नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

सगरी लफरी त्येच्याएला






सात दिवसाचा गणपती. मंगळवारी विसर्जन, तर मित्राला सांगितलं बाबा बुधवारी रजा घेतो म्हणजे विसर्जनाला कितीही उशिर झाला तर लफडा नाही दुसर्‍या दिवशी मस्त आराम करायचा. तर यावर "नाही नाही एडा  मंगळवारी घे रात्री भजन करू." भजन रात्र भर डोळे लुकलुकले. मनात लाडू फुटला. लगेच रजा टाकली. बॉसही राजी झाला.  आता डोळे तारवटून नरडा ताणून भजन. मंडळाच्या गणपतीचं हे 25वं वर्ष. त्यामुळे उत्साहाचं वातावरण. सोमवारी एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम गच्चीवर पार पाडला त्यानंतर सहभोजनाचा बेत होता. त्या निमित्ताने सोसायटीतल्या जुन्या नव्या रहिवाशांची भेटीगाठी होत होत्या. 

सहभोजनाचा कार्यक्रम उरकला. मूड बनवायला पहिलं स्टेशनला आईस्क्रिम खाल्लं आणि मघई पानं तोंडात कोंबली. येता येता आर के स्टुडिओचा गणपती क्लिकला. सोसायटीत आलो. ढोलकीवाला मित्र ढोलकी घेऊन तयार होता. मंडळाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी आपला 'कसिनो रोयाल' आवरला. हॉलभर चटया चादरी अंथरून बैठक तयार केली.  वातावरण भक्तिमय करण्यासाठी दोन अगरबत्त्या जास्त लावल्या. काहीजण दम मारायला गेले.

बोला पुंडलिका वरदे हरी विठठल 
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
हरीहर महादेव.  

आता ही टाळकी खरंच भजन करणार आहेत याची सोसायटीला खात्री पटली. 'गजानना श्री गणराया' ने सुरवात झाली. बरं जमलं.  त्यामागोमाग 'रुप पाहता लोचनी', 'तुका म्हणे हेचि सर्वसुख', 'या विठूचा गजर हरी नामाचा', 'हे भोळ्या शंकरा', 'हरी भजनी मोर नाचतो अंगणी', 'पायी हळू हळू चाला' वगैरे भजनं जोरदार केली. भजनांचा स्टॉक संपत आला. अरे हे गाणं घे ते घे असं चालू होतं.  'देव देव्हार्‍यात नाही' आठवलं.   म्हटलं.   सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर .. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार .. आलं तेवढं जमेल तसं अर्धमुर्ध भारुड म्हटलं. नंतर 'देहाची तिजोरी' म्हटलं. 

दिड वाजता ब्रेक घेतला, लोक दम मारायला बाहेर गेले.  ढोलकीवाल्याने ढोलकीला ठाकेठोके दिले. पीठ लागलेल्या बाजूने पाण्याचा हलका हात लावला. आम्हीही पाणी प्यायलो फुटाणे खाल्ले. आम्ही ब्रेकनंतर गवळण त्यानंतर फिल्मी गाणी गातो. 'यमुनेच्या तिरी काल पहिला हरी' घेतलं. नंतर आता भक्तिरसाचं अजिर्ण व्हायच्या आत ट्रॅक चेंज करूयात असं ठरलं.  'तुमतो ठेहरे परदेसी' करत साक्षात अल्ताफ राजाच आमच्या नरड्यात उतरला. मध्येच 'गणा धाव रे' कोणी तरी म्हटलं.  'शहेरमे हूं मे तेरे आके जरा देख तो ले, दे ना तू कुछ मगर आके मेरा दिल तो तू लेले जाना' रॉकस्टारच्या या गाण्यावर ढोलकीवल्याला तारे दिसू लागले.  "काय डोंबल वाजवू?" हशा आणि एकमेकांची थट्टामस्करी. पण झोपायचं मात्र कुणाच्याही मनात नव्हतं.  उद्या आपल्या बाप्पाचं विसर्जन. आज रात्र जागवायचीच. फर्माईश.  मध्येच कोणीतरी मला म्हटलं अमर अकबर ऍंथोनीमधलं 'पर्दा है पर्दा' घे.  मी खाकरलो. ढोलकीवाल्याला एक लूक दिला. शून्यात बघत कसलातरी सूर मनातल्या मनात हेरला.  मग ओरिजिनल सूर आणि मनातला सूर सोडून भलत्याच टिपेच्या सूरात सुरु झालो. 

"शबाबपर मै जरासी
शराआआआआआआआआआआआब फेकूंगा
किसी हसीं की तरफ 
ये गुलाब ...."  

म्हणत दरवाज्याकडे मान गेली आणि गुलाब कुस्करला.  दोन कॉन्स्टेबल्स हात मागे घेऊन टिपीकल पोलिसी पोझमध्ये उभे. म्हटलं बाप्पा मला आजच उचलणार बहुतेक. माझे तमाम पंखे इयत्ता सातवी ते बारावी खिकीखिकी करून कॉन्सटेबल समोर हसत होते. माझ्या मित्राने प्रसंग सावरला.  "दर्शन घ्या, ए प्रसाद घे रे, उद्या विसर्जन आहे ना तर ही लहान मुलं म्हणाली भजन करुयात" यावर कॉन्सटेबल "नाही पण आवाज?" "नाही आता थांबवतच होतो आम्ही ए झोपा रे घरी जाऊन सगळे" मुलं खिकीखिकी.  कॉन्सटेबलला घेऊन मित्र बाहेर पडला (का कॉन्सटेबल मित्राला?? जाऊ दे .. ते बाहेर पडले, हे महत्वाचं)  माझ्या मित्राला "तुम्ही अध्यक्ष का?" "नाही अध्यक्ष वयस्कर आहेत ते आता झोपलेत" "अं परवानगी???" "आहे ना आहे ना लेटर दिलंय" काही वेळ शांतता "दिलंय ना?" "हो हो दिलंय दिलंय दिलंय" मान डोलावत इलेट्रॉनिक आयटम्सच्या सेल्मनसारखं उत्तर दिलं म्हणजे " हो हो बिनधास्त घ्या वॉरेंटी आहे-वॉरेंटी आहे-वॉरेंटी आहे" बहुतेक एक गोष्ट तीनदा सांगितल्या समोरच्याचे कन्विंस होण्याचे चान्स तिप्पट होत असावेत. "कंपलेट आलीय, पन आता ल्हान मुलांवर काय कारेवाई करनार? आत तर नाय टाकून चालनार" "नाही बंदच करत होतो आम्ही" ढोलकीवाला बहुतेक उठून गेला, बाकी पोरं दरवाजातून अंदाज घेत खिकीखिकी करत होती "नाही म्हना गानी, पन टाळ वगैरे कशाला वाजवता, आपलं हळू आवाजात म्हना" मध्येच आत बघत "ए झोपा रे काय चाललंय, तिकडे तेल बघ समईत, सॉरी हं साहेब तुम्हाला जरा त्रास झाला" बरंच बाबापुता केल्यावर मामा लोक गेले एकदाचे. हुश्श "अरे येडXX नो हवालदारांसमोर काय हसता? येड्या XXX साले, टाकला असता तर आतमध्ये?"  खिकीखिकी "मी नाय हा" "गप ना" "जा ना" खिकीखिकी. 

हवालदार निघून गेले. माझे मित्र आणि मी बाहेर येऊन चर्चा करू लागलो.  साला 25 वर्ष भजन करतोय तर कोण नाय आलं आणि इथे दोन नाही वाजले तर कॉन्सटेबल हजर. कंप्लेंट केली कोणी?  वेगवेगळे अंदाज निघाले.  हा नाही करणार रे, त्याच्या मस्ती आहे तो पक्का करेल, मागे गरबाही थांबवलेला. आजूबाजूचे बिल्डिंगवाले जळतात.  चर्चेचे आवाज चढू लागले.  कोणीतरी शंका व्यक्त केली ते परत आले तर? हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी विरळ झाली. साले शेपूटघाले. आम्ही चारपाच टाळकी गणपती बसतो त्या जागी आलो सतरंज्या अंथरल्या, केळी खाल्ली. मी मित्राला म्हटलं ज्याने कोणी कंप्लेंट केली असेल त्याची उद्या पक्का जळेल, दणका करू विसर्जनाला. 

सकाळी माझ्या डोळ्यावर झोपेचा अंमल असताना "हा इथे काय करतोय?" "आम्ही झोपलेलो रात्री" संवाद ऐकून उठलोच. मखर ..गणपती .. अच्छा सोसायटीतच आहोत. सकाळचे आठ वाजले होते.  आमचे पंटर्स लवकर उठून घरी जाऊन ढाराढूर पंढरपूर झाले होते. मी लोळत पडलो होतो. सकाळी ऑफीसला जाणारे गणपतीच्या सुबक मूर्तीच्या पाया पडत, मग अस्ताव्यस्त झोपलेल्या माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत निघून जात. वैतागून उठलो एकदाचा "ए काय यार सगळे कल्टी साल्यांनी उठवलं पण नाय, जाम भूक लागलीय यार" "हम्म चल" मित्राच्या रिक्षातून स्टेशनला येऊन मिसळपाव चापला, ट्रेन पकडली, नेहमी ट्रेन डुलते मी फ्रेश असतो, आज ट्रेन धडधडधड ताजीतवानी होती आणि मी तिच्यात बसून सावध डुलक्या घेत होतो. घरी आलो.  दिवसभर झोपलो. विसर्जनाचा कुर्ता पायजमा कडक इस्त्री होऊन आला होता.  ताईच्या लग्नातले फेटे शोधून काढले आणि बॅगेत कोंबले. मंडळाचं 25 वं वर्ष असल्याने वेगळाच उत्साह होता. सगळ्यांना मंडळाच्या वतीने पिवळा कुर्ता दिला होता, छोटे मोठे पोरं पोरी सगळे पिवळे, काहींच्या मते तो शेंदरी होता, काहींच्या मते तो भगवा होता, पण होता पिवळाच. फेटे आणले खरे पण बांधता कोणालाच येईनात. आम्हीच मग फेट्यासारखं काहीतरी दिसेल अशा हिशेबात फेटे डोक्याला गुंडाळले. बाहेर वाजप तालीम करत होतं.  टेंपो झावळ्यांनी, झेंड्यांनी, फुलांनी, फुग्यांनी सजवला.  मंडळाचा बॅनरही लावला. गणपतीची आरती म्हणताना प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. निर्माल्याच्या पिशव्या मागे टाकल्या, पाण्याची टाकी चिल्लीपिल्ली बायकापोरं टेंपोत ढकलली. बाप्पा टेंपोत आसनस्थ झाले. आणि नाचायला सुरुवात झाली.

दहा मिनिटांनंतर नाच रंगात आला.  जोगव्यातल्या गाण्यावर तर धमालच आली, हे गाण खरंच अंगात भिनतं.  ज्याने कोणी तक्रार केली त्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्यांदा आम्ही ओरडत होतो.  मग सोसायटीतल्या जोडप्यांना फुगड्या घालायला लावल्या.  तेवढ्यात मित्र म्हणाला ते बघ ते कालचे कॉन्सटेबल्स. हाहाहा आज आम्ही शेर होतो (निदान मंडळाने लावलेल्या दोरखंडाच्या अल्याड तरी) आम्ही अजून जोशात नाचलो. अडवून दाखवा असंचं जणू सांगायचं होतं. तीन चार तास नाचतच होतो मध्येच थांबलो वडापाव आणि थंडा प्यायलो. नंतर पुन्हा 'चलाओ न नैनो से बाण रे' वर नाचायला सुरुवात. आमची मस्ती नडली. 10.15 ला पुन्हा पोलिस आले बंद करा , म्हणून निघून गेले. बेंजोवाल्यांनी आवरतं घेतलं मग शेवटचं दहा मिनटंच वगैरे गयावया केली तेव्हा वरिष्ठ कार्यकर्ते राजी झाले आणि वीस मिनिटं नाचलो. नंतर मात्र खरोखर बंद केलं विसर्जनाच्या तलावाकडे जाताना पहिला लेफ्ट पकडला. आम्ही गप्प कसले बसतोय बेंजो थांबवला ना "ए बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया"  फूल्ल नारेबाजी.  मध्ये पोलिस येऊन आता इथे वाजवा चालेल म्हणाले, पण बेंजोपार्टी केव्हाच गेले होते. 


तलावाजवळ आलो तर काही मंडळांचं मस्त वाजवणं नाचणं सुरु होतं.  तळपायाची आग मस्तकात गेली.  पोलिस लोक तर डोक्यातच गेले होते. जरा सभोवताली नजर टाकली. बरीच गर्दी होती.  इथे पोलिस नसते तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही.  हसतमुखाने एका कॉन्सटेबलला प्रसाद घेताना बघितलं.  म्हटलं याच्या घरी आवारात चाळीत नसतील का गणपती? त्यांची पूजा आरती विसर्जन करायला यांना जायला मिळत असेल का?  म्हणजे ज्या भजनाच्या रात्री ते आम्हाला झापत होते. त्यावेळी त्यांचं कुटुंबही त्यांची वाट पाहत असेल.  आमच्या विसर्जनाच्या मिरवणूकीकडे कदाचित खुन्नसने पहात नसतीलही त्यांनाही आठवण येत असेल काही हरवत चाललेल्या क्षणांची.  सण साजरा करणारे आम्ही आणि कंप्लेंट करणारे सो कॉल्ड उच्चमध्यवर्गीय किंवा उपद्रवी सु(अति)शिक्षित यांच्या कात्रीत सापडले असतील. आता दोघांना कसं खूष ठेवणार म्हणून हळू आवाजात गाणी म्हणा टाळ वाजवू नका हा वे आऊट.  सरळ 'बंद करा ही थेरं' असं पोलिसी खाक्यात म्हणू शकले असते की? गर्दीच्या जोरावर वर्दीतल्या माणसाला आता अडवून दाखवा असा ऍटिड्यूड दाखवणं म्हणजे त्या रजा अकादमीतल्या मोर्च्यातल्या हिजड्यांसारखं नाही का? रागाला कारणं असतात आमच्याही होती.  पण वर्दीतला माणूसही आमचाच की.  हट जाम बेकार सगरी लफरी त्येच्याएला.  गणपती आला भाय आपला. ए आप .. आपला गनपती , ए बोला गणपती बाप्पा, घशाला घासून आलेला डोळ्यात गुलालाबरोबर उतरलेला पुसट अस्पष्ट  'मोरया' ... विसर्जन. तीनदा बुडवला. पहिल्यांदा बुडवला बाहेर काढला, दुसर्‍यांदा बुडवला बाहेर काढला, तिसर्‍यांदा बुडवला तेव्हा फक्त बुडबुडेच ...


- प्रसाद साळुंखे  

४ टिप्पण्या: