नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

मनात माझ्या

मनात माझ्या कालवाकालव
मनात बधीर शांतता
भावनांचे .. घटनांचे धागेदोरे
विचारांचा गुंता
मनात ओरखडे
मनात पापुद्रे
मनात भेगा
मनात रेघा
असंख्य रेघा
उभ्या आडव्या तिरप्या दिशाहीन ...
मनात असंख्य रेघांचे अगणित छेदबिंदू
मनात धुळीचा राप
भितीची धाप

मोजमाप आणि शिव्याशाप ...
मनात आरशाचा फुटका तुकडा
त्यात दिसणारी देहाची लक्तरं
थरथरणारे ओठ
खपाटीचे पोट
मनात कुसकं नासकं कधीचं बरच काही
शर्टाची निर्धाराने दुमडलेली बाही
आणि हळूवार अंगाई ...
बाळा जो जो रेऽऽ
मनात स्वच्छ शुभ्र दिव्य प्रकाश ...- प्रसाद साळुंखे कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा