नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

चुरापाव vs चोरपांड्या

एक चोर आपल्या चुरापावचे लचके तोडून शेजारच्या गल्लीत विकतोय असं आम्हाला समजलं. "अच्छा काय चोरलं? कविता का? बरं" असं नेहमीसारखं वाटलं मला. आता काही दिवसांनी आपलीच कविता आपल्याला मेल येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. मित्र म्हणाले झाप त्याला. झापणे आपल्याला झेपणे नाही, पण म्हटलं निदान ही कविता माझी आहे असं सांगूयात त्या चोराला. पण उत्तर आलं "थिंक बीफोर सेईंग एनिथिंग". च्यायला म्हटलं हा प्रकार जाम धमाल वाटतोय. याची भन्नाट पोस्ट होऊ शकते. झापू तर शकत नाही निदान चोराला डिवचून डिवचून त्याच्या मनातलं बाहेर येतय का? किंवा त्याचं मन बदलता येतं का? पाहूया. पण झालं उलटंच आमच्यापैकी कोणीही मागे हटेना, करता करता या वादाची एक साखळीच तयार झाली. दरम्यान मी ह्याची उत्तरं वाचून इथून तिथून माहिती मिळवून चुरापाववर कॉपी हा प्रकार बंद केला. विरोधाभास म्हणजे कॉपी पेस्ट बंद करायला लागणारा कोड मी कॉपी पेस्टच केला. तरी आताही चुरापाव सुरक्षित आहे असं मी म्हणणार नाही. मला हे सारं जसच्या तसं लोकांसमोर यावं असं वाटलं, माझे वादातले सगळे मुद्दे बरोबर असतीलच असं नाही, प्रसंगी मी उद्धटही वाटतो, पण जे काही आहे ते चुरचुरीत आहे. करा मग सुरुवात.


7th Feb. 2010 प्रसाद साळुंखे
सदर कविता माझी आहे. ब्लॉगवर ठेवल्याबद्दल आक्षेप नाही, पूर्वपरवानगीची अपेक्षा करणं मी कधीचच सोडलं आहे. निदान माझ्या नावाचा आणि जिथून कॉपी पेस्ट केलीत त्या संकेतस्थळाचा पत्ता द्यावा ही माफक अपेक्षा. नाव, आणि ब्लॉगची लिंकही कॉपी पेस्ट करता येईल. ही कविता सुमारच आहे पण, तुमच्यासारख्या लोकांमुळे चांगल्या कविता पोस्ट करायला लोक धजावत नाहीत आणि पर्यायाने रसिकांचंही नुकसान होतं. आशा करतो तुम्ही दखल घ्याल.


8th Feb 2010 प्रसाद वाणी
Hi kavita konachi hyachi mala kahi purva kalpana nahi. mala ek email aala jyat ti kavita hoti, ti mi blog var takali. aani blog chya survatilach mi lihila aahe ki blog madhalya kavita mala email thru milalya aahet, tyachya mul shreya tya lekhakas aahe. so please think before saying anything.


8th Feb 2010 प्रसाद साळुंखे
Hi kavita konachi hyachi mala kahi purva kalpana nahi. mala ek email aala jyat ti kavita hoti, ti mi blog var takali. aani blog chya survatilach mi lihila aahe ki blog madhalya kavita mala email thru milalya aahet, tyachya mul shreya tya lekhakas aahe. so please think before saying anything.
हे तुमचं उत्तर,

हे उत्तर तुम्ही इथे कमेंटमध्ये लिहिलं असतं तरी चाललं असतं निदान लोकांना कळलं असतं की कॉपी पेस्ट व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी लिहिता ते. तुमच्या भाषाशैलीचं विशेष कौतुक, त्यातून तुमचे विचार, तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमची (ना)लायकी दिसून येते. तुम्हाला राग का आला? मी म्हटलं की कविता माझी आहे म्हणून, माझ्या गोष्टीला मी माझी म्हणू नये? लोकांकडून फार अपेक्षा बाळगता बुवा तुम्ही, तुम्ही फार विचारी दिसता, लोकांनी बोलण्याआधी विचार करावा पण मी वागण्याआधी करणार नाही हे बहुदा तुमचं ब्रीदवाक्य असावं. एका पुसटशा ओळीत सगळ्या कविंना, लेखकांना गुंडाळून (श्रेय देऊन) तुम्ही हात झटका. उत्तम. आवडणं आणि ब्लॉगवर टाकणं यावर माझा आक्षेप नाहीच आहे पण त्यालाही एक पद्धत असते. तुम्हाला झोंबलं आणि निधड्या छातीने तुम्ही इथे लोकांसमोर उत्तर न देता आपल्या स्वभावाला अनुसरून पळपुट्या मार्गाने मला विरोपाव्दारे समज दिलीत यातच सगळं आलं. यावेळीही मी पुन्हा तुमच्याइतका नाही (ती पातळी गाठणं केवळ अशक्य) पण पुरेसा विचार करून म्हणीन की तुमच्यासारख्या लोकांमुळे चांगल्या कविता पोस्ट करायला लोक धजावत नाहीत आणि पर्यायाने रसिकांचंही नुकसान होतं. एकदा नाही वारंवार म्हणेन
तुम्ही साहित्यचोर आहात.
तुम्ही साहित्यचोर आहात.
तुम्ही साहित्यचोर आहात.

काय करायची ती सावरासावर इथेच करा लोकांनाही दिसू देत तुमचं साहित्यप्रेम आणि आमच्या सारख्या उद्धट लोकांशी तोलूनमापून बोलण्याची तुमची कला. अजून लिहित बसलो तर कदाचित सभ्यतेची पातळी ओलांडेन आणि तुमच्या पंगतीत बसेन, जे मला करायचं नाहीए, तेव्हा आवरतं घेतो.

तब्येतीला जपा.


9th Feb 2010 प्रसाद वाणी
धन्यवाद मित्रा तू जे म्हणालास ते मला खरच पटला. हो आहे मी साहित्या चोर. आणि मी ते मान्या सुद्धा करतो. पण याचा अर्थ असा नाही की माझी पोस्टिंग थांबतील कारण तसा करणा हाच या ब्लॉग चा उद्देश आहे. आणि तू म्हणाल्या प्रमाणे मी माझ्या ब्लॉग चा नामकरण सुद्दा केला. म्हणजे पुन्हा पुन्हा अस मला कोणी समजावून सांगणार नाही. आणि जर कोणी छान लिहिला आणि त्याचा आपसूकच प्रसार होत असे मग भले त्याचा नाव असो किव्हा नसो ते वाईट नाही. पु.ल.देशपांडे, बहिणाबाई चौधरी, आचार्य अत्रे या सारखी बरीच उदरणा देता येतील यानी काही आपल्या कवीताना पेटंट करून घेतला नाही पण तरी ती आजरामर झाली. चांगले लेख येताच राहतील, पोस्टिंग करणारे पोस्ट करत राहतील आणि मी कॉपी पेस्ट करत राहील. माझ्या या कार्या मुळे चांगले लेखक पोस्ट करावायला धजावट नाही असा काही असेल मला वाटत नाही. पण ज्यांचे लेख माझ्या ब्लॉग मधे आहेत त्या सर्वची मी माफी सुरवातिलच माहितली आहे. पण या ब्लॉग चा अर्थ तुमच्या हातून चांगला लिखाण थांबना हा मुळीच नाही.

मित्रा,
तू सुद्धा काळजी घे.


11th Feb 2010 प्रसाद साळुंखे
नमस्कार

तुम्ही तुमच्या ब्लॉगचं नामकरण करा की तेरावं घाला मला त्याच्याशी काही सोयरसुतक नाही. आहातच साहित्यचोर मी काही तुम्हाला कुठली पदवी नाही दिलेली, सच्च्या दिलाने साहित्यावर प्रेम केलं असतंत तर ही शिवी वाटली असती तुम्हाला. एक बरं वाटलं की माझं म्हणणं तुम्हाला काही अंशी पटलय, इतकं की तुम्ही तुमच्या ब्लॉगचं नावही बदललंत. तुम्ही साहित्यचोर आहातच त्याचबरोबर निर्लज्जही आहात. राहू देत पुन्हा ब्लॉगचं नाव बदलायला जाऊ नका. "जर कोणी छान लिहिलं की त्याचा आपसूकच प्रसार होतो मग भले त्याचं नाव असो किंवा नसो ते वाईट नाही" वा!!! लाजवाब!! किती मुद्देसूद लिहिता तुम्ही. 'त्याचा आपसूकच प्रसार होतो' म्हणजे नक्की कोणाचा? नावच नसेल हा "त्याचा" नेमका कोण हे कसं ठरवणार? नाही म्हणजे ज्याने कविता लिहिली त्याचा?, ज्याने ती कॉपी करून जगभर मेल धाडले त्याचा?, की मेलवरचं आवडलं म्हणून प्रसार करण्याची जबाबदारी पार पाडण्याचा घाट घालण्याच्या निर्मळ हेतूने प्रेरित झालेल्या आपल्यासारख्या निष्पाप, निरागस, मेहनती ब्लॉगर्सचा? नेमका कोणाचा प्रसार तुम्हाला अपेक्षित आहे ते सांगितलत तर बरं होईल. या न्यायाने विचार केला तर पु.ल. देशपांडे, बहिणाबाई चौधरी, आचार्य अत्रे यांनीही त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांची नावं छापायला नको होती. माफ करा मी थोडा स्पष्टवक्ता आहे, तुम्ही पु.ल. देशपांडे, बहिणाबाई चौधरी, आचार्य अत्रे यांच्यासारखी बरीच उदाहरणे देता येतील असं म्हटलंत, पण मला नाही वाटत, या तीन नावांपलिकडे तुम्हाला किती नावं माहित असतील आणि यांच्याही नावापलिकडे तुम्हाला त्यांच्या साहित्याची कितपत जाण असेल याबद्दलही मला शंका आहे. यांनी आपल्या कवितांना पेटंट केले नव्हते हे मला तुमच्याकडून कळलं तुमचं ज्ञान अगाध आहे. पण तुमच्यासारख्या उचल्यांनी यांनाही सोडलं नाही यांचंही साहित्य स्वत:च्या नावावर खपवणारे महाभाग आहेतच, केवळ काहीतरी खरमरीत लिहायचंय म्हणून मी अतिशयोक्ती करतोय अशातला भाग नाही, मला असे मेल आले आहेत. मी काही तुमच्याकडे कॉलर धरून वसूली करायला आलो नव्हतो की पेटंटच्या विषयाकडे वळावं. जे अजरामर आहेत त्यांना अजरामर राहू देत तुमच्यासारख्यांच्या तोंडून त्यांची नावं नाही घेतली गेली तरच चांगलं होईल. आता तुम्हाला एक वाटतं, तुम्ही मारे खात्रीशीर सांगा की तुमच्या कार्यामुळे कोणी पोस्ट करायला धजावणार नाही असं मला नाही वाटत, पण माझ्या ओळखीतल्यापैकी असे बरेच आहेत ज्यांनी या कारणापाई चांगल्या कविता, लेख ब्लॉगवर लिहित नाहीत. तुम्हाला काय वाटतं यापेक्षा या लेखकमंडळींना, कविंना (स्वघोषित) काय वाटतं हे जास्त महत्वाचं नाही का? कारण त्यांनी पोस्ट नाही केलं तर तुम्ही पेस्ट काय करणार? एक सुधारणा तुमच्या वाक्यात कराविशी वाटते तुमच्या या कृत्याला 'कार्य' नाही 'चौर्य' म्हणतात. तुम्ही एका ओळीत सगळ्यांना श्रेय दिलं आहात ब्लॉगच्या नावाखाली, माफीचा उल्लेख मला दिसला नाही, सुरुवातीला माफी मागून तुम्हाला हवं तसं वागायला हक्क मिळतो हा तुमचा गैरसमज आहे. अरेरावी आणि उरबडवेगिरी करण्यापेक्षा सारं पूर्वपरवानगीने, अगदीच नाही तर निदान योग्य रितीने साहित्यिकाच्या नाव आणि संकेतस्थळाच्या पत्त्यासकट पेस्ट झालं तर काय वाईट आहे. खरं तर तीही तसदी घ्यायची गरज नाही, खर तर असल्या आगाऊ, भिकार मध्यस्थीची गरजच नाहीए, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे काही चांगलं लिहिलं तर आपसूक प्रसार होतोच. केवळ तुमच्या सारख्या उचल्यांच्या ब्लॉगवर लेख, कविता पेस्ट झाल्या म्हणजे आमच्या दारात प्रकाशकांची रांग लागेल असं तर नाहीए ना? होतो तो शेवटी मनस्ताप. आम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर आम्ही जाऊ की प्रकाशकांच्या पायर्‍या झिजवायला. पण आम्हाला लोकांना आवडतय का? कितपत रुचतय? ते पहायचय, त्यांची कौतुकाची थाप, त्यांच्या टिका टिपण्ण्यांमध्ये वाचायच्या आहेत, अजून कुठे सुधारणा करता येतील ते पहायचय, म्हणून हा सारा खटाटोप. माझ्या लिखाणाची काळजीच सोडा तुम्ही ते थांबणार नाही कागदावर नाही उठलं तरी मनात बरच काही रेखाटत असतो मी. मी पोस्ट करायला धजावणार नाहीत असं म्हटलं होतं लिखाण थांबेल असं नाही. तुझं कॉपी-पेस्ट थांबणार नाही कारण चौर्य हे तुझ्या संस्काराचं प्रतिबिंब आहे, त्याप्रमाणे लेखन हे आमच्या अनुभवांचं प्रतिबिंब आहे आयुष्यभर ते चालतच राहिल. कॉपी-पेस्ट करायला केवळ तीनचार सेकंद लागतात, पण मनातलं कागदावर कॉपीपेस्ट करायला थोडासा जास्त वेळ लागतो. आणि एक विनंती मला मित्रा म्हणू नकोस, मला तुझ्यासारख्यांशी मैत्री करण्याची माझी खरच लायकी नाही. मी बरच लिहिलय पोटतिडिकीने लिहिलय, तुमच्या ब्लॉगवर माझ्या कवितेखाली हे लिहायचं होतं पण तुमच्या ब्लॉगच्या नामकरण सोहळा प्रकरणामुळे मला ते शक्य झालं नाही. हे उत्तर द्यायला थोडा उशिर झाला कारण कॉपीपेस्ट पलिकडे, पोकळ चर्चांपलिकडेही मला बरीच कामं असतात. तुम्ही नाकारा किंवा निर्लज्जपणे मान्य करा पण तुम्ही साहित्यचोर आहात, आणि तुमच्या मी पेस्ट करत राहिनच या निर्णयात, चोर्‍या करण्यांनी मला मेल धाडावेत मला आवडलं तर मी ब्लॉगमध्ये टाकेन अशा विचारात, केवळ एखाद्याच्या मतांना आपली चूक न मानता केलेल्या अविचारी विरोधात, तुम्ही एक प्रकारे भविष्यातही साहित्यचोरांना दिलेलं प्रोत्साहन ठळकपणे दिसतय. माझ्या या लिखानाचा काडीमात्र परिणाम होणार नाहिए, पालथ्या घड्यावर पाणी आहे सगळं. तरी वाल्याचा वाल्मिकी होईल अशी वेडी आशा करतो. माझ्या तब्येतीची काळजी करु नका, मी तब्येतीत आहे, तुम्हीही तब्येतीत रहा.


12th Feb 2010 प्रसाद वाणी
हे बघ मला वाटत नाही चोरी करतो आहे, कारण चोरीच करायची असती तर मी माझ्या नावावर कधीच खपवला असता. पण जे मी केलाच नाही त्याचा श्रेया घेत नाही. आणि आता तू म्हणतोस त्या प्रमाणे जो कोणी कविता लिहितो त्याचा नाव तिकडे असावा असा मला ही वाटता पण मेल वर कितपत विश्वास ठेवू हे तूच सांग. आणि बहुतेक वेळा कविता फक्ता फॉरवर्ड केलेली असते. जशी ही कविता "दहाची नोट" ना लेखकाचा पत्ता ना त्याच्या साईट चा उल्लेख मग मला कळणार कसा की ही कोणाची. त्यामुळे आहे तशी कॉपी करतो. आणि तू हे सांगणारा पहिला नाहीस कारण आधी मी मेल मधे जे नाव होत ते टाकायचो पण मग मला पोस्ट येत गेल्या की ही कविता माझी आहे म्हणून. मग मी ठरवला की मला कवी माहीत नाही मी फक्त या ब्लॉग मधे कविता कॉपी पेस्ट केल्या आहेत हे सरळ सांगायचा. त्यातून तुमच्या सारख्या लेखकांची मने दुखावण्याचा काही हेतू नव्हता. आणि तशी मने दुखवली जाण्याची शक्यता वाटली म्हणून नमूद पण केलेला आहे की जर ही कविता कोण्या लेखकाची आहे तर त्यानी कृपया तसा मला सांगाव ही माफक अपेक्षा मी केलेली आहे. यात मी काही चुकीचा वागलो असे मला वतट नाही. कारण तसा ज्यांनी ज्यानी सांगितला त्या नुसार मी बदल केलेले आहेत. कदाचित तुझ्या नजर चुकीमुळे तू ते बघू शकाला नसशील.


12th Feb 2010 प्रसाद साळुंखे
तुम्ही कसाबसारखे जबाब बदलू नका. मागे म्हणालात हो आहे मी साहित्यचोर पुढेही कॉपी पेस्ट करतच राहिनच. आणि आता तुम्हाला वाटतय तुम्ही चोरी करत नाही. चला तुमच्या विचारात नाही पण भाषाशैलीत निश्चित फरक पडलाय, फार मवाळ वाटली भाषा पूर्वीपेक्षा, मला तर कळेचना हा नक्की तुमचाच मेल वाचतोय की आणखी कोणाचा? तुम्हाला हे तितकसं गंभीर वाटत नसेल, पण तुम्ही कळत नकळत अशा चोरांना प्रोत्साहन देत आहात, असं तुम्हाला खरच नाही का वाटत? म्हणजे तुम्ही चोरी करा मला आवडलं तर मी कॉपी पेस्ट करीन, पेस्ट करतच राहिन या आक्षेपांची ऐशीतैशी, यामुळे काय साधतं? तुम्ही तुमची आवड स्वत:पर्यंत का नाही मर्यादित ठेवत? तुम्हाला एक कविता काय टाकली तर हा केवढं बोलतोय असं वाटेल, पण जेव्हा स्वत:ची कविता अशी पोरक्यासारखी कोणाच्या तरी ब्लॉगवर, मेलवर आलेली दिसते तेव्हा काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार. जे आवडलं ते पेस्ट करायचा अट्टाहास का? त्यातही तुम्ही म्हटल्याप्रमाणे मेल विश्वासार्ह नसतांना. मनाशी एक पक्क करा की जोपर्यंत मला कवितेचा आगापिछा माहित नसेल तोपर्यंत मी पोस्ट करणार नाही. मी लेखक, कवि वगैरे कोणी नाही, माझ्या विचारांची तेवढी झेप नाही. झाली असेल कदाचित माझी नजरचूक, पण मी तुमचा ब्लॉग वाचलाच नाही, म्हणजे मला वाचावासाच वाटला नाही. मला रागच इतका आला होता, राग म्हणण्यापेक्षा वाईट इतक वाटलं की मला तुमच्या ब्लॉगवरचं काहीच वाचावसं वाटेना, दिसत होती ती फक्त दयनीय अवस्थेतली माझी कविता. तुम्ही त्यानंतर ब्लॉगचं नाव बदललंत त्यामुळे मला तुमचा ब्लॉग दिसलाच नाही, तुम्ही केलेले बदल बघू शकलो नाही. नाहीतर मला ही सगळी चर्चा लोकांसमोर, लोकांच्यात राहून करायला आवडली असती. त्याआधी मी जेवढा ब्लॉग पाहिला त्यामध्ये ब्लॉगच्या नावाखाली एका ओळीतलं श्रेय देण्याचा मनाचा जो मोठेपणा तुम्ही दाखवला होतात, त्याबद्दल खरं तर त्याबद्दल तुमचे आभारच मानायला हवेत. त्याखाली 'वरील ओळ कृपया दुर्बिणीच्या सहाय्याने वाचावी' अशी ओळ हवी होती असंही वाटून गेलं. मुळात अक्षराचा आकार लहान त्यात त्याचा राखाडी रंग मागच्या फुलापानांच्या नक्षीकामाशी मिळताजुळता, त्यामुळे अंदाजाने मी ताडलं की तुम्ही श्रेय दिल्यासारखा काहीतरी प्रकार करताय. अशा ब्लॉगवर तुम्ही काहीही पोस्ट केलंत आणि खाली नाव नसेल तर हे सारं ब्लॉग लेखकानेच लिहिलं आहे असा सगळ्यांचा गैरसमज होणं सहाजिक आहे. कविता तुमच्या नावावर खपवायला त्याखाली तुमच्या नावाचा उल्लेख असणं गरजेचंच असतं असं नाही. नजरचूकीमुळे, आणि ब्लॉगच्या नामकरण सोहळ्यामुळे मला तुम्ही केलेले बदल दिसू शकले नाहीत. माझी नजर माझ्या बुद्धीसारखीच कमजोर आहे. तुमच्या सारखी वेचक, पारखी नजर नसल्याचा मला खेद आहे. मला माहित आहे असं समजूतीचं मी सांगणारा पहिला नाही आणि शेवटचाही नसेन, तुमच्या एकंदरीत या सार्‍याला निर्ढावलेल्या मानसिकतेतूनच ते दिसून येतं. नाही तुम्ही चूकीचे नाहीच आहात, तुम्हाला ही कविता हे लेख माझे आहेत असं मेलद्वारे म्हणणारे, तुमच्याकडून बदलाची व्यर्थ अपेक्षा करणारे चूकीचे आहेत. आमच्यासारख्यांची मनं दुखावणार नाहीत याची तुम्ही किती काळजी घेता ते तुमच्या कॉपी पेस्ट कृत्यातून आणि त्याहीपेक्षा जास्त आत्मप्रोढी मिरवणार्‍या उर्मट विधानांतून दिसून येतं. तुम्हाला कवितांची आवड असेल तर तुम्ही लोकांचे ब्लॉगस वाचा, त्यांच्याशी चर्चा करा, तुम्हाला जेव्हा खात्री होईल की ही कविता त्या ब्लॉगच्या लेखकाचीच आहे तेव्हा आणि तेव्हाच त्याला पूर्वकल्पना देऊन तुम्ही त्याच्या नावासकट, संकेतस्थळाच्या पत्त्यासकट ती टाका. हा थोडं कंटाळवाणं होईल काम, पण नंतर लोकांचे साहित्यचोर म्हणणारे लाजिरवाणे मेल स्वत:च्या तोंडाने वाचण्यापेक्षा, त्यांना सावरासावरीची उत्तरं देण्याची वेळ येण्यापेक्षा हा मार्ग निश्चितच कमी त्रासदायक आहे. आपल्या सुरवातीच्या वादविवादांना चर्चेचं स्वरूप येतय याचा मला मनापासून आनंद आहे. जमल्यास उत्तर देणे.

तब्येतीला जपा


12th Feb 2010 प्रसाद वाणी
माझ्या कॉपी पेस्ट मुळे मना दुखावली जातात याचाच मला आश्चर्य वाटत. असो माझा तो उद्देश नाही, फक्त जे मिळाला ते एतरांशी शेयर कराव हा भाव आणि तो अखंड तसाच राहील. याला मग कोणी काहीही म्हणो, कॉपी-पेस्ट, साहित्याचोर, उचलेगिरी वगैरे, वगैरे... ज्याची मना दुखावली जातात त्यानी आपली कविता कोणती हे माझ्या ध्यानी आणून द्यावे. म्हणजे मला तसा माझ्या पोस्ट मधे त्या कवीचे नाव टाकण्यास मदत होईएल. आणि हो एक लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद वर जी टिप होती ती खरोखरच वाचण्याच्या लायकीची नव्हती. त्याची योग्य काळजी घेतली आहे. आणि हो, तुमची कविता ठेवू की काढू?


12th Feb 2010 प्रसाद साळुंखे
नमस्कार,

त्या टिपेची आपण काय योग्य काळजी घेतलीत ते मला कळणार नाही, कारण ब्लॉगचं नाव बदलून तुम्ही योग्य ती काळजी घेतली आहात. माझ्या बोलण्यावर विचार केल्याबद्दल, आणि तुमच्या वेळात वेळ काढून उत्तर पाठवल्याबद्दल धन्यवाद.

मनं निव्वळ कॉपीपेस्टमुळे दुखावली जात नाहीत, तर चूकीच्या पद्धतीने केलेल्या कॉपीपेस्टमुळे दुखावली जातात, त्याहून जास्त आपली चूक मान्य न करता वर तोंड करून तिचं शक्य तितकं समर्थन करण्याच्या हेकेखोर स्वभावामुळे दुखावली जातात. आता यात आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. उलट मला तुमच्यासारखे लोक कसे असू शकतात? याचं आश्चर्य वाटत. पुन्हा तेच सांगेन की शेयर करा जरूर करा पण काय शेयर करताय, आणि कसं शेयर करताय याचं भान ठेवा, त्याची माहिती मिळवा मग शेयर करा. माझी कविता ठेवण्याआधी विचारलं होतंत का? मग आता हा फार्स कशाला? का माझ्या आक्षेपांनी अचानक 'आवडती' कविता नावडती बनली? चला ती कविता माझी आहे निदान एवढं म्हणालात हेही नसे थोडके. विचारलत म्हणून सांगतो, माझी कविता ठेवायची असेल तर माझ्या नावासकट, ब्लॉगच्या पत्त्यासकट ठेवा. काढलीत तरी माझी काही हरकत नाही. माझ्या कविता वाचकांपर्यंत पोहोचवायला मी समर्थ आहे, मला तुमच्यासारख्या मध्यस्तांची गरज नाही. मी आजवरच्या सगळ्या मेल्समध्ये तुमचा ब्लॉग बंद करा असं एकदाही म्हटलं नाहीए, मग हे कॉपी पेस्ट थांबवणार नाही, अखंड चालू राहिलं असं वारंवार का म्हणताय? माझं फक्त इतकच म्हणणं आहे की जे मेहनत घेतात साहित्यनिर्मितीत त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य श्रेय दिलं गेलं पाहिले, त्यांच्या नावाचा उल्लेख हवाच. असो पालथ्या घड्यावर आहे सगळं. ईश्वर तुम्हाला शारिरिक आणि मानसिक स्वास्थ देवो.





या वादानंतर खूप दिवसांनी नामकरण केलेला तो साहित्यचोराचा ब्लॉग मला मिळाला, वादाचा थोडासा चांगला परिणाम त्यावर दिसला.


आणि ही ती सुमार कविता ज्यावरून मी बेसुमार भांडलो

१३ टिप्पण्या:

  1. भन्नाट.. या 'चोर तो चोर वर शिरजोर' अशा लोकांना चांगला कडक आणि तिखट चुरापाव खायला घातलात. एकदा लागलेला ठसका पुढच्या प्रत्येक कॉपी पेस्ट ला लक्षात राहील.. कायमचा..

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार हेरंब,

    धन्यवाद त्या चोराच्या तुम्ही पाठवलेल्या लिंकबद्दल आणि या प्रतिक्रियेबद्दलही.
    यांना ठसका, हिसका काही लक्षात राहणार नाही.
    जित्याची खोड म्हणतात ना
    राहिला लक्षात तर चांगलंच आहे

    उत्तर द्याहटवा
  3. प्रसाद, बापरे! बरीच हाणामारी केलीस. ह्म्म्म्म... आशा आहे कदाचित थोडीशी सुधारणा होईल... बाकी जित्याची खोड....

    उत्तर द्याहटवा
  4. Baap re.....
    jaam ch joradaaar vajalay....
    Lets hope so ki hyamule kahitari pharak padel....

    उत्तर द्याहटवा
  5. नमस्कार मॅम

    हो कदाचित :)
    हाणामारी हा हा हा :) मी माझ्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी गुरगुरायलाच सुरुवात केली

    असो प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मॅम

    उत्तर द्याहटवा
  6. नमस्कार मैथिलीजी,

    हो जाम जोरात आणि जोशात
    मजा आला :)

    प्रतिसादासाठी धन्यू

    उत्तर द्याहटवा
  7. हेरंबने लिंक दिली होती म्हणून ही शक्ति-तुरेवाली फाइट बघायला आपलं वाचायला मिळाली. झक्कास. तुम्ही मुद्द्याला अगदी गोचडीसारखे चिकटून बसलात आणि चोर प्रत्येक प्रतिक्रियेबरोबर भरकटलेल्या सारखा लिहीत होता. अशा लोकांची अशीच पाठ धरली पाहिजे. सुधारणार नाहीत ते कारण लहानपणापासून संस्कार तसेच असतील त्यांच्यावर. असते काही घराण्यांची परंपरा.

    उत्तर द्याहटवा
  8. मला एक मेल आला होता , त्यातली भाषा इतकी मस्त होती की मी तो इथे टाकू शकत नाही. मला तुमचा इ मेल पाठवला, तर मेल फॉर्वर्ड करतो.
    एकदम भारी मेल आहे, त्या चोरांच्या बद्दल..

    उत्तर द्याहटवा
  9. नमस्कार सिद्धार्थ,
    प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
    हेरंबने लिंक दिली म्हणून ही शक्ति तुरेवाली फाईट घडली
    अशी फाईट करायची वेळ येते तेव्हा का कोण जाणे आतून हरल्यासारखं वाटतं

    उत्तर द्याहटवा
  10. नमस्कार महेंद्र काका

    नक्की फॉरवर्ड करा, मला वाचायला जाम आवडतं, भाषा मस्त असली की मी टाळूच शकत नाही :)

    prsd_reloaded@indiatimes.com

    उत्तर द्याहटवा