर्‍या दिवशी नेहमीसारखं शाळेत जायचं, एवढीच माझी सहल, हे शक्य नाही, मला आणलच कशाला इथं मग? माझ्या डोक्या बंडखोरीचे विचार घुमू लागले आणि संधी मिळताच मी माझा हात आईच्या हातातून सोडवून घेतला आणि नदीच्या काठालगतच्या उतारावरून दुडूदुडू खाली नदीच्या दिशेने धावू लागलो. आईने मला धावताना पाहून घाबरून हाका मारारला सुरुवात केली पण थांबतय कोण, थांबून ओरडा खाण्यापेक्षा पाय बुडवून मागाहून लमसममध्ये मार खाऊ अशा विचाराने मी आणखी जोरात धावू लागलो. पण शेवटी एकाने माझा दंड धरला आणि आईसमोर नेऊन उभं केलं. आईने धपाटे घातले आणि निगरगट्ट, निर्लज्ज मी श्या हे मध्ये येणार माहित असतं तर यांना चकवलं असतं असा विचार करत करत आठ्या पाडून तोंड फुगवून "पण मी फक्त बघायला जात होतो ना" असं म्हणत बाजू मांडायचा प्रयत्न केला. नंतर रडवेलाही झालो, धपाट्यांमुळे नव्हे प्रकरण तीर्थरुपांपर्यंत गेलं तर सॉलिड पडणार होती. कारण ते खरे धपाटे देतात, आई नुसती डोळे मोठ्ठे करते आणि खूप मार देईन असं भासवून एक दोन चुटपुटत्या चापट्या मारते आणि थोड्या वेळाने जवळ घेऊन लागलं का? पुन्हा असं करू नकोस असंही सांगते. सुदैवाने प्रकरण तीर्थरुपांपर्यंत नाही गेलं. तेव्हापासून माझी पिकनिक आईसाठी डोकेदुखी होते. मी सॅक भरायला घेतली की तिचा चेहरा बघण्यासारखा होतो.

भरपूर फिरल्यावर हॉटेलात जेवायच्या वेळेत पोहोचलो. ताटं तयार होतीच, जेवण गुजराथी पध्दतीचं होतं, सुरुवातीला गरमागरम चपात्या आणि तीन-चार प्रकारच्या भाज्या एक आलू-गोभी, एक मिक्स वेज, एक फ्लॉवरची भाजी, आमटी, शिवाय दोन-तीन चटण्या, लोणचं, कोशिंबिर यांनी ताटं सजली होती. जेवणं बघून भूक न चाळवली तर नवलच, इथलं जेवणंही वेगळ्या चवीचं, एकदम चविष्ट जसं आपल्या गावच्या जेवणात तिथल्या पाण्याची चव मुरून राहिलेली असते तसंच काहीसं. आमच्यापासून दोन-तीन टेबलं सोडून थोड्या दूरच्या टेबलांवरची खरकटी ताटं हॉटेलवाल्यांनी उचलली नव्हती, बहुतेक आमची बडदास्त राखण्यात त्या ताटांकडे दुर्लक्ष झालं असावं. पण माकडांचं प्रत्येक ताटाकडे लक्ष होतं. कोणाचं लक्ष नाही असं बघून माकडं पत्र्यावरून टेबलावर येत आणि ताटातील उरलेसुरली पापड, पुर्‍या, बटाटे यांचा तोबरा भरत. सगळ्यांना सकाळचा प्रसंग आठवला. तिथल्या कर्मचार्‍यांनी काठीचा धाक दाखवला तशी सगळी वानरसेना पसार झाली, आणि आमचं जेवणात लक्ष लागलं. तरी माकडांचं पत्र्यावरून आत हॉटेलात डोकावणं चालूच होतं. मला सगळ्यात मजा वाटते ती छोट्या माकडांची. लहान मुलांसारखी तुळतुळीत डोक्याची माकडाची पिलं माकडीणीच्या छातीला अगदी घट्ट बिलगून असतात. माकडीणीलाही त्यांचं ओझ जाणवत नाही की अडथळा होत नाही, इतर माकडांसारखीच ती लिलया उड्या मारत असते. माकडांची चुळबूळ सांगत होती कि ही माकडं बहुतेक आमच्या उठण्याची वाट बघत आहेत. आम्ही नेहमीपेक्षा जास्त आणि भरभर जेवलो. जेवल्यावर थोडं हिंडलोफिरलो, त्यानंतर मुली दुसर्‍या रुमवर गेल्या, आणि आम्ही मुलगे मघाचच्याच रुमवर तंगड्या पसरून पडून राहिलो.

पाच-दहा मिनिटं पडलो नसू तोच गारवा वाढू लागला, बाहेर वार्‍याने वेग धरला, मग ओळखीचे आवाज, ओळखीचे सुवास, ओळखीचे ओघळ जाणवू लागले. बाप्पाने रेन डान्सची सोय केलेली दिसतेय.
असं वाटतं वारा कापत या दर्‍याखोर्‍यातनं उडत रहावं, उंच आकाशातनं उडता उडता हे सारं न्याहाळावं

उगाच नाही गोरे साहेब माथेरानच्या प्रेमात पडले

आलेख बघतोय असं वाटतं, निसर्ग संपत्तीचा आलेख खालावत चाललेला आलेख खरच काळजीत टाकतो, मुंबई जवळ बरेच डोंगरच्या डोंगर पोखरून नष्ट केलेत


त्या शिल्पकाराला माझं त्रिवार वंदन


सिंहाचं ट्रेकिंग

क्रमश:

२ टिप्पण्या:

  1. माथेरानला किती वेळा गेलेय याची गणतीच आता राहीली नाही. अजूनही प्रथम( पाचवीत )राहिलेले हॊटेल रॊयल आठवतेय.:) तुझ्या या लेखाने माझ्या अनेक आठवणी उजळल्यात.त्याबद्दल आभार.
    लेख छान झालाय.

    उत्तर द्याहटवा
  2. मी पहिल्यांदाच गेलो माथेरानला मित्र-मैत्रिणींसोबत, सगळ्यांच्या परीक्षा झाल्या होत्या नोकरीची शोधाशोध वगैरे चालू होतं, त्यात काही हताश होते, काहींना घरी बसून मरगळ आली होती, काही "असेल माझा हरी .." म्हणत खुशालचेंडू जगत आहोत असं भासवत होते, पण सगळ्यांना बदल निश्चितच हवा होता. आणि माथेरानने आम्हाला पुरतं बदललं, एक जगण्याची उमेद, पॉझिटिव्ह विचार दिले. त्यामुळे एक भावनिक नातंच तयार झालं माथेरान आणि माझ्यात.

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मॅम. तुमचं आणि इतर बर्‍याच जणांचं वाचून, त्यातली भाषाशैली, विचार मांडण्याची पद्धत बघून थोडं बरं लिहिण्याचा प्रयत्न करतो. लेखाचं सारं श्रेय माथेरानचं आणि त्या सृष्टीनिर्मात्याचं.

    उत्तर द्याहटवा